यात्रोत्सव चालणार ९ एप्रिलपर्यंत
कार्ला : संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी, आगरी बांधवांचे कुलदैवत असणाऱ्या एकवीरा देवीच्या चैत्री यात्रोत्सवास आजपासून (दि. ७) सुरुवात झाली आहे. काल संध्याकाळी (दि. ६) आईचे माहेरघर असणाऱ्या देवघर येथे भैरवनाथ देवाच्या पालखीने यात्रेचा शुभारंभ झाला. हा यात्रोत्सव शनिवारपर्यंत (दि. ९) एप्रिलपर्यंत चालणार आहे.
शुक्रवारी (दि. ८) चैत्र शुद्ध सप्तमीला सायंकाळी सात वाजता मुख्य यात्रा म्हणजे श्री आई एकवीरा देवीचा पालखी सोहळा, तर शनिवारी (दि. ९) एप्रिलला पहाटे तेलवानाचा कार्यक्रम मांगल्यपूर्ण वातावरणात होणार आहे.
या काळात वेहरगावात एकवीरा मंदिरात येणाऱ्या भाविकांना योग्य प्रकारे दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी मावळचे तहसीलदार मधुसूधन बर्गे, लोणावळा पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील, लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, सरपंच अर्चना देवकर, उपसरपंच काजल पडवळ, मंडल अधिकारी माणिक साबळे, तलाठी मीरा बोऱ्हाडे, वनविभाग अधिकारी प्रमोद रासकर, एकवीरा देवस्थान व्यवस्थापक मंगेश गायकवाड, वीज अभियंते अक्षय पवार, पोलीस पाटील अनिल पडवळ तसेच विविध शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन यात्रेचे नियोजन केले गेले आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी आणि यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील, लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्यासह २३ सहायक पोलीस निरीक्षक, १९८ पोलीस अंमलदार, ८० महिला पोलीस कर्मचारी, १५० होमगार्ड, शीघ्र पोलीस दल तुकड्या, स्ट्रायकिंग पथक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तैनात केले जाणार आहेत. तसेच फटाके, पशुहत्या यावर बंदी घालण्यात आली आहे.
यंदा गर्दी वाढणार
कोरोनानंतर दोन वर्षांनी यात्रा होत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. यात्रेदरम्यान कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मावळ प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या वेळी यात्राकाळात कार्ला परिसरातील गावांत तीन दिवस पूर्णपणे दारुबंदी, तर यात्राकाळात डीजे आणि फटाके बंदी करण्यात आली आहे. कार्ला फाटा या ठिकाणी प्रत्येक वाहनाची तपासणी करून गडावर दारू जाणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच २४ तास अखंडित वीजपुरवठा ठेवण्यात येणार आहे.