केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मंत्री
डॉ. कराड यांनी केली घोषणा
लासूरगाव : महाराष्ट्रातील थोर संत परंपरेची ओळख आधुनिक महाराष्ट्राला करून देणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई यांच्या देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील जन्मस्थळाचा विकास करण्याची घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी रविवारी (दि. २७) केली.
लासूरगाव येथील संत बहिणाबाई महाराज फिरता नारळी सप्ताहामध्ये डॉ. श्रीरंग गायकवाड संपादित संत बहिणाबाई विशेषांकाचे प्रकाशन डॉ. कराड यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ह. भ. प. रामराव महाराज ढोक, शिऊर येथील संत बहिणाबाई संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. मधुसूदन महाराज मोगल, खासदार इम्तियाज जलिल,
आळंदीच्या सद्गुरू जोगमहाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे-हसेगावकर, सचिव बाजीराव नाना चांदेले, माजी आमदार भाऊसाहेब तात्या चिगटगावकर, अप्पासाहेब पाटील दहेगावकर, दिनकर बापू पवार, भोलेगिरी महाराज, लासूरचे सरपंच रितेश मुनोत, बहिणाबाईंच्या माहेरच्या वंशज शकुंतलाबाई कुलकर्णी, सासरचे म्हणजे शिऊरचे वंशज पवन पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
देवगाव रंगारी येथील संत बहिणाबाई यांचे जन्मस्थळ उपेक्षित असून, तेथे त्यांचे कुठल्याही प्रकारचे स्मारक वगैरे नाही. याबाबतची सविस्तर माहिती संत बहिणाबाई विशेषांकात लेख स्वरूपात देण्यात आली आहे. बहिणाबाईंचे हे जन्मस्थळ महाराष्ट्राचे सांस्कृतिक भूषण आहे. त्यामुळे या स्थळाचा विकास व्हावा अशी, भावना संत बहिणाबाई विशेषांकाचे संपादक डॉ. गायकवाड यांनी डॉ. कराड यांच्याकडे व्यक्त केली. त्यावर डॉ. कराड यांनी तत्काळ होकार दर्शवत, त्या बाबतचा प्रस्ताव देण्याची सूचना संबंधितांना केली.
संत बहिणाबाई हा विशेषांक “ज्ञानबा तुकाराम” या वार्षिक अंकाच्या वतीने प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या अंकामध्ये संत बहिणाबाईंचे जीवनकार्य, त्यांची साहित्य रचना, त्यांनी वास्तव्य केलेली ठिकाणे यांचा सांगोपांग आढावा घेण्यात आलेला आहे. तसेच देवगाव रंगारी, शिऊर, कोल्हापूर, देहू येथील संत बहिणाबाईंच्या पाऊलखुणांचाही मागोवा घेण्यात आलेला आहे.
या अंकासाठी 9833661443 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.