हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात

वयाच्या ६६व्या वर्षी झाले निधन

पुणे : संत साहित्य आणि लोकवाङ्‌मयाचे ज्येष्ठ अभ्यासक, भारूडकार, लेखक, संशोधक, व्याख्याते, प्रवचनकार, कीर्तनकार डॉ. रामचंद्र देखणे (वय ६६) यांचे आज (दि. २६ सप्टेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

वारकरी घरात डॉ. देखणे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील ह. भ. प. अनंत देखणे कीर्तनकार होते. वडिलांचा वारसा पुढे चालविलेल्या डॉ. रामचंद्र देखणे यांनी बी. एस्सी. आणि एम. ए. पदवी संपादन केल्यानंतर पीएच. डी. संपादन केली. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. ३४ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले. ‘संत विचार प्रबोधिनी’ ही दिंडी घेऊन देखणे अनेक वर्षे सातत्याने पंढरीची पायी वारी करीत असत. अनेक पदवीधर, उच्चशिक्षितांनी त्यांच्या दिंडीतून वारी केली.

डॉ. देखणे यांची ललित, संशोधनात्मक तसेच चिंतनात्मक अशी ५० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये कथा, कादंबरी, संतसाहित्यावरील चिंतनात्मक, लोकसाहित्यावरील संशोधनात्मनक आणि सामाजिक विषयांवरील वैचारिक पुस्तकांचा समावेश आहे. विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंक आणि संपादित ग्रंथांमधून त्यांचे दोन हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘बहुरुपी भारूड’ या संत एकनाथांच्या पारंपरिक भारूडांचे त्यांनी अडीच हजारांहून अधिक कार्यक्रम महाराष्ट्रात, इतर प्रांतात तसेच अमेरिका, दुबई येथे सादर केले.

राज्यातील विविध व्याख्यानमालांमधून विविध विषयांवर त्यांनी हजारो व्याख्याने दिली. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मे २०१० मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे झालेल्या सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते सहभागी झाले होते. अमेरिकेतील विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये ते एका परिसंवादाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे २४ वे विभागीय साहित्य संमेलन, महाराष्ट्र साहित्य सभेच्या इंदूर येथील शंभराव्या संमेलनाचे, बडोदा येथील मराठी वाङ्मय मंडळाच्या ६८ व्या साहित्य संमेलनाचे, कडोली-बेळगाव येथील २१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे, १२ व्या बंधुता साहित्य संमेलनाचे आणि विटा येथील २९ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्याशिवाय राळेगणसिद्धी येथे झालेल्या पहिल्या ग्रामजागर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

लेखन, संशोधन, प्रबोधन आणि कलाविष्कारासाठी त्यांना महाराष्ट्र शासनासह विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविले होते. त्यामध्ये स्वामी विवेकानंद पुरस्कार, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा कलाकार पुरस्कार, रांजणगाव गणपती संस्थानचा महागणपती पुहरस्कार, गदिमा साहित्यभूषण पुरस्कार, भारूडाचार्य पुरस्कार, सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार अशा महत्त्वांच्या पुरस्कारांचा समावेश आहे.

डॉ. देखणे यांची पुस्तके –
अंगणातील विद्यापीठ, आनंद तरंग, आनंदाचे डोही, आषाढी, गोंधळ : परंपरा स्वरूप आणि अविष्कार, गोरज, जीवनयोगी साने गुरुजी, जीवनाची सुंदरता, तुका म्हणे जागा हिता, तुका झालासे कळस, दिंडी, भारूड आणि लोकशिक्षण, भारूड वाङ्मयातील तत्त्वज्ञान, भूमिपुत्र, मनाचे श्लोक : जीवनबोध (ई-पुस्तक), महाकवी, महाराष्ट्राची सांस्कृतिक, लोककला, लागे शरीर गर्जाया, लोकशिक्षक गाडगेबाबा, वारी : स्वरूप आणि परंपरा, शारदीचिये चंद्रकळा, श्रावणसोहळा, संत साहित्यातील पर्यावरणविचार, समर्थांची भारुडे (ई-पुस्तक), साठवणीच्या गोष्टी, सुधाकरांचा महाराष्ट्र, हौशी लख्याची, ज्ञानदीप लावू जगी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *