‘भानुदास-एकनाथ’ गजराने
दुमदुमली पैठण नगरी

पैठण : महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमाकांचा पालखी सोहळ्याचा मान असलेल्या पैठणच्या संत एकनाथ महाराज यांच्या पालखीने आज (दि. २१ जून) सूर्यास्ताच्या वेळी पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवले. यावेळी टाळ-मृदंग आणि भानुदास-एकनाथ गजराने अवघी पैठण नगरी दुमदुमून गेली.

असा रंगला प्रस्थान सोहळा
आज (दि. १९) सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पवित्र पादुका असलेल्या पालखी सोहळ्याने पंढरपूर वारीसाठी प्रस्थान ठेवले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या पायी दिंडी पालखी सोहळ्यामध्ये सुमारे ३५ हजार महिला-पुरुष वारकरी सहभागी होत आहेत.

तब्बल १९ मुक्काम
पालखी सोहळ्याने वाटेत १९ ठिकाणी मुक्काम केल्यानंतर २० वा मुक्काम थेट पंढरपुरात असणार आहे. दरम्यान ९ जुलै रोजी नाथांची पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. पहिला मुक्काम चनकवाडी येथे होणार असून, त्यांनतर पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने निघेल.

सोहळ्याची तयारी जय्यत
या सोहळ्याच्या भव्य प्रस्थानाची तयारी नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांच्या वतीने योगेश महाराज, ज्ञानेश महाराज गोसावी पालखीवाले यांनी केली. गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाची परिस्थिती पाहता अनेक भाविकांना पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता आले नव्हते. मात्र यावेळी भाविकांना पालखी सोहळ्याचा आनंद घेता येणार असल्याने, सोहळ्यात मोठी गर्दी होण्याचीही शक्यता आहे.

सुविधांबाबत वारकरी नाराज
वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, आरोग्य सेवासह सर्व मूलभूत व्यवस्था सोहळा सुरू होण्यापूर्वी करण्याच्या विशेष सूचना दिल्या गेल्या होत्या. मात्र या मूलभूत व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप वारकरी करत आहेत. पहिल्याच मुक्कामाचे गाव असलेल्या चनकवाडी गावाला जाण्यासाठी वारकऱ्यांना नीट रस्ता नाही. त्यासाठी पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी वारकऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात हा पर्यायी रस्ता तयार करून देण्यात आला नाही. त्यामुळे वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *