तीर्थक्षेत्र देहू नगरीमध्ये

विविध कार्यक्रमांचे आयोजन

जगद्‌गुरू जगद्‌वंदनीय भागवत संप्रदायाच्या इमारतीचा कळस होण्याचे महद्‌भाग्य ज्यांना प्राप्त झाले असे महाराष्ट्राचं भूषण असलेल्या संत तुकाराम महाराजांचा आज जन्मदिवस. माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमी. या दिवशी बोल्होबा आणि कनकाई यांच्या पोटी देहूगाव येथे १६०८ मध्ये तुकोबारायांचा जन्म झाला.

आम्ही वैकुंठवासी। आलो याची कारणासी।।
बोलिले जे ऋषी। साच भावे वर्तया।।
घेईन मी जन्म याजसाठी देवा।
तुझी चरणसेवा साधावया।।
या अभंग उक्‍तीप्रमाणे संत महात्म्यांचे या इहलोकात येण्याचे प्रयोजन संत तुकाराम महाराज सकल जनांना सांगत आहेत. आम्ही मूळचे कुठले आहोत आणि या मृत्यूलोकामध्ये येण्याचे कारण म्हणजे,
बुडते हे जन न देखवे डोळा।
येतो कळवळा म्हणोनिया।।
या उद्देशाने संतांनी जीवनभर समाजप्रबोधन केले. माघ शुद्ध पंचमीलाच वसंत पंचमी असे म्हणतात. त्याचप्रमाणे तिला ज्ञानपंचमी असेही म्हणतात. या दिवसापासून वसंत ऋतूला सुरुवात होते. या ऋतुला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याच दिवशी संत तुकाराम महाराजांचा जन्म झाल्याने भारतीय संस्कृती आणि वारकरी संप्रदायामध्ये वसंत पंचमीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. परंतु वसंत पंचमी आणि संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस याविषयी सर्वसामान्य नागरिकांना फारशी माहिती नाही. देहूगावात तुकाराम बीज उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्या तुलनेत संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवसाला देहूत कमी गर्दी असते. गेल्या १० ते १५ वर्षांपासून देहूगावात संत तुकाराम महाराजांचा जन्मोत्सवानिमित्त कीर्तन महोत्सव तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

वसंत पंचमीपासून मुख्य मंदिरात जन्मोत्सवाचा सप्ताह आयोजित केला जात आहे. तसेच काही ठिकाणी कीर्तन महोत्सव साजरा करण्यात येतो.
परंतु मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर कीर्तन महोत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर मर्यादा आली आहे. जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. यावर्षी देखील वसंत पंचमीनिमित्त विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात जन्मोत्सवाचा सप्ताह आयोजित केला आहे.
आज वसंत पंचमीनिमित्त मुख्य मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच कीर्तन, प्रवचन, पूजा आदी कार्यक्रम मंदिरात सुरू आहेत.
जन्मोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच रांगोळी काढण्यात आली आहे. पहाटेच्या चौघडा वादनाने देहूनगरी दुमदुमून गेली. टाळ, मृदंग आणि नामाच्या जयघोषाने देहूनगरीचे वातावरण मंगलमय बनले आहे.

– ह. भ. प. उमेश महाराज अनारसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *