माऊलींच्या सोहळ्याचे वैभव वाढविण्यासाठी
समन्वय, सहकार्याची गरज : ॲड. ढगे पाटील
लोणंद : आळंदी प्रस्थानापासून ते पंढरपूरपर्यंत पालखी सोहळा व्यवस्थित चालावा यासाठी प्रत्येकाने ‘माझा सोहळा माझी जबाबदारी’ म्हणून करावे, एकमेकांना सहकार्य करावे, असे आवाहन माऊलींच्या पालखा सोहळ्याचे प्रमुख अॅड. विकास ढगे पाटील यांनी आज (दि. २९) येथे केले.
लोणंद येथील पालखी तळावर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजाची बैठक श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या पालावर श्री गुरु हैबतबाबा आरफळकर यांचे प्रतिनिधी ऋषीकेश आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत दिंडी प्रमुखांनी आपल्या अडचणी मांडल्या. या बैठकीस संस्थानचे अध्यक्ष योगेश देसाई , व्यवस्थापक माऊली वीर यांच्यासह दिंडी प्रमुख उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सोहळ्याचे वैभव वाढविण्याची जबाबदारी ही केवळ एकट्या संस्थानची नसून वारकरी आणि प्रशासनाचीही आहे. या सर्वांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे, असे मत यावेळी ॲड. ढगे पाटील यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, पालखी सोहळ्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. माऊलींच्या सोहळ्यात नोंदणी केलेल्या ४२७ दिंड्यांत सुमारे चार लाख समाज आहे, तर नोंदणी न केलेला सुमारे एक लाख समाज आहे. सोहळ्यात नोंदणी केलेली लहान मोठी सुमारे चार हजार वाहने आहेत, तर नोंदणी न केलेली तीन साडेतीन हजार वाहने आहेत. लहान मोठे व्यापारी, खेळणी विक्रेते, चहा हॉटेल व्यावसायिक अशा लोकांची वाहने वेगळी आहेत. या सर्वांचा ताण पोलीस प्रशासनावर पडतो. जी अधिकृत पासधारक वाहने आहेत, त्यांना अगोदर रस्ता करून द्यावा अशा सूचना पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. त्यादृष्टीने पोलीस सहकार्य करतील, परंतु दिंडी प्रमुखांनीही त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
यावेळी दिंडी समाज सोहळ्याचे अध्यक्ष भाऊसाहेब गोसावी, सचिव मारुती कोकाटे, राणा महाराज वासकर, भाऊसाहेब फुरसुंगीकर, उध्दव चोपदार, भागवत चवरे, सोपान टेंबुकर, देवीदास ढवळीकर, योगेश आरू, आबासाहेब चाकणकर, एकनाथ हांडे आदींनी आपले विचार मांडले.