पालखी सोहळा उद्या पोहोचणार

सोलापूर जिल्ह्यात; स्वागताची तयारी

बरड : दोन दिवस फलटण मुक्कामी असलेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज (दि. ३) मजल-दरमजल करत बरड मुक्कामी पोहोचला.


पहाटे श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते माऊलींना अभिषेक करून पुरुषसूक्त पूजा करण्यात आली. शितोळे सरकारांच्या वतीने माऊलींना नैवेद्य दाखविण्यात आला. या पूजेचे पौरोहित्य प्रसाद जोशी, अमोल गांधी आणि राजाभाऊ चौधरी यांनी केले. यावेळी संस्थानचे विश्‍वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, नाईक-निंबाळकर परिवारातील सदस्य, फलटण तालुका दूध संघाचे माजी अध्यक्ष सुभाषराव शिंदे यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी साडेसहा वाजता सोहळा बरड मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.

ज्ञानेश्‍वर मंदिर येथे नाईक-निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर बसस्थानक, श्रीराम साखर कारखाना, श्रीराम बझार, श्रीराम एज्युकेशन संस्था इत्यादींच्या वतीने सोहळ्याचे स्वागत स्वीकारून या सोहळ्याने फलटण नगरीचा निरोप घेतला. माऊलींचा पालखी सोहळा वटवृक्षाच्या गर्द झाडीतून वाटचाल करीत सकाळच्या न्याहरीसाठी ९ वाजता विडणी येथे पोहोचला. शेतामध्ये वारकर्‍यांनी सकाळची न्याहरी उरकली.

विडणी येथे सरपंच रुपाली अभंग, उपसरपंच आशा मदने, पोलीस पाटील शीतल नेरकर, श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे यांच्यासह ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. फलटण ते विडणी या वाटचालीत रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतमळ्यातील भाजीपाला, ऊस आदी हिरवीगार पिके वाऱ्याच्या झुळकीसोबत विठ्ठलनामावर डोलत होती. न्याहरीनंतर सोहळा दुपारचा नैवेद्य आणि भोजनासाठी दुपारी साडेअकरा वाजता पिंपरद येथे पोहोचला. पिंपरद येथे सरपंच सविता मदने, उपसरपंच राजश्री कापसे, पोलीस पाटील सुनील बोराटे यांच्यासह गावकऱ्यांनी सोहळ्याचे स्वागत करून दर्शन घेतले.

दुपारी दीड वाजता सोहळा भोजन आणि विश्रांतीनंतर निंबळक फाटामार्गे सायंकाळी बरड येथे पोहोचला. सरपंच तृप्ती गावडे, उपसरपंच गोरख टेंभरे, पोलीस पाटील अश्विनी टेंभरे यांच्यासह ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. वाटचालीत कधी ढगाळ, तर कधी निरभ्र आकाश असे वातावरण होते. त्यामुळे कधी आल्हाददायक, तर कधी उकाडा अशा वातावरणात वारकऱ्यांनी वाटचाल केली. पंढरी समीप आल्याने वारकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. असंख्य वारकरी फलटणहून शिखर शिंगणापूरला शंभू महादेवाच्या दर्शनासाठी गेले. दर्शनावरून येऊन ते पुन्हा बरड येथे वारीत सहभागी झाले. बरड परिसरातील हजारो भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली. रात्री गोविंदराव भोई दिंडी समाजाच्या वतीने कीर्तनाची सेवा करण्यात आली.

माऊलींचा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

आळंदीहून निघालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा उद्या (दि. ४ जुलै) सकाळी ११ वाजता आपल्या वैभवी लवाजम्यासह धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. माऊलींच्या पालखी सोहळ्यासमवेत रथापुढे २७ दिंड्या, तर रथामागे जवळपास ४०० दिंड्या आहेत. सोहळ्यासोबत जवळपास चार ते साडेचार लाख वारकरी आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली असल्याचे सोलापूर जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्ह्यात दोन हजार शौचालये, ४३ पाणी पुरवठा केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्याच बरोबर राष्ट्रीय रस्ते महामार्ग विकास मंडळाच्या माध्यमातून धर्मपुरी ते वाखरी या सुमारे ७५ किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यातील तळाच्या आणि रिंगणाच्या जागांचे मुरमीकरण करण्यात आले आहे. यासोबतच आरोग्य, पाणीपुरवठा आदी व्यवस्था करण्यात आल्या असल्याचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *