कार्तिकी महापूजेच्या निमित्ताने
देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
पंढरपूर : आपल्या समाजामध्ये ऐक्य टिकवून ठेवायचे असेल, तर आपल्याला वारकरी व्हावे लागेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २३) येथे केले. कार्तिकी वारीच्या प्रबोधिनी एकादशीची श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाल्यानंतर फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे अडीच वाजता सपत्निक श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रत्येक समाजाला आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. पण ते करत असताना दुसऱ्या समाजाला दुखवू नये. सामाजिक ऐक्याला बाधा येऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यावी. आपल्याला सामाजिक ऐक्य टिकवायचे असेल, तर वारकरी व्हावे लागेल, असे फडणवीस यावेळी म्हणाले. पंढरपूर विकासाचे कामही लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नाशिकच्या बबन आणि वत्सला घुगे या दाम्पत्याला यंदा उपमुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान मिळाला. पूजेनंतर पहाटे तीन वाजल्यापासून पुन्हा दर्शनबारी सुरू करण्यात आली.
आषाढीनंतरची पंढरपूरची वर्षातील दुसरी मोठी वारी म्हणजे, कार्तिकी एकादशीची वारी. या वारीसाठी महाराष्ट्रभरातून सुमारे ८ लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. विठुरायाच्या जयघोषाने आणि टाळमृदंगाच्या गजराने पंढरपूर दुमदुमून गेले आहे. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. दर्शनबारीत सुमारे तीन लाख भाविक उभे आहेत.
पहाटे साडेतीन वाजता उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ७३ कोटींच्या मंदिर विकास आराखड्याचे भूमिपूजन झाले. त्यानंतर सोळखांबी मंडपात उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्तिकी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांची ६५ एकर मधील भक्तीसागर या वारकरी निवास तळावर मोफत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथील ४९७ प्लॉटपैकी ३०८ प्लॉटचे वाटप झाले आहे. जवळपास दोन लाख भाविकांच्या निवासाची सोय इथे झाली आहे. या ठिकाणी वीज, पाणी, रस्ते, स्वच्छतागृहे, आरोग्य व्यवस्था शासनाकडून पुरवण्यात आली आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समर्थ युवा फाउंडेशन, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तसेच कैवल्य वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या सुविधांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे. गोपाळपूर मार्गावरील पत्राशेड येथे २१ नोव्हेंबरपासून वारकऱ्यांसाठी विविध आरोग्य तपासण्या केल्या जात आहेत. यामध्ये रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब तपासणी, छातीचा एक्स रे, रक्त तपासणी, सीबीसी टेस्ट, कोलेस्ट्रॉल तपासणी, स्तन कॅन्सर तपासणी, आदी आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या गेल्या आहेत.