मानवाला सन्मार्गावर आणणारे

शेगावीचे संत श्री गजानन महाराज

काम, क्रोध, मोह, मत्सर आणि अहंकार यांनी वेढलेल्या मानवाला चिंता आणि विवंचनापासून मुक्ती मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. ईश्वराच्या आराधनेच्या माध्यमातून मानवाला सन्मार्गावर आणण्याचे महान कार्य संत करतात. असेच एक संत २३ फेब्रुवारी १८७८ रोजी महाराष्ट्रातील शेगावी प्रकट झाले, ते म्हणजे श्री गजानन महाराज!

कोण होते गजानन महाराज?
गजानन महाराज हे भगवान गणेश यांचा अवतार मानला जातो. त्यांचा जन्म कधी झाला हे माहिती नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या वयाच्या ३०व्या वर्षी १८७८च्या फेब्रुवारी महिन्यात २३ तारखेला दिसले. त्यानुसार भाविक ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा करतात. शेगांवातील बंकटलाल आणि दामोदर यांनी एका तरुणाला देवीदास पातूरकर यांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शितं वेचून खात असताना पाहिले. नंतर गाईगुरांच्या हौदातील पाणी पिऊन ही व्यक्‍ती निघून गेली. तेव्हा त्यांची लक्षणं पाहून हे थोर संत आणि योगीपुरुष असल्याची जाणीव बंकटलालांना झाली. बंकटलालांना ‘श्रीं’बद्दल आदर वाटल्याने त्यांनी गजानन महाराजांची घरी नेऊन पूजा केली. दरम्यान, एकदा छत्रपती शिवजयंतीच्या प्रित्यर्थ भरवलेल्या सभेत लोकमान्य टिळक आणि श्री गजानन महाराज एकत्र आले होते, अशी शेगाव संस्थानी नोंद आहे. ‘गणी गण गणांत बोते’ असे भजन महाराज सतत म्हणत असत.
यात ‘गणी’ म्हणजे – विचार कर किंवा लक्षात घे.
‘गण’ म्हणजे – जीवात्मा.
‘गणांत’ म्हणजे – ब्रह्माहून वेगळा नसलेला, जीव हाच ब्रह्म आहे.
‘बोते’ म्हणजे – जयजयकार कर.
असा त्याचा संदेश होता. म्हणूनच लोक त्यांना ‘श्री गजानन महाराज’ म्हणून संबोधू लागले.
त्यांना लोक बहुमोल वस्त्रे, अलंकार, पैसा, खाद्यपदार्थ देत पण ते तिथेच सोडून कोठेही निघून जात. महाराज कोठेही राहत असत आणि कधीही-कुठेही मुक्तपणे संचार करत असत. आपले अवतारकार्य संपत आल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी आपल्या भक्तांना तसे सूचित केले आणि ८ सप्टेंबर १९१० रोजी ते शेगांवातच समाधिस्त झाले.

विठ्ठलाची आज्ञा आणि शेगावातच समाधी
महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे व्यवस्थित सांगितले. त्यांनी गोविंदपंत टाकळीकर या कीर्तनकारास उपदेश दिला, की त्याने ‘पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नये.’ आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगांवात व्यतीत केला असला, तरी महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झाली. महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. त्याचप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. असे म्हटले जाते, की पंढरपूर येथेचे श्री विठ्ठलाच्या चरणी समाधी घेण्याचा त्यांचा मानस होता. परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरवला. असे म्हणतात, की ‘पंढरपूर हे संतांचे माहेर घर, तर शेगांव हे भक्तांच’!

पंढरपूर वारीत मानाची पालखी
संत गजानन महाराज समाधी सोहळा १९१० मध्ये झाला. १९६७ पासून श्री गजानन महाराज पालखी माध्यमातून खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले. श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होते. देहू, आळंदीनंतर याच पालखीला सर्वाधिक महत्त्व आहे. शेगावची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालखीसोबत विदर्भाचे, खानदेशाचे आणि मराठवाड्याचे असंख्य वारकरी वारीला निघतात. दरवर्षी हे वारकरी परंपरेनुसार, नामस्मरण करत भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात. पालखी अश्व, गज, अंबारीसह निघते. या पालखीची शिस्तबद्धता अर्वणनीय असते.

शेगावी भरतो कीर्तनमेळा
श्री गजानन महाराज संस्थानाद्वारे प्रामुख्याने श्री प्रगटदिन, श्रीरामनवमी, श्री पुण्यतिथी हे तीन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येतात. यासाठी हजारो वारकरी आपल्या दिंड्या घेऊन येतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था संस्थानामार्फत करण्यात येते. वारकऱ्यांच्या विसावा किंवा विहार यापैकी एका परिसरात कीर्तनाची व्यवस्था करण्यात येते. कीर्तनासाठी संस्थानच्या नैतिक शिक्षण विभागामार्फत निमंत्रित कीर्तनकार महाराजांचे कीर्तन ठेवण्यात येते.

शेगाव संस्थानचे वारकऱ्यांशी संबंधित उपक्रम
वारकरी शिक्षण संस्था : श्री गजानन महाराज संस्थानद्वारे संचलित वारकरी शिक्षण संस्था १९७६ मध्ये वै. श्री ह. भ. प. मामासाहेब दांडेकर यांच्या हस्ते स्थापन करण्यात आली. १९६७ ते २०२०पर्यंत ६,१७६ विद्यार्थ्यांनी या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतले आहे. यापैकी उत्कृष्ट प्रवचनकार, मृदंगवादक, गायक असे ५६० विद्यार्थीं तयार झाले असून पैकी २०० उत्कृष्ट कीर्तनकार आहेत.

पंढरपूर पालखी : भक्त आणि भाविकांना तीर्थयात्रा घडाव्यात आणि वारकरी सांप्रदायाच्या महान परंपरेची जपणूक व्हावी या उद्देशाने श्री गजानन महाराज संस्थानने १९६८ पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी आणि श्री क्षेत्र आळंदीला मोटारीने पालखी दिंडीसह नेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. याशिवाय श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्री क्षेत्र पैठण, श्री क्षेत्र मुक्ताईनगर या ठिकाणी देखील संस्थानची वारीनिमित्त पालखी जात आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाताना वारकरी दरवर्षी सोबत निघतात.

भजनी साहित्य विनामूल्य : वारकरी संप्रदायाबद्दल विशेष महत्व असल्याने संस्थानतर्फे विविध गावांमधील भजनी दिंड्यांना नियमानुसार पूर्तता केल्यानंतर १० टाळजोड, १ मृदंग, १ वीणा असे भजनी साहित्य विनामूल्य वितरित करण्यात येते. तसेच वारकरी दिंड्यांना आवश्‍यकतेनुसार श्री ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत तसेच श्री तुकाराम गाथा यांसारख्या अजोड आणि अद्वितीय ग्रंथांच्या प्रतींचे विनामूल्य वितरण केले जाते. आजपर्यंत एकूण १८,८२२ दिंड्यांना भजनी साहित्य वितरित करण्यात आले आहे.

वारकरी प्रशिक्षण शिबिर : इयत्ता ८ ते १२ वी शिक्षण असलेल्या तसेच आर्थिक दुर्बल स्थितीमुळे पुढे शिक्षण घेऊ न शकलेल्या वयवर्षे १५ ते ३० अशा वयोगटातील विद्यार्थ्यांना वारकरी प्रशिक्षण देण्यात येते. या शिबिराचा प्रशिक्षण कालावधी १ महिन्याचा असून मुलांची नि:शुल्क निवास, भोजनादी व्यवस्था श्री संस्थेमार्फत केली जाते.

शैक्षणिक क्षेत्र : शेगाव येथील श्री गजानन महाराज ट्रस्टतर्फे इंग्लिश मीडियम स्कूल, इंजिनिअरिंग कॉलेज चालवले जाते. शिवाय, होतकरू आणि गरजू मुलांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. संस्थेच्या शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रांत मोठे यश मिळवले आहे.

वैद्यकीय क्षेत्र : संस्थानतर्फे रुग्णांना विनामूल्य औषधोपचार मिळवून दिले जातात. मंदिराच्या आवारातील वास्तूत होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि ऍलोपॅथी हे तीनही प्रकारचे औषधालय विभाग संस्थानने सुरू केले आहेत. शिवाय, दिव्यांग मदत युनिट, फिजीओथेरपी, पॅथॉलॉजी विभाग आहे. तज्ज्ञ डॉक्‍टरांची नियुक्ती करून त्यांच्याद्वारे गरीब रुग्णांना तपासणे, औषध, इंजेक्‍शन आणि सलाईन देणे इत्यादी सेवा संस्थान करत आहे.

सामाजिक क्षेत्रातही शेगाव संस्थानचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे. यात प्रामुख्याने वाचनालये उभारणे, आदिवासी बांधवांना कपडे-मिष्टान्न वाटप, अवर्षणग्रस्त भागातील नागरिक आणि गुरा-ढोरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था, देशी वृक्षांची वाटिका, आजपर्यंत संस्थानने १ लक्ष वृक्षांचे रोपण आणि संवर्धन, गरजू संस्थांना रोपांचे विनामूल्य वितरण केले आहे. संस्थानातर्फे अग्निशमन सुविधादेखील पुरवली जाते.
अशा या श्री संत गजानन महाराज आणि त्यांच्या कार्याला ।।ज्ञानबातुकाराम।। परिवारातर्फे त्रिवार अभिवादन…🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *