
डॉ. विश्वनाथ कराड यांनी
पंढरपूर येथे केली घोषणा
पंढरपूर : आषाढी वारीच्या निमित्ताने वाखरी, पंढरपूर येथे येणार्या दिंड्यांमधील वारकर्यांना दर वर्षी १८ संतांच्या नावाने आदर्श वारकरी समर्पित जीवन गौरव पुरस्कार देण्याची घोषणा विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी वाखरी येथे केली.
विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समितीच्या वतीने हा पुरस्कार दिला जाणार आहे. वाखरी येथील पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयाग अक्का कराड अन्नपूर्ण सदन (विठ्ठल मंदिर) येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
नोकरी, सांभाळून वारकरी संप्रदायाचा निरपेक्षपणे प्रचार करणारे उच्चशिक्षित, तसेच कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते यांना आदर्श कीर्तनकार, प्रवचनकार गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. वरील दोन्ही पुरस्काराचे स्वरूप संपूर्ण पोशाख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह आहे. समाजात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदावे यासाठी महाराष्ट्रातील संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत नामदेव, जगदगुरू संत तुकाराम महाराज, संत जनाबाई, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत सखूबाई, संत सेना महाराज, संत कूर्मदास, संत रोहिदास महाराज, जगनमित्र संत नागा, संत निळोबा राय, संत गजानन महाराज, संत चोखामेळा, नरहरी सोनार, संत गाडगे महाराज, संत तुकडोेजी महाराज यांच्या नावाने हा पुरस्कार दिला देण्यात येईल.
विश्वशांती दिंडीच्या अध्यक्ष सौ. उषा विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली वाखरी येथील विश्वशांती गुरूकुलमध्ये दिंडी काढण्यात आली. विविध संतांचे अभंग गात ही दिंडी मंदिरात पोहचली. त्यानंतर डॉ. विश्वनाथ कराड आणि उषा कराड यांच्या उपस्थित तुळशी विवाह साजरा झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. कराड यांनी पुरस्कारांबाबत घोषणा केली. या कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन ह. भ. प. शालीकराम महाराज खंदारे यांनी केले.