महाराष्ट्रातून हजारो भाविकांची

खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी

जेजुरी : चंपाषष्ठीच्या निमित्ताने कुलदैवत खंडोबाच्या दर्शनासाठी आज (दि. २९) जेजुरीतील मल्हारगडावर महाराष्ट्रभरातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली. भंडाऱ्याच्या उधळणीत मल्हारगड पिवळ्याधम्मक रंगात न्हाऊन निघाला आणि ‘येळकोट येळकोट’च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला.

गडावर गेले सहा दिवस सुरू असणाऱ्या षडरात्र उत्सवाची आज सांगता होत आहे. आज सकाळी खंडोबाच्या उत्सव मूर्तींना अभिषेक घालून त्यांची यथासांग पूजा करण्यात आली. त्यानंतर खंडोबाच्या आवडीचा वांग्याची भाजी आणि भाकरी असा नैवेद्य दाखविण्यात आला. पहाटेपासूनच खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष हा उत्सव साजरा करण्यात आला नाही. त्यामुळे यंदा हा उत्सव जेजुरी गडावर धुमधडाक्यात साजरा झाला.

जेजुरीच्या प्रत्येक घरातून खंडेरायाला वांग्याचे भरीत आणि रोडग्यांचा नैवद्य पाठविला गेला. देवस्थानतर्फे मंदिरात फुलांची सजावट तसेच, संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. तसेच भाविकांना अन्नदान करण्यात आले.

दरवर्षी मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी तिथीला चंपाषष्ठी उत्सव साजरा केला जातो. आज देवाला पूजेत वांगी अर्पण केली जातात, म्हणून याला ‘वांगे छठ’ असेही म्हणतात. या दिवशी भगवान शंकराची खंडोबाच्या रुपात पूजा केली जाते. ऋषींच्या विनंतीला मान देऊन खंडेरायाने मणी-मल्लाचा वध केला, त्यानिमित्ताने हा उत्सव साजरा केला जातो, अशी आख्यायिका आहे.

अमावास्येपासून ते चंपाषष्ठीपर्यंत संपूर्ण सहा दिवस भाविक लवकर उठून मंदिरात खंडोबाच्या मूर्तीसमोर सहा दिवस तेलाचा दिवा लावतात. त्यानंतर चंपाषष्ठीला तळी उचलली जाते. मणी-मल्ल दैत्यांच्या विजयाचा उत्सव भाविक ‘तळी भंडारा’ भरून साजरा करतात. या दिवशी चंपाषष्ठीला घरोघर तळी भरली जाते.

ताम्हणात नागवेलीची पाने, सुपारी, देवाचा टाक, खोबऱ्याचे तुकडे, भंडारा आदी साहित्य घेऊन तीन, पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये घरातील पुरुष मंडळीनी एकत्र येत ‘येळकोट, येळकोट, जय मल्हार’ च्या गजरात ही तळी वर खाली उचलतात. त्यानंतर देवाला भंडार वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावल्यानंतर पुन्हा एकदा ‘सदानंदाचा येळकोट’च्या गजरात तळी उचलली जाते. शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावत देवाला नमन केले जाते. आरती करून भंडारा आणि गूळ-खोबऱ्याचा प्रसाद वाटला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *