चांदीच्या सिंहासनावर पादुका

ठेवून पार पडणार प्रस्थान सोहळा

देहू : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पंढरपूरला जाणाऱ्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज (दि. २०) देहूमध्ये पार पडत आहे. या सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या पादुका चांदीच्या सिंहासनावर प्रस्थापित करून रथात ठेवण्यात येतील आणि प्रस्थान सोहळा सुरू होईल, अशी माहिती देहू संस्थानचे प्रमुख विश्वस्त नितीन महाराज मोरे यांनी दिली.

असा असेल प्रस्थानाचा कार्यक्रम

पहाटे ५ वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात श्रीविठ्ठल-रुक्मिणी महापूजा, ६ वाजता वैकुंठस्थान श्री संत तुकाराम महाराज पूजा. सकाळी ७ वाजता तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधीची महापूजा संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, वंशज, वारकरी यांच्या हस्ते होईल. सकाळी ९ ते ११ या वेळेत इनामदार वाड्यात श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन होईल. सकाळी १० ते १२ रामदास महाराज मोरे (देहूकर) यांचे पालखी प्रस्थान सोहळ्याचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी तुकोबारायांची पालखी प्रस्थान ठेवेल. सायंकाळी ५ वाजता पालखी प्रदक्षिणा होऊन सायंकाळी साडेसहा वाजता इनामदार वाड्यात पालखी मुक्कामी असेल. तिथे मुख्य आरती केली जाईल.

दोन वर्षांनंतर यंदा उत्साह
यंदा दोन वर्षांनंतर आषाढी वारी परंपरेनुसार पायी पद्धतीने होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्येही उत्साह आहे. वारकरी, भाविकांची संख्याही यंदा जास्त आहे. ३०० हून अधिक अधिक दिंड्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. देहू येथे आलेल्या आणि येणाऱ्या भाविकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. वीज, पाणी, स्वच्छतागृहे तसेच निवास व्यवस्था केली आहे. आवश्यक तो पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे, असे मोरे यांनी सांगितले.

माऊलींचे प्रस्थान उद्या
श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी येथून २१ जून रोजी पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार आहे. दोन्ही पालख्या २२ जून रोजी सायंकाळी पुणे शहरात दाखल होतील. २३ जून रोजी पालख्या पुण्यात मुक्कामी राहणार असून, २४ जून रोजी पालखी सोहळा सासवडकडे मार्गस्थ होणार आहे.

चार हजार पोलिसांचा बंदोबस्त
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष शाखेकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यात साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त असेल. गुन्हे शाखेची पथके बंदोबस्तात असणार आहेत. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तसेच गृहरक्षक दलाचे ६०० जवान बंदोबस्तावर असतील.

ड्रोनद्वारे छायाचित्रणास प्रतिबंध
तुकोबाराय आणि माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा नियोजित मार्ग आणि लगतच्या परिसरात ड्रोन अथवा ड्रोनसदृश कॅमेऱ्याने छायाचित्रण करण्यास पोलिसांनी सक्त मनाई केली आहे. त्याचप्रमाणे, पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला फुले, फळे, खेळणी विक्रेते, हातगाडीवाले, पथारीवाले यांना बसण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पिंपरीचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला आहे.

पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी व देहूत लाखो वारकरी येत असतात. या गर्दीचे ड्रोन तथा इतर माध्यमातून छायाचित्रण करण्याचा प्रयत्न होतो. वारीसाठी आलेले भाविक मुख्यत्वे ग्रामीण भागातून आलेले असतात. ड्रोनविषयी त्यांना माहिती नसते. अचानक हवेत ड्रोन उडताना पाहून गैरसमजातून वारकऱ्यांमध्ये गोंधळ उडू शकतो, त्यामुळे या ड्रोन छायाचित्रणावर प्रतिबंध आणला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचप्रमाणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसणाऱ्या विक्रेत्यांना २३ जूनपर्यंत मज्जाव करण्यात आला आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *