डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे चिंतन;
डॉ. देखणे स्मृती पुरस्कार वितरण
पुणे : वारकरी पंथासारखा दुसरा पंथ नाही. पांडुरंगाची मूर्ती ही योगस्थानक आहे. वारकरी पंथातील आद्यगुरू संत ज्ञानेश्वर महाराजांनीही त्याला योगीराज असे संबोधले आहे. म्हणूनच त्यांच्या समोर गेल्यानंतर प्रत्येकाचे भान हरपून जाते आणि कुठल्याही प्रकारचे मागणे मागितले जात नाही, असे प्रतिपादन मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले.
संत विचार प्रबोधिनी आणि डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानतर्फे वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार २०२४ चे वितरण येथे करण्यात आले. ह. भ. प. अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी), हेमंत मावळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आळंदी देवाची येथील वेदांत सत्संग समितीचे गुरुवर्य डॉ. श्री. नारायण महाराज जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आळंदी देवाची येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, संत ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळ्याचे प्रमुख योगी निरंजननाथ, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन इटकर, लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मकरंद टिल्लू, तसेच डॉ. रामचंद्र देखणे साहित्य, कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भावार्थ देखणे, डॉ. पूजा देखणे व्यासपीठावर उपस्थित होते.
सनातन धर्म अनंत काळापासून चालत आलेला असून, अनंत काळापर्यंत चालत राहणार आहे. हा धर्म नित्यनूतन, प्रवाही आहे. आपण सर्वजण सनातनधर्मी आहोत याचा अभिमान बाळगला पाहिजे, असे डॉ. देगलूरकर म्हणाले.
डॉ. जाधव, स्वामी महाराज, मावळे यांचेही यावेळी भाषण झाले. डॉ. भावार्थ देखणे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले. पद्मश्री जोशी यांनी आभार मानले.