माणसांत देव शोधायला

शिकवणारा आधुनिक संत

देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन संत गाडगेबाबा करत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असेही ते ठणकावत. अशा या थोर संताची आज (बुधवार, २३ फेब्रुवारी) जयंती.

‘तिर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी’ हा विचार संत गाडगेबाबांनी कृती आणि उक्तीतून दिला. संत तुकाराम महाराजांचा
जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।।
तोची साधू ओळखावा। देव तेथेची जाणावा।।
हाच विचार गाडगेबाबांनी ‘भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्यानागड्यांना वस्त्र, गरीब मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, अंध-पंगू-रोगी यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न आणि दुःखी, निराशांना हिंमत देणे हाच रोकडा धर्म आहे. तसेच हीच खरी भक्ती आणि देवपूजा आहे, अशा शब्दात मांडला. आजच्या कोविडच्या काळात गाडगेबाबांचे वरील विचार खूप मौलिक वाटतात.

व्यसनमुक्तीचे बीज
गाडगेबाबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. आईचे नाव सखुबाई होते. गाडगेबाबा लहान असतांनाच वडील दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे आईच्या माहेरी अर्थात मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे मामाकडेच त्यांचे बालपण गेले. कुटुंबातील कर्ता व्यसनाने लवकर मृत्युमुखी पडतो तेव्हा ते संपुर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. हेच दुःख गाडगेबाबांच्याही वाट्याला आले होते. या अनुभवातून लोकांना शहाणे करत व्यसनमुक्त होण्याचा सल्ला त्यांनी दिला. १८९२ साली त्यांचे लग्न कमलापूर तरोडा (ता. दर्यापूर, जि. अमरावती) येथील धनाजी खंडाळकर यांची कन्या गुंताबाई यांच्याशी झाले होते. त्यांना अपत्यही होते. परंतु तत्कालीन सामाजिक परिस्थिती बाबांना अस्वस्थ करत होती. समाज परिवर्तनाची गरज ओळखून स्वतःला त्यात झोकून देत गाडगेबाबांनी १ फेब्रुवारी १९०५ रोजी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यानंतर मागे वळून न पाहता संपूर्ण आयुष्य समाजासाठी दिला.

कीर्तनातून अंधश्रद्धा निर्मूलन
अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे, डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. ते ज्या गावात जात तो गाव आधी झाडून स्वच्छ करीत. सायंकाळी कीर्तन करून लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धेच्या कचरा साफ करत. कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण आणि दोषांची जाणीव करून देत असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका. देव दगडात नसून तो माणसांत आहे, असे पटवून देत. बाबांची १९२६ मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी भेट झाली. पंढरपूरच्या वाळवंटात कीर्तन करत असताना गाडगेबाबांनी लोकांना देव पाह्यलं का कोणी देव? असा प्रश्न केला. जो स्वतःची आंघोळ स्वतः करत नाही, स्वतःची कापड स्वतः घालत नाही. स्वतःच रक्षण स्वतः करू शकत नाही तो देव कसला, असा प्रश्न त्यांनी केला. तसंच जो समाजाचं हित करतो, जगाचं कल्याण व्हावं म्हणून धडपडतो तोच खरा देव आणि संत. तो मला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यात दिसतो, असे म्हणत कर्मवीर पाटील यांच्याकडे हात दाखवत त्यांचे सर्वसामान्य जनता शिकावी यासाठी सुरू असलेले प्रयत्न सांगितले.

सेवाभावातच देव
रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, विद्यालये देखील गाडगेबाबांनी सुरू केली. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास बाबांनी त्याला आपण होऊन मदत करत. त्यानंतर कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जात. त्यांनी नाशिक, देहू, आळंदी आणि पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. १९५४ मध्ये गाडगेबाबांनी मुंबईत जे. जे. हॉस्पिटल येथील रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळच धर्मशाळा बांधली. दरम्यान, गाडगेबाबांनी सन १९३१ ला वरवंडे येथे प्रबोधनातून पशुहत्या बंद केली. नांदेड जिह्यातील देगलूर तालुक्यात मशनेर देवस्थान आहे. येथे नवस फेडण्यासाठी नागरिक दर मंगळवारी पशू बळी देत असे. त्यामुळे रक्ताचा पाट वाहत असे. याची माहिती मिळताच गाडगेबाबांनी तेथे धाव घेतली. तुम्हाला नवस फेडण्यासाठी पशु बळी द्यायची असेल तर आधी माझे मुंडके कापावे लागेल, असा इशारा दिला. त्यानंतर अंधश्रद्धेची जळमटे पुसली जावी यासाठी तेथे मदनेश्वर विद्यालय सुरू केले. अशा अनेक संस्था सुरू केल्यानेच मराठवाड्यात शिक्षणाचा प्रचार, प्रसार झाला.

महात्मा गांधी, डॉ. आंबेडकरांची भेट
वर्धा येथे २७ नोव्हेंबर १९३५ रोजी महात्मा गांधी आणि गाडगेबाबांची पहिली भेट. महात्मा गांधी आणि गाडगेबाबा हे दोन्ही महामानव करुणेच्या एका सूत्रात बांधले गेले होते. बाबांचे स्वच्छता अभियान आणि जनप्रबोधन याबाबत महात्मा गांधींना प्रचंड उत्सुकता होती. या भेटीत दोघांची विविध विषयांवर चर्चा झाली. गाडगेबाबा आपल्या अनेक कीर्तनांमधून महात्मा गांधींचा जय जयकार करत होते. तितकेच ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानत. १४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्या चाहत्याने ही माहिती मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना दिली. तेव्हा डॉ. बाबासाहेब भारताचे कायदेमंत्री होते. त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवत दोन घोंगड्या विकत घेऊन रुग्णालय गाठले होते. “डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे.” तेव्हा बाबासाहेब म्हणाले “बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे.” या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. पंढरपूर येथे स्थापन केलेल्या ‘संत चोखामेळा धर्मशाळे’ची सर्व कागदपत्रे गाडगेबाबांनी स्वतःचा अंगठा उमटवून १४ जुलै १९४९ रोजी डॉ. आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द केली. तसेच १९५२ मध्ये पंढरपूर येथे भरलेल्या कीर्तन परिषदेत अस्पृश्यता निर्मूलननासंदर्भात कठोर भूमिका मांडली. दलितांची सेवा करण्यासाठी कीर्तनकारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन गाडगेबाबांनी केले होते. डॉ. आंबेडकरांनी गाडगेबाबांना गुरुस्थानी मानत असत.

कर्मवीर अण्णांसोबतचे नाते
गाडगेबाबा भाऊराव पाटलांना आदरपूर्वक ‘कर्मवीर’ म्हणायचे. तर अण्णा म्हणजेच भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबांचा उल्लेख ‘महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम’ असे करायचे. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा पुढे नेणारे राजर्षी शाहू महाराज यांचे वैचारिक आशीर्वाद लाभलेले कर्मवीर भाऊराव पाटील कर्मयोगी गाडगेबाबा यांना आपल्या गुरुस्थानी मानत असत. साताराच्या स्टेशन परिसरात एका झोपडीत राहणार्‍या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या झोपडीत अनेकदा गाडगेबाबा येऊन गेले होते. गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांनाही मदत केली होती. संत गाडगेबाबांचे पंढरपूर येथे १४ नोव्हेंबर १९५६ रोजी झालेले कीर्तन अखेरचे ठरले. जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे आणि त्या माध्यमातून जनतेने आपलं जीवन व्यतीत केले पाहिजे, यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. हुंडा प्रथेवर सुद्धा कठोर टीका केली. हुंडा प्रथा बंद व्हावी, याकरिता प्रयत्न केले. ते माणसांच्या मनांची मशागत करत. स्त्रियांच्या सन्मानासाठी त्यांनी फार मोठे काम केले.

गोपाला गोपाला…
अमरावतीजवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे. तसेच अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नाव दिले आहे. अशा या महान विभूतीला ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार अभिवादन!🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *