एकनाथ महाराजांनी केलेला

ज्ञानेश्वरी संपादनाचा दिवस

आज श्री ज्ञानेश्वरी परिष्करण दिन अर्थात श्री ज्ञानेश्वरी संपादन दिन. काळाच्या ओघात संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये अशुद्धी घुसल्या. त्या दूर करून संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचं संपादन करून ती शुद्ध केली. ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्मितीची नेमकी तिथी उपलब्ध नाही. मात्र ज्ञानेश्वरी शुद्धीचं वर्ष आणि तिथी नाथबाबांनी नमूद केली आहे. ती म्हणजे, आजचा दिवस भाद्रपद वद्य षष्ठी! संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे-देहूकर यांनी या दिवसाला ‘ज्ञानेश्वरी परिष्करण दिवस’ असे संबोधले आहे.

ज्ञानेश्वरीची निर्मिती १२९०मध्ये झाली. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रुपाने भगवद्गीतेवर मराठीत भाष्य केल. १२९६मध्ये माऊलींनी समाधी घेतली. १५३३मध्ये संत एकनाथांचा जन्म झाला. नाथांच्या काळापर्यंत दोनशे वर्षांमध्ये ज्ञानेश्वरी मध्ये अनेक पाठभेद निर्माण झाले होते. छपाईचे तंत्रज्ञान येण्यापूर्वी ग्रंथांच्या फक्त हस्तलिखित प्रती असत. एका प्रतीवरून अनेक प्रती तयार होत. यांना नकला असे म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या अशा नकला होत असताना, प्रती तयार करणाऱ्या लेखकांकडून काही शब्द चुकत. यातूनच पाठभेद निर्माण होत. क्वचित ठिकाणी एखादा शब्द अथवा पूर्ण ओवी गाळली जाई. ज्ञानेश्वरीच्या बाबतीतही हे घडले. त्यामुळे ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करण्याची गरज निर्माण झाली. त्यासाठी पुढाकार घेतला, संत एकनाथ महाराजांनी.

माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रुपाने भगवद्गीतेवर मराठीत भाष्य केले. माऊलींनी ग्रंथ सांगितला आणि श्री सच्चिदानंद बाबांनी तो लिहून घेतला. हे ग्रंथलेखन गोदावरी तटी श्री क्षेत्र नेवासा येथे झाले. ही ग्रंथ निर्मितीची ही माहिती, लेखक, ठिकाण, साल, तत्कालीन राजा यांची नोंद ग्रंथाच्या शेवटी माऊलींनी केली आहे. पण यात तिथीचा उल्लेख नाही.
पुढे एकनाथ महाराजांनी ग्रंथ शुद्ध केला अर्थात आजच्या भाषेत ग्रंथाचे संपादन केले. या ग्रंथशुद्धीची तिथी आणि साल दोन्हीची नोंद नाथ महाराजांनी केली आहे. ही तिथी आहे भाद्रपद वद्य षष्ठी. ग्रंथ निर्मितीची तिथी उपलब्ध नसल्याने याच तिथीला ज्ञानेश्वरी जयंती साजरी केली जाते. या दिवसाला ‘श्री ज्ञानेश्वरी परिष्करण दिवस’ असे नाव संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे देहूकर यांनी सुचवले आहे.

शके बाराशतें बारोत्तरें। तैं टीका केली ज्ञानेश्वरें। सच्चिदानंदबाबा आदरें। लेखकु जाहला।।
(ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय – ओवी क्रमांक १८१०)

बहुकाळ पर्वणी गोमटी। भाद्रपदमास कपिलाषष्ठी। प्रतिष्ठानीं गोदातटीं। लेखनकामाठी संपूर्ण जाहली।।
(संत एकनाथ महाराजांनी केलेला ग्रंथशुद्धीच्या तिथीचा निर्देश.)

लेखन आणि डॉ. सदानंद मोरे यांचा व्हिडिओ सौजन्य – ह. भ. प. अभय महाराज जगताप.

1 thought on “श्री ज्ञानेश्वरी परिष्करण दिन

  1. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी।
    एक तरी ओवी अनुभवावी।।

Leave a Reply

Your email address will not be published.