शैव-वैष्णवांना एकत्र करणारे

संत मांदियाळीतील थोर संत

शैव-वैष्णव परंपरेचा भक्कम सेतू म्हणून वारकरी नरहरी सोनार यांच्याकडे पाहतात. पंढरपूरच्या वाळवंटात अठरा पगड जातीतील संतांनी एकत्र येऊन भागवत धर्माचा अर्थात वारकरी संप्रदायाचा पाय रचला. त्या पायातील एक मजबूत चिरा म्हणून नरहरी महाराज सोनार यांच्याकडे पाहिले जाते. जात, धर्म, पंथ, वंश, लिंग या भेदाच्या पलिकडे जाऊन एका मानव धर्माचा पाया ज्या संतांनी घातला त्यात नरहरी महाराज एक होते.

– ह. भ. प. श्यामसुंदर महाराज सोन्नर

भक्ती परंपरेची किचकट कर्मकांडं आणि वर्णव्यवस्थेच्या विषमतावादी व्यवस्थेने केलेली कोंडी फोडण्यासाठी वारकरी संप्रदायाचा खेळ पंढरपूरच्या वाळवंटात मांडला गेला. या मांडलेल्या खेळाने ‘क्रोध अभिमान पावटणी’ झाला, परिणामी अगोदरच्या भक्ती परंपरेत एकालाच कुणाला श्रेष्ठ मानून त्याच्या पायावर लोटांगण घालण्याची जी सक्ती होती ती सहज बाजूला पडली. ‘नवनितासारखी चित्ते निर्मळ’ झाल्यामुळे वर्ण अभिमान आणि त्यातून आलेली जात या सर्वांचा विसर पडला. ‘एकमेका लोटांगणे जाती’ ही अनुभूती मिळू लागली. कर्मकांडाला भगवंताच्या नामाचा सोपा पर्याय दिल्याने भक्तीच्या अवघड वाटा मोडून टाकून स्वल्प वाटे जाण्याचा डांगोरा पिटण्यात आला. ही पायवाट सोपी करण्यामध्ये जे सुरुवातीचे विविध जातीतील संत होते, त्यात नरहरी महाराज एक होते.

सुरुवातीलाच म्हटल्या प्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये विविध जात-धर्माचे संत जसे एकरूप झालेले दिसतात तसेच विविध पंथातील संत एकत्र आलेले दिसतात. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडे हे नाथ संप्रदायाचे आहेत, तुकाराम महाराज चैतन्य संप्रदायाचे आहेत, एकनाथ महाराज दत्त संप्रदायाशी संबंधित आहेत. नरहरी महाराज यांची गुरू परंपरा नाथ पंथाची आहे. खरे तर अगोदर शैव पंथीय असणारे नरहरी महाराज पुढे हरीचे दास कसे झाले, याची कथा प्रसिद्ध आहे. परंतु गुरू परंपरेचा विचार करता वारकरी संप्रदायाचा पाया मानले जाणारे ज्ञानेश्वर महाराज यांचे गुरू निवृत्तीनाथ महाराज आणि नरहरी महाराज यांचे गुरू एकच होते ते म्हणजे गहिनीनाथ महाराज! गहिनाथ आपले गुरू असल्याचा उल्लेख नरहरी महाराज यांच्या अभंगातून अभिमानाने व्यक्त होतो. गुरू गैबीनाथ। नरहरी दास हा अंकित।। म्हणजे हा संदर्भ पाहता निवृत्तीनाथ महाराज आणि नरहरी महाराज हे गुरू बंधू होत. शैव ते वैष्णव व्हाया नाथ असा नरहरी महाराज यांचा अध्यात्मिक प्रवास दिसतो. शैव ते वैष्णव असा प्रवास असलेले नरहरी महाराज वारकरी होतात, तेव्हा त्यांच्या अभंगातून कुठेही कठोर, साधना, किचकट कर्मकांड याचे समर्थन दिसत नाही. तर वारकरी परंपरेने नाम साधनेचा सांगितलेला सोपा मार्ग नरहरी महाराज यांनी स्वीकारला होता आणि त्याच सोप्या भक्ती पंथाचा प्रचार आणि प्रसार केला. धर्माच्या नावाखाली कट्टरता निर्माण करणारांना नरहरी महाराज सगळ्या धर्माचे सार फक्त भगवंताचे नाम आहे, असे ठसवून सांगतांना म्हणतात- सकळ धर्माचे कारण। नामस्मरण हरिकीर्तन।।

वारकरी संत मालिकेतील बहुतेक संतांनी आपल्या जातीचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. मात्र आज दिसते तशी जातीय कट्टरता कुठेही आढळत नाही. जाती व्यवस्थेत प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र काम होते. या संताच्या अभंगात त्यांची जात आणि ते करीत असलेल्या कामातील अवजारे व इतर संबंधित प्रतिमाही मोठ्या प्रमाणात आढळतात. नरहरी महाराज यांचे अभंगही त्यात दिसतात. देवा तुझा मी सोनार। तुझ्या नामाचा व्यवहार।। हा असाच एक लोकप्रिय अभंग आहे. या अभंगात सोनार व्यवसायाशी संबंधित हातोडा, कात्री, तराजू आदी अवजारांचा उल्लेख या अभंगात आलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही सोमवारचे नित्यनेमाचे भजन भस्म उटी रुंड माळा। हाती तिरसूळ नेत्री ज्वाळा।। या नरहरी सोनार यांच्या अभंगाशिवाय पूर्ण होतच नाही. इतर भजनाच्या वेळी ‘देवा तुझा मी सोनार’ हे भजन ऐकायला मिळते. शास्रीय भजन गायकीची ‘बैठक’ असेल तेव्हा ‘चिताऱ्या चित्रे काढी भिंतीवरी’ हा अभंग मैफिलीत रंग भरतो. काही संतांना वेगवेगळ्या देवांचे अवतार मानण्यात येते. त्यात नरहरी सोनार यांना जाबुवंताचे अवतार मानण्यात येते. जाबुवंताचे कार्य राम आणि कृष्ण या दोन्ही अवतारात पहायला मिळते. राम अवतारामध्ये जाबुवंतांची भूमिका एका मार्गदर्शकाची राहिलेलेली आहे. ज्या ज्या मोठा काही पेच निर्माण होईल त्यातून अनुभवाचे चार बोल सांगून मार्ग काढण्याचे काम जाबुवंत करीत असत.

रावणाने सीता चोरून नेल्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या वेगळी पथके तयार करण्यात आली होती. त्यातील एक पथक दक्षिण दिशेला पाठविण्यात आले होते. त्या दिशेलाच सीता असणार अशी जास्त शक्यता होती. म्हणून युवराज अंगद यांच्या नेतृत्वाखालील पथक दक्षिण दिशेला पाठविण्यात आले होते. त्या पथकात रामाने अनुभवाचा लाभ व्हावा म्हणून जाबूवंताला पाठवाले होते. यावरून जाबुवंत यांचे स्थान किती महत्त्वाचे होते हे लक्षात येते. राम-रावण यांचे युद्ध होऊन राम विजयी झाले. सीतेला रावणाच्या बंदीतून मुक्त करण्यात आले. या युद्धात ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्यांना योग्य प्रकारचे बक्षीस देऊन रामाने त्यांचा सत्कार केला. जाबुवंत यांची वेळ आली तेव्हा त्यांनी कोणतेही बक्षीस घेण्यास नकार दिला. तेव्हा रामाने जाबुवंत यांना त्यांची इच्छा विचारली. तेव्हा जाबुवंत म्हणाले मला इतर कोणतीही गोष्ट नको, फक्त रामप्रभू आपण एक वेळ माझ्या सोबत कुस्ती खेळावी. रामाने जाबुवंताची ती मागणी मान्य केली, पण या अवतारात नव्हे तर पुढील कृष्ण अवतारात ती पूर्ण केली जाईल, असे सागितले.

कृष्ण अवतारात अस्वलाच्या पावलांच्या ठशांचा माग काढत कृष्ण एका गुहेच्या दारात पोहचले. श्रीकृष्णाने आपल्या सैन्याला गुहेच्या दारात ठेवले आणि त्यांनी गुहेत प्रवेश केला. पुढे गेल्यानंतर जाबूवंत आणि कृष्ण यांचे घणघोर युद्ध झाले. हे युद्ध २६ दिवस सुरू होते. इकडे १२ दिवस कृष्ण परत आले नाहीत तेव्हा त्यांचे बरे-वाईट झाले, असेल असे समजून सर्व सैन्य द्वारकेला, परत आले. वसूदेव -देवकी यांच्यासह द्वारका नगरी शोकसागरात बुडाली. इकडे २६ दिवसांच्या युद्धानंतर जाबुवंत जर्जर झाले आणि त्यांनी आपले स्वामी रामाचे स्मरण केले. तेव्हा श्रीकृष्णानेच रामरूप धारण केले. राम आल्याचे पाहून जाबुवंतांनी पायावर लोळण घेतले. मग कृष्णाने सांगितले की, राम अवतारात तुम्हाला जे कुस्ती खेळण्याचे वचन दिले होते ते मी या अवतारात पूर्ण केले. त्यावर जाबुवंत यांना खूप आनंद झाला. त्यांनी आपली कन्या जाबुवंतीचा यांचा विवाह कृष्ण यांच्याशी लावून दिला सोबत सिमंतक मणीही दिला. त्यांचे भगवंताबरोबर मल्लयुद्ध करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. लाडकी मुलगी जाबुवंती हिचा विवाह भगवंताशी झाला.

आता आपली कोणतीही इच्छा शिल्लक उरली नाही म्हणून जाबुवंत निजधामाला जायला निघाले, तर कृष्ण द्वारकेकडे जायला निघाले. त्यावेळी एक अघटित घडले. जाबुवंती लहान असताना तिला खेळण्यासाठी एक मनुष्याकृती खेळणे तिच्या पाळण्यावर बांधलेले होते. कृष्ण आणि जाबुवंत दोन्ही दोन दिशेला निघाले तेव्हा तेव्हा ते मनुष्याकृती खेळणे अचानक बोलू लागले. तुम्ही दोघे निघून जाताय पण माझे काय? तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की माझ्या पुढच्या अवतारात माझे परम भक्त होऊन तुम्ही समजाला मार्गदर्शक ठराल. जाबुवंतीच्या पाळण्यावरील नर रूपी खेळण्याचा उद्धार हरीने केला. तेच भगवंत कटेवर कर ठेऊन विठेवर उभे राहिले तेव्हा नरहरी म्हणून आले, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे.

आपल्या कर्मालाच भक्तीचे रूप देऊन कामातच ईश्वराचे पाहणाऱ्या, किचकट कर्मकांडाला नाम साधनेचा सोपा पर्याय देणाऱ्या वारकरी परंपरेचे महत्वाचे संत म्हणून नरहरी सोनार यांच्याकडे पाहिले जाते. शैव-वैष्णवातील दरी कमी करण्याचे काम त्यांनी केले. म्हणून शैव-वैष्णवातील सेतू म्हणूनही नरहरी महाराज यांच्याकडे पाहिले जाते. आजही त्यांचे साहित्य सामाजिक ऐक्य साधण्याचे कार्य करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.