महाराष्ट्राचा गौरव वाढविणारे

महानुभव पंथाचे थोर प्रवर्तक

स्वत: गुजरातमधील असूनही ज्यांनी शिष्यांना महाराष्ट्रात वास्तव्य करून कार्य करण्याची आज्ञा दिली, ज्यांनी शिष्यांना आग्रहपूर्वक मराठीत व्यवहार आणि साहित्यनिर्मिती करण्यास सांगितले, ज्यांनी जेथे मराठी भाषा बोलली जाते, तो प्रांत म्हणजे महाराष्ट्र अशी व्याख्या करत खान्देश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते कोकण असा महाराष्ट्राचा नकाशा पहिल्यांदा सांगितला, ज्यांनी स्त्री-शूद्रादी भेदभाव नाहिसा करण्यासाठी, सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले त्या महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामींची आज आठशेवी जयंती.

संत श्री नामदेव, ज्ञानदेवांच्या अगोदर समाजात चातुर्वर्ण्याची मिरासदारी वाढलेली असण्याच्या काळात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी वैदिक तत्त्वज्ञानाला बाजूला करून, ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय करत आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. विविध देवतांचे प्रस्थ आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर हल्ला चढविला. आपल्या पंथात त्यांनी स्त्रिया, शूद्र, सकलजाती, बहुजन सर्वांनाच दीक्षा घेण्याची सोय ठेवली. धर्मज्ञान बोलीभाषेत सांगण्याचा आग्रह धरला. चक्रधरस्वामींच्या या लोकाभिमुख वाटेवरूनच नंतर वारकरी संतानी आपली वाटचाल केली.श्रीकृष्णाचा अवतार…
लीळाचरित्रानुसार बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथमधील भडोच येथे शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या रविवारी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव माल्हणदेवी (माल्हाईसा) होते. सर्वज्ञ श्रीचक्रधरांचे जन्म नाव हरिपाळदेव असे होते. तारुण्यात आल्यावर हरिपाळदेव यांचा विवाह कमळादेवी (कमळाईसा) यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला. पुढे हरिपाळदेवांना आजारी लोकांची सेवा करायचा छंद लागला. बरेचदा ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले. पुढे त्यांची प्रकृती अचानक खालवली आणि त्यांचा मृत्यू झाला. परंतु स्मशानात सरणावर ठेवल्यावर हरिपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. महानुभावीयांच्या श्रद्धेनुसार यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला. पंचावतारातील तिसरा अवतार श्रीचांगदेव राऊळ यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. काही मतांनुसार त्यांच्या आत्म्याने हरिपाळदेवांच्या शरीरात प्रवेश केला. ही अवतारधारणाची घटना शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी घडली. या घटनेनंतर चक्रधरांचे आयुष्य पूर्वीप्रमाणेच सुरू झाले. कालौघात त्यांना एक पुत्रही झाला. त्यांचे आजारी लोकांना सेवा देणे मात्र तसेच सुरू राहिले. एक दिवस काही रुग्णांना फारच खर्च लागल्यामुळे त्यांना उसने घ्यावे लागले. त्यांनी देणेकऱ्यांचे पैसे जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत अन्नप्राशन करणार नाही अशी शपथ घेतली. त्यांच्या पत्‍नीने त्यांना या कारणासाठी दागिने देण्यास नकार दिला. शेवटी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नकळत देणेकऱ्याचे पैसे परत केले. या घटनेमुळे हरिपाळदेव यांना औदासीन्याने ग्रासले. लौकिक प्रपंचातून त्यांचे मन उडाले. त्यांनी राजविलासी भोग, संसार-सुख यांचा त्याग करून लोकसेवा करण्याचा निर्णय घेतला.

गोविंदप्रभूंनी संबोधले चक्रधर
गृहत्याग करण्यासाठी हरिपाळदेवांनी रामाच्या दर्शनास रामटेक येथे जावयाचे आहे, अशी सबब घरी सांगितली. त्यावेळी महाराष्ट्रातील यादव आणि भडोचचे राज्य यांच्यात कलह सुरू होता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी या कल्पनेस विरोध केला. परंतु शेवटी हरिपाळदेवांनी वडिलांचे मन वळविले. वडिलांनी त्यांना संरक्षणासाठी घोडेस्वार, सेवक यांच्यासह जाण्यास अनुमती दिली. त्यांना आपल्यासोबतचा लवाजमा नको होता. त्यांना सर्वत्याग करावयाचा होता. त्यामुळे त्यांनी एकेका मुक्कामावरून आपले क्षेमकुशल कळवण्यासाठी एकेक सैनिक परत पाठवणे सुरू केले. शेवटी अमरावती जिल्ह्यातील देऊळवाडा येथे काजळेश्वराच्या मंदिरात मुक्कामास असताना त्यांचे सैनिक निद्राधीन झाल्याचे पाहून आपली राजवस्त्रे तिथेच काढून ठेवून दोन वस्त्रांनिशी ते तिथून निघून गेले. सर्वस्वाचा त्याग करून भ्रमण करत असताना हरिपाळदेव ऋद्धिपूर येथे आले. तिथे त्यांना विरक्त अवस्थेतील श्री गोविंदप्रभू दिसले. श्रीगोविंदप्रभूंपासून हरिपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या. याचवेळी गोविंदप्रभूंनी त्यांना चक्रधर हे नाव दिले.

महाराष्ट्रभर भ्रमंती
गोविंदप्रभूंपासून शक्ती मिळाल्यानंतर चक्रधरांची विरक्ती अधिकच वाढू लागली. लीळाचरित्राच्या ‘एकांक’ या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीपासून १८ किलोमीटरवर येळी या गावी चक्रधरस्वामींनी वास्तव्य केल्याचा उल्लेख ‘लीळाचरित्र’ या मराठी भाषेतील पहिल्या चरित्र ग्रंथात आहे. या ठिकाणी नदीकिनारी महानुभाव पंथीय मंदीर आहे. या काळात चक्रधरस्वामींनी महाराष्ट्रभर एकट्यानेच भटकंती केली. आंध्र प्रदेशाच्या काही भागातही त्यांनी भ्रमण केले. यावेळेपर्यंत चक्रधरांना फारसा शिष्यपरिवार लाभला नव्हता. वडनेरचे रामदेव दादोस त्यांचे शिष्य बनले. त्यांच्यामार्फतच पुढे चक्रधरांना नागदेव, आबाइसा, महादाइसा, उमाइसा इत्यादी शिष्यपरिवार मिळाला. या भ्रमंतीच्या काळात चक्रधर यांची मेहकर येथे बाणेश्वराच्या मंदिरात बोणेबाईंची भेट झाली. दोघांनी तेथे गोकुळाष्टमी साजरी केली. एके दिवशी सिंहस्थ यात्रेच्या निमित्ताने ते बोणेबाईंबरोबर त्र्यंबकेश्वरला जाण्यास निघाले. वाटेत पैठण येथे त्यांनी त्र्यंबकेश्वरास जाण्याचा बेत रद्द करून शके ११८९ मध्ये पैठण येथेच विधीवत संन्यासाची दीक्षा घेतली. यानंतर त्यांची भटकंती थांबली. त्यांनी धर्म आणि समाजसुधारणेचे कार्य सुरू केले. भ्रमंतीच्या काळात त्यांना लोकजीवनाचे व्यापक दर्शन झाले. ज्याचा पुढील काळात मोठा उपयोग झाला.

स्त्री-शूद्रांना अधिकार, श्रीकृष्णाचा विचार
चक्रधरस्वामींच्या अवतार कार्याअगोदर भिन्न विचारसरणीचे अनेक धर्मपंथ अस्तित्वात होते. त्यांच्या उपासना पद्धतीही विविध पद्धतीच्या होत्या. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चारही वर्णांमध्ये भक्तीचे प्रकार वेगवेगळे होते. राजा रामदेवरायाच्या दरबारातील हेमाद्री पंडिताने चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ मनुस्मृतीच्या आधारे निर्माण केला होता. त्या ग्रंथानुसार एका वर्षात दोन हजार व्रतवैकल्ये झालीच पाहिजेत, असा राजदंड सांगितला गेला होता. महाराष्ट्रातील जनता या कर्मकांडात आणि जाचक राजाज्ञेत अडकली होती. शुभ-अशुभ, शकुन-अपशकुन, शुद्ध-अशुद्धी, स्पृश्य-अस्पृश्य इत्यादींचा बुजबुजाट झाला होता. धर्माचा, भक्तिमार्गाचा, धर्मग्रंथाचा अभ्यास करण्याचा अधिकार वेदांमध्ये फक्त ब्राह्मण पुरुष आणि क्षत्रिय पुरुष या दोन वर्णाच्या पुरुषांनाच आहे. वैश्य आणि शूद्र या दोन वर्णाच्या पुरुषांना तो अधिकार नाही. तसेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णाच्या म्हणजे सर्वच स्त्रियांना धर्माचरणाचा अधिकार नाही. ओघानेच धर्मग्रंथ अभ्यासण्याचा अधिकार नाही, असे मानले गेले होते. अशा वेळी समाजाला योग्य मार्गदर्शनाची गरज होती. असा वेळी चक्रधर स्वामींनी भगवद्गीतेतील गोपाल कृष्णाचा महिमा सांगताना सर्व जातीतील स्त्रियांना आणि वैश्य, शूद्रांना भक्तीचा अधिकार आहे असे सांगितले. महानुभाव पंथात स्त्रियांना संन्यास दीक्षा देण्यास सुरुवात केली. त्यांनी अहिंसेचे पुरस्कार केला. एका सशाला त्यांनी पारध्यांच्या तावडीतून सोडवून पारध्यांना अहिंसेचा उपदेश करून सन्मार्गाला लावल्याची कथा प्रसिद्ध आहे.

मराठीतील आद्य गद्यग्रंथ : लीळाचरित्र
चक्रधर स्वामींच्या लीळा श्रीनागदेवाचार्यादी भक्तमंडळींनी एकत्र गोळा करून ‘लीळाचरित्र’ हा ग्रंथ लिहिला. तो मराठी भाषेतील आद्य गद्यग्रंथ म्हणून मान्यता पावला. श्रीचक्रधर स्वामींचे अवतार कार्य प्रामुख्याने महाराष्ट्रात झाले. त्यामुळे महाराष्ट्र हे महानुभावांचे धर्मक्षेत्र बनले. महाराष्ट्र सर्व दृष्टीने थोर असल्याचे त्यांचे मत होते. महाराष्ट्रात सात्त्विक प्रवृत्तीची माणसे राहतात, जी अनाचार करत नाहीत आणि इतरांनाही करू देत नाहीत. ‘सात्विक तेथे अनाचाराची बुद्धी न उपजे आपण अनाचार ना करी आणिकासी करू न देई’ थोडक्यात महाराष्ट्र म्हणजे ‘महंत राष्ट्र, म्हणजे थोर, निर्दोष, सगुण’, असे वर्णन गुर्जर शिवबास या चक्रधर स्वामींच्या शिष्याने करून ठेवले आहे. तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग, तो महानुभाव पंथ, असे महानुभव पंथाचे अभ्यासक वि. भि. कोलते यांनी म्हटले आहे. तर, या संप्रदायाचे मूळचे नाव ‘परमार्ग’ असे असून महानुभाव पंथ हे नाव प्रथम संत एकनाथांनी वापरले असल्याचे संशोधक शं. गो. तुळपुळे यांनी म्हटले आहे. महानुभव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामी यांनी आणि नंतर वारकरी संतांनी केलेला लोकभाषेचा पुरस्कार हा काळाला कलाटणी देणारा, सर्व समाजाला ज्ञानाची कवाडे उघडून देणारा ठरला.

उत्तर भारतात प्रसार आणि प्रभाव
महानुभवांचे प्रमुख चार नियम म्हणजे शणागती, प्रसाद सेवा, मूर्तिध्यान वा मूर्तिज्ञान आणि नामस्मरण हे होत. यतिधर्म (संन्यास) आणि गृहस्थधर्म या दोहोवर त्यांचा भर आहे. स्त्रियांना मठात संन्यासिनी म्हणून जगण्याचा अधिकार आहे. ते अहिंसा, शाकाहार, सात्त्विक जीवन, भिक्षा मागणे आणि देशभ्रमण या गोष्टी काटेकोरपणे पाळतात. त्यांनी एक सांकेतिक लिपी शोधून काढली. ती नऊ पद्धतींनी लिहिता येते. मराठी भाषेत ग्रंथरचना करण्याचा चक्रधरस्वामींचा आग्रह होता. महानुभवांचे सूत्रपाठ, सातिग्रंथ, आख्यान काव्य, साधना ग्रंथ, टीकाग्रंथ आणि भाष्यग्रंथ हे मोलाचे ग्रंथ आहेत. सोळाव्या शतकात महानुभाव पंथाचा प्रसार पंजाबमध्ये झाला. कृष्णराज नावाच्या पंजाबी व्यापाऱ्याने हा धर्मग्रंथ तिकडे नेला. ते पुढे कृष्णमुनी म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचा हा संप्रदाय जयकृष्ण पंथ म्हणून पंजाबमध्ये प्रसिद्ध आहे. मराठीत लिहिलेले सूत्रपाठ हिंदी अथवा पंजाबी मातृभाषा असलेले अनुयायी अद्यापही वाचतात. सतराव्या शतकात मोगल बादशहा औरंगजेब याने या पंथाला जिझिया करापासून मुक्त केले. गेली आठशे वर्षे हा पंथ महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात आणि पंजाबमध्ये अस्तित्वात आहे. महानुभावांची कृष्णाची मंदिरे मुंबई, दिल्ली आणि अमृतसर या ठिकाणी आढळतात. समतेच्या विचारसरणीमुळे या पंथाला मोठ्या प्रमाणात अनुयायी लाभले. चक्रधरस्वामी यांनी बाराव्या, तेराव्या शतकात आपल्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये सूत्ररूपाने ‘दृष्टान्तपाठ’ या ग्रंथात सांगितली. या ग्रंथावरील भाष्ये अनेक महानुभाव संतकवींनी आणि भाष्यकारांनी केली. याच भाष्यलेखन मालिकेतील मुरारीबासांचा ‘दृष्टान्तप्रबोध’ हा ग्रंथ होय. या संप्रदायातील अनेक भाष्यकार संस्कृतज्ज्ञ, विद्वानांनी आपले भाष्यग्रंथ स्वामींच्या आदेशानुसार लोकभाषा मराठीतून लिहिले .

मराठी सहित्य केले समृद्ध
महानुभावांच्या मराठीविषयक आत्मीयतेच्या भावनेमुळे या पंथातील व्यक्तींनी विविध वाङ्मयप्रकारांत रचना करून मराठी साहित्य समृद्ध केले. स्मृति-संकलनात्मक गद्य चरित्रवाङ्मय ही या पंथाची मराठी साहित्यास लाभलेली महत्त्वाची देणगी. महानुभाव वाङ्मयात चरित्रे, सूत्रवाङ्मय, टीकावाङ्मय, न्याय-व्याकरणादी शास्त्रे, क्षेत्र आणि व्यक्तिमहात्मवर्णने, स्तोत्रे इत्यादींचा समावेश आहे. निरनिराळ्या काळात पंथातील प्रतिभासंपन्न कवींनी लिहिलेल्या सात काव्यांना साती ग्रंथ म्हटले जाते. यात नरेंद्रांचे रुक्मणीस्वयंवर; भास्करभट्ट बोरीकरांचे शिशुपालवध आणि उद्धवगीता. दामोदर पंडितांचा वछाहरण, रवळो व्यासकृत सैह्याद्रिवर्णन, पंडित विश्वनाथ बाळापूरकर यांचा ज्ञानप्रबोध आणि पंडित नारायण व्यास वहाळिये यांचे ऋद्धिपूरवर्णन यांचा समावेश होतो. हे साती ग्रंथ परमार्गाच्या परंपरेने मान्य केलेले आहेत. श्रीचक्रधर आणि श्रीगोविंदप्रभू या ईश्वरावतारांच्या लीळा त्यांच्या भक्तांकडून मिळवून म्हाइंभट्टांनी चक्रधरांच्या जीवनावरील लीळाचरित्र आणि गोविंदप्रभूंच्या जीवनावरील ऋद्धिपूरचरित्र हे चरित्रग्रंथ तयार केले.

केसोबासांनी लीळाचरित्रातील काही लीळा निवडून त्या संस्कृत भाषेत पद्यबद्ध केल्या आणि आपला रत्नमालास्तोत्र ग्रंथ निर्माण केला. नागदेवांच्या जीवनावरील स्मृतिस्थळ हा चरित्रग्रंथ प्रथम नरेंद्र आणि परशराम बासांनी तयार केला, असे म्हणतात. पुढे त्याचे मालोबास आणि गुर्जर शिवबास यांनी संस्करण केले. केशवराज सूरी यांनी सिद्धान्त सूत्रपाठ आणि दृष्टान्तपाठ हे पंथीय तत्त्वज्ञान विशद करणारे ग्रंथ तयारे केले. श्रीचक्रधरांची नित्यदिनचर्या सांगणारा छोटा पण महत्त्वाचा ग्रंथ पूजावसर हा वाङ्देववास यांचा. म्हाइंभट हे मराठीतील आद्य चरित्रकार मानले जातात. धवळे आणि मातृकी रुक्मिणीस्वयंवर रचणारी चक्रधरशिष्या महदाइसा ही आद्य मराठी कवियत्री होय. हयग्रीवाचार्य यांनी भागवताच्या दशम स्कंधावर गद्यराज हे निर्यमक श्लोकबद्ध काव्य लिहिले. पंथाच्या उत्कर्षकाळात निर्माण झालेल्या महत्त्वाच्या ग्रंथरचनेनंतर भाष्यग्रंथ आणि इतर प्रकारचे साहित्य लिहिले गेले. त्यात गुर्जर शिवबासाने, चक्रधरांच्या वचनांवर संबंधिलेले लक्षणस्थळ, विचारस्थळ आणि आचारस्थळ हे ग्रंथ महत्त्वाचे होत. यांतील प्रत्येक स्थळावर पुढे अनेक भाष्ये किंवा बंद लिहिले गेले. त्यांत दत्तराज मराठे यांचा लक्षणबंद, वाईंदेशकरांचा विचारबंद विश्वनाथवास बीडकर यांचा आचारबंद विशेष महत्त्वाचे आहेत. स्थळ आणि बंद ग्रंथांनी चौदाव्या-पंधराव्या शतकांत मराठी गद्याचे दालन विशेष समृद्ध झाले आहे. याच काळात मराठीचा पहिला व्याकरणग्रंथ पंडित भीष्माचार्यानी लिहिला. चक्रधरांची वचने ज्या प्रसंगी निरूपिली गेली वर्णन करणारा, निरुक्तशेष ग्रंथ भीष्माचार्य वाइंदेशकर ह्यांनी तयार केला. तोही पंथीय वाङ्मयात महत्त्वाचा मानला जातो.

स्वत: गुजराती, हट्ट मराठीचा!
महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर हे स्वतः गुजराती भाषक असले, तरी ते मराठी भाषा अस्खलित बोलत. आपल्या तत्त्वज्ञानाचा मराठी या लोकभाषेत त्यांनी प्रचार केला. त्यांचा हा दृष्टिकोण पंथाचे आचार्य नागदेव यांनी कटाक्षाने आचरणात आणला. त्यामुळे केशिराजांसारख्या संस्कृतज्ञ शिष्यांकडून त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचना करवून घेतली (नको गा केशवदेया : येणें, माझिया स्वामीचा सामान्य परिवारू नागवैस की : किंवा ‘तुमचा अस्मात् मी नेणे गा : मज श्रीचक्रधरे निरुपल्ली मऱ्हाटी : तियाचि पुसा) चक्रधर-नागदेवांच्या शिष्यवर्गात पारंपरिक संस्कृत पठडीत तयार झालेले शिष्य असल्याने त्यांची ग्रंथरचना संस्कृत वाङ्मयाच्या वळणावर गेली असून त्यांच्या भाषेवर संस्कृताचा मोठा प्रभाव आहे. या ग्रंथात प्रारंभी महाकाव्यसदृश सलग ग्रंथरचना झाली. पुढील काळात चौपद्या, धुवे, स्तोत्रे, आरत्या, धवळे, पदे अशी विपुल स्फुटरचनाही झाली. लक्ष्मण रत्नाकरासारख्या संस्कृत ग्रंथावरील बत्तीसलक्षणांची टीप यासारखे टीपग्रंथ लिहिले गेले. त्यामुळे सूत्रभाष्य, अर्थनिर्णयशास्त्र, व्याकरणशास्त्र, साहित्यशास्त्र यांची रचना मराठीच्या प्रारंभाकाळात करून महानुभावीयांनी मराठीची उपासनाच नव्हे, तर जोपासनाही केली. महानुभावीयांच्या या वैविध्यपूर्ण वाङ्मयाची विभागणी (१) चरित्रग्रंथ, (२) सूत्रग्रंथ, (३) साती (काव्य) ग्रंथ, (४) भाष्यग्रंथ, (५) साधनग्रंथ, (६) तात्त्विक ग्रंथ, (७) गीता टीका, (८) आख्यानक काव्ये, (९) स्थलवर्णनपर ग्रंथ, (१०) इतिहासग्रंथ, (११) स्फुटरचना अशा प्रकारांत करता येईल.

 

सांकेतिक लिपीत ग्रंथ बद्ध
भास्करभट हे पंथाचे आचार्य असताना, मुसलमानी आक्रमणाच्या काळात ते कोकणात जात असताना, लीळाचरित्र, ऋद्धिपूरचरित्र, स्थानपोथी इत्यादी ग्रंथांच्या अधिकृत पोथ्या चोरांकडून लुबाडल्या गेल्या. त्यानंतर हिराइसा आदी अनेक शिष्यांकडून आपापल्या आठवणीप्रमाणे त्यांचे पुनर्लेखन करण्यात आले. ते करताना त्यांनी इतरांच्या ‘वासना’ ही नमूद केल्या. त्यामुळे या ग्रंथांत अनेक पाठभेद निर्माण झाले आणि पुढेपुढे त्यांत अधिकाधिक भर पडत गेली. काही आग्नायांनी सांकेतिक लिपीत आपले ग्रंथ निबद्ध केले. आपली ब्रह्मविद्या, धर्ममते भ्रष्ट होऊ नयेत म्हणून इतरांपासून गुप्त ठेवण्याची आणि पंथीय वाङ्मयाचे पावित्र्य राखण्याची भावना वाढीस लागून त्यासाठी ग्रंथ सांकेतिक लिपीत लिहिण्यात येऊ लागले. रवळो व्यासाने १३५३ मध्ये सकळ लिपी तयार केली आणि १३६३ मध्ये सुंदरी लिपी निघाली. त्यानंतर पारमांडल्य, वज्रलिपी, अंकलिपी इत्यादी अनेक लिप्या तयार झाल्या असल्या, तरी बहुतेक ग्रंथ सकळ लिपीतच आढळतात. चक्रधरांनी गीतेवरील भाष्याच्या स्वरूपात पारंपरिक पद्धतीने आपले विचार न मांडता स्वतंत्रपणे मांडले. श्रीकृष्ण हा पूर्णावतार मानून त्यांनी पंचकृष्णांखेरीज अन्य देवता क्षुद्र मानल्या. स्त्रीशूद्रादिकांना संन्यासाचा अधिकार देऊन मोक्षमार्ग सर्वासाठी त्यांनी खुला केला. पंथीय तत्त्वविचार लोकभाषेत, मराठीत मांडले मराठी वाङ्मय समृद्ध झाले; परंतु सामान्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार न करता या पंथातील संस्कृतज्ञ ग्रंथकारांनी लेखन केल्यामुळे त्याच्या प्रसारास मर्यादा पडल्या.

महानुभाव पंथाचे तत्त्वज्ञान
व्यक्तीचे श्रेष्ठत्व जन्माने नव्हे, तर त्याच्यातील तत्त्वज्ञानातून ठरते. दंभ निर्माण होतात तेव्हा धर्मात अपप्रवृत्ती येतात. प्रत्यक्ष असणे आणि दिसणे यातील भेद संपतो, तेव्हा दंभ संपतो. त्याचवेळी समाजात परिवर्तन घडू शकते. महानुभाव पंथ हा सर्वाना सामावून घेणारा पंथ आहे. येथे सर्व समान आहेत. त्यामुळे सर्व जाती-धर्माचे लोक येथे दिसतात. येथे जातिभेद नाही, तर केवळ तत्त्वज्ञान आहे. धर्मासाठी आम्ही नाही, तर धर्म आमच्यासाठी आहे. तो साध्य नाही, तर साधन आहे. हीच पंथाची शिकवण आहे. बाराव्या शतकात मानवतेला लागलेला भेदाभेदांचा कलंक दूर करण्याचा प्रयत्न चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून केला. चक्रधरांच्या विचारांच्या विरोधकांनी राजसत्तेला चक्रधरांच्या विरोधात भडकवण्यात आले. त्यामुळे राजाने त्यांच्या शिरच्छेदाचा आदेश दिला, पण शिरच्छेदानंतर शिर पुन्हा चक्रधरांच्या धडाला चिकटले आणि चक्रधरांनी ‘उत्तरापंथे गमन’ केले, असे सांगितले जाते. १२७८मध्ये त्यांचे हे गमन झाले. ते अजूनही हिमालयात आहेत, अशी त्यांच्या अनुयायांची श्रद्धा आहे. समाजाला ज्ञानाचा उजेड दाखविणाऱ्या या थोर महात्म्याला आठशेव्या जयंतीनिमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *