विश्वात भारतीय संस्कृती ही अनेक दृष्टीने श्रेष्ठ आहे. या संस्कृतीने जगाला प्रदान केलेली अनमोल देणगी म्हणजे सद्गुरू परंपरा. आदिनाथ शंकरांपासून सुरू झालेली ही नाथ परंपरा श्री ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत आली. ज्ञानदेवांच्यानंतर अनेक ठिकाणी या परंपरेच्या शाखा वाढल्या. दक्षिण काशी करवीर नगरीमध्ये नाथसंप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचा सुरेख संगम असलेले ठिकाण आहे, विश्वपंढरी…

या परंपरेत ज्ञानेश्वर महाराजांनंतर श्री देवनाथ महाराज, श्री चुडामणीनाथ महाराज, श्री गुंडा महाराज, श्री रामचंद्र महाराज (बुटी), श्री महादेवनाथ महाराज, श्री रामचंद्र महाराज तिकोटेकर आणि विश्वनाथ महाराज रुकडीकर, गोविंदनाथ महाराज, माधवनाथ महाराज म्हणजेच दादामहाराज आणि आनंदनाथ महाराज अशी ही परंपरा सुरू आहे. दादा महाराजांनी सदगुरू श्री विश्वनाथ महाराजांचा पुण्यतिथी उत्सव सोहळा १९७९मध्ये सुरू केला. आजतागायत तो उत्सव सुरू आहे. सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण, सोहळा, प्रवचने, भजन-कीर्तनात साधक रंगून जातात.

याच नाथ संप्रदाय परंपरेतील विश्वनाथ महाराज रुकडीकर यांचा जन्म कोल्हापूरजवळील पेठवडगाव येथे १८४३मध्ये झाला. लक्ष्मणराव श्रीखंडे हे त्यांचे वडील, तर विश्वनाथ हे त्यांचे सर्वात कनिष्ठ अपत्य. त्यांचे नाव लहाणपणी गोविंद असे होते. बालपणीच माता-पित्याचे हरपले आणि आजोबा हेरवाडकरांच्या आजोळी ते दत्तक गेले. भावाच्या औषधोपचारासाठी ते पंढरपुरात आले. त्यामुळे त्यांना पांडुरंगाचे दर्शन आणि संतांचा सहवास लाभला. येथे गुदोजी बुवांच्या मठात ज्ञानेश्वरीत आणि चक्रीभजनात विश्वनाथ महाराज सदैव मग्न असत.

त्यानंतर महाराज सद्गुरूच्या शोधार्थ घराबाहेर पडले. दक्षिण काशी श्री क्षेत्र करवीर, येथे चातुर्मास सुरू असता विश्वनाथ महाराज करवीरी परतले. तेथे त्यांना रामचंद्र महाराज तिकोटेकर यांचा अनुग्रह प्राप्त झाला. त्यांनी श्री ज्ञानेश्वरी उपासनेचा आदेश दिला. विश्वनाथ महाराज व्यास मठात पारायण करू लागले. त्यावेळी त्यांची साधना आणि अनुष्ठान पाहुन रामचंद्र महाराजांनी त्यांना गुरूमंत्र दिला आणि गोविंद हे ‘विश्वाचा नाथ’ म्हणजे विश्वनाथ झाले. फक्त अनुग्रहच नव्हे, तर परंपरा पुढे चालविण्याचा आदेशही मिळाला. त्यानंतर विश्वनाथ महाराजांनी आपले मूळगाव अर्थात पेठवडगाव गाठले. महाराजांनी पांडुरंगाच्या मंदिरात ज्ञानेश्वरी निरुपण कीर्तन सुरू केले.
विश्वनाथ महाराजांचे शिष्य नारायण अनंत कुलकर्णी हे रुकडी येथे राहत. पुढे महाराजांचे वास्तव्य त्यांच्याकडे राहिले. येथे त्यांचे त्रिकाल स्नान, ज्ञानेश्वरी वाचन आणि साधना हे अखंड सुरू असे. ते चाळीस वर्षे रुकडीतच राहिले होते म्हणून त्यांना रुकडीकर म्हणू लागले. श्री रामचंद्र महाराज तिकोटेकर वर्षातून एकदा रुकडीस येत. त्या वेळी ज्ञानेश्वरी, सप्तशती यांची पारायणे होत. हा सप्ताह अत्यंत भक्तीभावाने होत असे. पुढे पट्टशिष्य बाबा वैद्य यांच्या आग्रहावरून विश्वनाथ महाराज १९१७ मध्ये पुण्यात आले. विश्वनाथ महाराजांची अनेक शिष्यमंडळी होती. ज्ञानेश्वरी सप्ताह साजरा झाल्यानंतर महाराज आजारी पडले. ते माघ शुद्ध तृतीया, १९१८ या दिवशी समाधिस्थ झाले. कोल्हापुरास पंचगंगेच्या तीरावर त्यांनी पूर्वीच आपल्या समाधीची जागा दाखवली होती, तेथेच समाधी बांधण्यात आली, असे भक्त सांगतात.

ट्रस्टचे सामाजिक कार्य :
सद्गुरू दादा महाराज सांगवडेकर यांनी निर्माण केलेला श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक कार्याद्वारे समाजामध्ये नीतीमूल्यांची जोपासना करण्याचे कार्य करत आहे. यात ट्रस्टतर्फे वृद्धाश्रम, कष्टधाम, दिव्यांग पुनर्वसन संस्था, पूरग्रस्त, एड्सग्रस्त लहान मुले, अनाथ मुले, अन्नदान सेवा, दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम साधनांचे वाटप असे उपक्रम राबवले जातात.

विद्यार्थ्यांना मदत :
गरीब आणि गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी मार्गदर्शन, सुसंस्कार वर्ग, वाचनालय, सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात.

धार्मिक कार्यक्रम :
विविध मान्यवर सत्पुरुषांच्या प्रवचन, कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन, भजन, अभंग गायन कार्यक्रम, फलटण ते पंढरपूर पायी चालत आषाढी वारी,गुरुपौर्णिमा कार्यक्रम, ध्यान धारणा शिबीर, ज्ञानेश्वरी, गुरुचरित्र, सिद्धचरित्र आदी पौराणिक ग्रंथाचे सामुदायिक पारायण आयोजित केले जाते.

वैद्यकीय उपक्रम :
गरीब, गरजू रुग्णांना मोफत आयुर्वेदिक औषधोपचार.
सुसज्ज श्री विश्वती आयुर्वेदिय पंचकर्म चिकित्सालय आणि संशोधन केंद्र.
श्री विश्ववती आयुर्वेदिय उत्पादने.
विविध कार्यक्रमाचे औचित्य साधून आरोग्य शिबिरांचे आयोजन.
आषाढी वारीदरम्यान फलटण ते पंढरपूर मार्गावर मोफत आयुर्वेदिक उपचार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *