कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे

जाताना सांगोल्याजवळ अपघात

सांगोला : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या ८ वारकऱ्यांवर काळाने घाला घातला आहे. आज (दि. ३१ ऑक्टोबर) सायंकाळी सात वाजता सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे दिंडीत कार घुसून हा अपघात झाला. या दुर्घटनेत ६ जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे मागून कार घुसली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात ८ वारकऱ्यांचा मृत्यू झाला. या अपघातात ६ वारकरी जखमी असल्याची माहिती मिळत आहे. आज (दि. ३१ ऑक्टोबर) सायंकाळी सात वाजता ही दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील बायपास रस्त्याजवळून चालली होती. त्याच वेळी मिरजेकडून भरधाव वेगाने येणारी कार ( क्र. एमएच १२ डीई ८९३८) दिंडीत घुसली आणि भजन करत चाललेल्या वारकऱ्यांना चिरडत पुढे जाऊन थांबली. यात ८ वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.

या दिंडीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जठारवाडी गावातील ३२ वारकरी होते. त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ५ महिला, २ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

अपघात झालेली कार सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील असल्याचे समजते. कारमधील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातात जखमी झालेल्या ६ वारकऱ्यांवर सांगोला येथे उपचार सुरू आहेत. सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर
दरम्यान, मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आणि या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब उपचार देण्याचे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला, याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *