प्रमुख विश्वस्त योगेश देसाई
भेटले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना
दिल्ली : येथील राष्ट्रपती भवनात भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आज (दि. १० ऑगस्ट) आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी भेट घेऊन त्यांना राष्ट्रपती पदावर निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्या समवेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी श्री ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती, श्री ज्ञानेश्वरी आणि संत तुकाराम महाराजांचा गाथा देऊन राष्ट्रपतींचा सत्कार केला. तसेच माऊलींच्या संजीवन समाधीच्या सप्तशतकोत्तर (७२५) रौप्य वर्षानिमित्ताने यंदाच्या कार्तिकी यात्रेला श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी आळंदी येथे येण्याचे निमंत्रणही दिले.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनाही यावेळी देसाई यांनी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचे मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी योगेश देसाई यांनी वारकरी संप्रदाय, आषाढी पायी वारी, माऊलींची समाधी, देवस्थानच्या विविध प्रकल्पांची माहिती फोटोसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिली.
सुमारे पाऊण तासाच्या या भेटीत राष्ट्रपती मुर्मू यांनी वारकरी संप्रदायाचा इतिहास जाणून घेतला. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या वतीने केलेला हा सन्मान म्हणजेच साक्षात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाल्याची भावना यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. यावेळी निरंजन गुरू शांतीनाथ, माधव तिवाटणे, उमेश महाराज बागडे आदी उपस्थित होते.
पंतप्रधानांनाही देणार निमंत्रण
आळंदी देवस्थानतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील निमंत्रण देण्यात येणार असल्याचे योगेश देसाई यांनी स्पष्ट केले आहे. येत्या काही दिवसांत वेळ घेऊन त्यांची भेट घेण्यात येईल. त्यावेळी त्यांना देवस्थानच्या विकास कामांची माहिती, तसेच माऊलींच्या कार्याची महती सादर करण्यात येणार आहे, असेही देसाई यांनी नमूद केले आहे.