डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पाठपुरावा

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत अससेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ७३ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे श्री विठ्ठल मंदिराच्या मूळ रुपाचे संवर्धन होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

शेकडो वर्षांपूर्वी उभारलेले पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर हे वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमुना आहे. त्याचे मूळ रुपात जतन व्हावे यासाठी मंदिर समितीने आराखडा तयार केला आहे. तो विचारात घेऊन भारतीय पुरातत्व खात्याने मंदिराची पाहणी करुन आराखड्यास मंजुरी दिली होती.

त्यानंतर या आराखड्यास राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा होती. अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मंदिर विकासासाठी राज्य सरकारने ७३ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद केली आहे. यासाठी विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सतत पाठपुरावा केला होता.

काय काम होईल?
काळाच्या ओघात मंदिरातमध्ये अनेक बदल झाले आहेत. तसेच या पुरातन मंदिराला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत.
कोरोनाकाळात मंदिराचे उत्पन्नही घटले होते. त्यामुळे मंदिर समितीने राज्य सरकारकडे निधीची मागणी केली होती.
आराखड्यानुसार विठ्ठल मंदिर आणि सभामंडप, रुक्मिणी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, नामदेव पायरी आणि नगारखाना, पडसाळी, स्माल टेंम्पल, विनायक मंदिर, व्यंकटेश मंदिर, टेन्साईल वर्क, दर्शनबारी, स्ट्रक्चरल ऑडीट, वॉटर सप्लाय आणि ड्रेनेज, इलेक्ट्रीकल वर्क, साऊंड सिस्टीम, फायर फायटींग सिस्टीम, लक्ष्मण पाटील देवस्थान, अंबाबाई मंदिर, श्री रोकडोबा मंदिर, श्री सोमेश्वर मंदिर, श्री विठ्ठल मंदिर सभामंडप सागवाणी काम आणि इतर देवतांच्या मंदिराचा विकास केला जाणार आहे.

मला आभाळ ठेंगणे वाटत आहे
– सुनील उंबरे, ज्येष्ठ पत्रकार

आदरणीय नीलमताई,
आपले आभार व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत… नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात श्री विठ्ठल मंदिर संवर्धनासाठी ७३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मिळाल्याचा, मला एवढा आनंद झाला आहे, की आभाळ देखील ठेंगणे वाटू लागले आहे. माझ्या आनंदाचे खरे वाटेकरी तत्कालीन प्रांताधिकारी तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी श्री सचिन ढोले साहेब व श्री सुनील जोशी साहेब या दोन सन्माननीय व्यक्ती आहेत.

श्री विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचा विषय श्री ढोले यांच्या संकल्पनेतून पुढे आला अन् साहेबांनी तो माझ्या निदर्शनास आणून दिला. या विषयात तुम्ही लक्ष घाला आणि ताईकडे याचा पाठपुरावा करा. श्री विठ्ठल मंदिर संवर्धनाचे फार मोठे काम मार्गी लागू शकते, असा विश्वास ढोले साहेबांनी मला दिला.

श्री ढोले साहेबांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आदरणीय ताईकडे मी विषय मांडला. ताईंनी हा विषय गांभीर्याने घेत मुंबईतील विधानभवनामध्ये याविषयी भारतीय पुरातत्व विभागाची विशेष बैठक बोलाविली. या बैठकीला ताईंनी मला आवर्जून बोलाविले,
बैठक अतिशय सकारात्मक झाली आणि या विषयाला चालना मिळाली. संवर्धन आराखड्याच्या कामाचा खटाटोप सुरू असताना श्री ढोले साहेबांची बदली झाली आणि श्री जोशी यांची नियुक्ती झाली.

जोशी साहेबांसाठी हा विषय तसा नवीन, ते या विषयाचा पाठपुरावा करतील की नाही याविषयी माझ्या मनात शंका होती. मात्र माझी शंका फोल ठरली. जोशी साहेबांनी नव्या जोमाने हा विषय हातात घेतला. निधीची उपलब्धता होण्यापूर्वीच लॉकडाऊनच्या संधीचा लाभ उठवीत जोशी साहेबांनी मंदिरातील छोटीमोठी संवर्धनाची अनेक कामे हातात घेतली आणि लॉकडाऊन उठण्यापूर्वी ती पूर्णही केली. याकामी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी मोलाची साथ दिली. दरम्यान लॉकडाऊन पडल्यामुळे मुंबईच्या बैठकांना ब्रेक लागला.

लॉकडाऊनचा अडसर दूर करून विषयाला गती देण्यासाठी माझा प्रयत्न सुरू होता. यातून मार्ग काढण्यासाठी ताईंनी ऑनलाईन बैठक घेण्याचा निर्णय घेतला आणि विषयाला पुन्हा चालना मिळाली.

ताईंच्या निर्देशानंतर भारतीय पुरातत्व विभागाचे एक पथक पंढरीत दाखल झाले त्यांनी दोन महिने तळ ठोकून श्री विठ्ठल मंदिराची बारकाईने पाहणी केली. शेकडो वर्षांपूर्वी उभारलेल्या या मंदिराचे प्राचीन सौंदर्य खुलविणे, मंदिर अधिक भक्कम कसे करता येईल यासाठी प्रयत्न करणे, देवाच्या मूर्तीचे संवर्धन, भाविकांना सुलभ अन् तत्पर दर्शन देण्यासाठी आवश्यक ते बदल करणे आदी विषयांवर अभ्यासपूर्ण आराखडा तयार करण्यात आला.

त्यासाठी ७३ कोटी ८० लाख रुपयांचे प्राथमिक अंदाजपत्रक भारतीय पुरातत्व विभागाने काढले. ७३ कोटींचे अंदाजपत्रक पाहून मी तर गर्भगळीत झालो. मंदिराच्या संवर्धनासाठी एवढा मोठा निधी मिळेल का, याविषयी माझ्या मनात शंका होती.

पण करताकरविता विटेवर उभा आहे तो ताईंना शक्ती देईल आणि करून घेईल याची खात्री होती. अगदी तसंच झालं. या विषयाची शेवटची बैठक पंढरपूरमध्ये पार पडली. भारतीय पुरातत्व विभागाने प्रोजेक्टरवर प्रस्तावित आराखडा सादर केला. आराखडा पाहून ताई खूपच खूष झाल्या निधीची चिंता करू नका, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्याला मदत करतील याबाबत त्यांनी खात्री दिली. शब्द दिल्याप्रमाणे ताईंनी आपल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढून शासन दरबारी या निधीसाठी आपले वजन खर्ची टाकले.

खरं तर आदरणीय डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. ताई शिवसेनेच्या नेत्या, आमदार तर आहेतच शिवाय विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. महिलांच्या विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी त्यांचे राज्यभर दौरे असतात. सामाजिक कामात त्या सतत कार्यमग्न असतात. या कार्यबाहुल्यातून वेळ काढून ताईंनी श्री विठ्ठल रखुमाईच्या चरणी आपली सेवा रुजू केली. यातून त्यांचे पंढरपूरकरांविषयी आणि वारकरी भाविकांप्रती असलेले भावनिक नाते, भक्ती, श्रद्धा अन प्रेम व्यतीत होते. ताई, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवून या कार्यात मला सहभागी करून घेतले, सेवा करण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी स्वतः तसेच तमाम पंढरपूरकरांच्या आणि वारकरी भाविक भक्तांच्या वतीने आपले शतशः आभार धन्यवाद व्यक्त करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *