खासगी रेडिओचा पहिल्यांदाच

पंढरीच्या आषाढी वारीवर प्रोग्रॅम

सरकारी रेडिओनंतर सध्या चलती आहे, ती खासगी एफएम अर्थात व्यवसायिक रेडिओंची. त्यांचं टार्गेट ठरलेलं आहे; ते म्हणजे, फक्त मनोरंजन! या रेडिओंवरील ‘आरजे अर्थात रेडिओ जॉकीं’विषयी तरुणाईत ‘क्रेझ’ आहे. ‘बीग एफएम’च्या आरजे बंड्याने ‘वारी तुमच्या दारी’ हा प्रोग्रॅम सुरू करून त्यात पंढरीच्या वारीची माहिती देण्यास सुरुवात केली. खासगी रेडिओने पहिलांदाच अशा प्रकारचा वारीवरचा प्रोग्रॅम दिला. गेल्या सात वर्षांपासून हा प्रोग्रॅम तरुणाईत ‘हिट’ झाला आहे. त्याविषयी सांगत आहे, स्वत: आरजे बंड्या…

नमस्कार मी RJ बंड्या, BIG FM पुणे येथे मागील पाच वर्षांपासून रेडिओ जॉकी म्हणून काम करतोय…

लहान असताना सगळ्यांना जशी मामाच्या गावाला जायची ओढ असते अगदी तशीच मलाही होती. पण जरा द्वाड किंवा आगाऊ असल्याने आईचा मला एकट्याला पाठवायला नेहमीच हलका विरोध असायचा. कारण तिथे गेल्यावर आजी-आजोबा, मामा त्यांच्या शेतीच्या कामात व्यस्त असणार आणि मी खोड्या करणा. कोण लक्ष देईल माझ्याकडे म्हणून आई नाहीच म्हणायची. पण एके वर्षी खूप रडारड, हट्ट आणि मी आजीला बिलकुल त्रास देणार नाही, या बोलीवर मामाच्या गावाला गेलोच. तिथे गेल्यावर मात्र मी आईला दिलेला प्रत्येक शब्द सोयीस्करपणे विसरून गेलो आणि खोड्या करू लागलो…आजी-आजोबांच्या या खोडकर बाळकृष्णाला कुठेतरी बिझी करणं आवश्यक होतं. त्यात आजी-आजोबा यांच्या मदतीला धावून आला साक्षात पांडुरंग…!


अखंड हरिनाम सप्ताहाने लावली गोडी
मी गावी गेलो तेव्हा गावाला तिथं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा मला आजोबांनी मला सांगितलं, उद्यापासून तू ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. सकाळचा नाश्ता, दुपारी आणि संध्याकाळी मस्त जेवण, दुपारी दूध किंवा चहा असं सगळं मिळेल. मी विचारता झालो, की पारायण म्हणजे काय, तर मला ते समजेल असं म्हणाले…
झालं मी उत्साहाने तयार झालो आणि पहिल्या दिवशी सकाळी सगळं आवरून सप्ताहाच्या मंडपात जाऊन बसलो. माझ्या वयाची, थोडी मोठी, थोडी अजून मोठी आणि मग अगदीच मोठी माणसं एका रांगेत समोरासमोर ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसली होती. मग पारायण सुरू झालं. इथेच माझी पांडुरंगाशी, संत मंडळींशी ओळख झाली…


खरं सांगू तर पहिल्या दिवशीच्या पहिल्या ‘हाफ’मध्ये मला खरंच कंटाळा आला होता. पण नंतर मात्र गंमत वाटू लागली, आवड वाटू लागली आणि मग मी अगदी समरसून, मनोभावे पारायण करू लागलो. पारायण, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, हरिनामाचा गजर यात सात दिवस कसे गेले ते समजलंच नाही. सप्ताह संपला आणि दुसऱ्या दिवशी मी आई-बाबांकडे आलो. पण मला त्या पारायणाची, सप्ताहाची गोडी लागलीच होती. त्यानंतर पुढची दोन वर्षंदेखील मी त्या अखंड हरिनाम सप्ताहात अगदी मनापासून सहभाग घेतला. नंतर मात्र दहावीचं वर्ष सुरू झालं आणि मामाच्या गावाला जाणं कमी झालं. पण त्या कोवळ्या वयात विठूं-माऊलीचं वेड लागण्यासाठी तेवढं पुरेसे होतं. नंतर कॉलेज, नोकरी यामुळे त्या गोष्टी हळुहळू विसरत गेलो.

एफएम रेडिओच्या दुनियेतील नवी कल्पना

नोकरीची सुरुवात केली नाशिकमधून. मग सोलापूर आणि मग पुणे… पुण्यात एका रेडिओ स्टेशनला जॉईन केलं होतं. ऑफिसमध्ये विषय सुरू होता, की पालखी सोहळा, वारी आपण रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवली तर? खरं तर एफएम रेडिओच्या दुनियेत ही कल्पना नवीन आणि धाडसी होती. पण मला ही कल्पना खूपच आवडली कारण, मला माझं त्यात गेलेलं लहानपण आठवू लागलं. आपसूकच जबाबदारी माझ्यावर आली. मी सिनियरला होकार भरला आणि ठरवलं की या व्यावसायिक रेडिओवरून लाखो श्रोत्यांपर्यंत जमेल तशी वारी पोचवायची. कार्यक्रमाचं नावही ठरलं, वारी तुमच्या दारी! मग नियोजनाला सुरुवात झाली. कशा पद्धतीने आपण वारीच्या रंजक गोष्टी या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवू शकतो, काय करू शकतो.. त्यावेळी मदतीला मित्र नागेश भोसेकर धावून आला. त्याने मला संत ज्ञानेश्वर माउलींच्या आजोळ घराचे वंशज आणि सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांचा संपर्क करून दिला. तशी आमची ओळख होतीच. यामुळं ती अजून घट्ट झाली.

प्रस्थानाचा अनुभव भारावून टाकणारा

पहिल वर्ष. प्रस्थानाचा दिवस उजाडला. अवधूतने सांगितल्याप्रमाणं सकाळी लवकरच आळंदीला पोहचलो. कारण नंतर रस्ते बंद होतात. आळंदीला पोहोचलो आणि भारावून गेलो. सगळी नगरी वारकऱ्यांनी गजबजून गेली होती. टाळ, मृदंग आणि विठु माऊलीचा गजर सुरू होता. माझ्यासाठी ते नवीन होतं. मग अवधूतनं दिलेली प्रस्थान सोहळ्याबद्दलची माहिती रेकॉर्ड करून ऑफिसला पाठवून दिली. वेळ भराभर पुढे सरकत होती. दुपारी अडीच-तीनच्या सुमारास अवधूत मला थेट मंदिरात घेऊन गेला. मला विश्वास बसत नव्हता, की ऐन प्रस्थानाच्या दिवशी मी माऊलींच्या समाधी मंदिरात आहे. आईला फोन करून सांगितलं, तर तिलाही विश्वास बसत नव्हता. मी आत गेलो आणि आपोआप डोळे भरून आले… त्या भावना शब्दात मांडणं अशक्य आहे. त्या तुम्हाला फिल कराव्या लागतात. तिथे श्री चोपदार गुरुजी आणि काही संतांच्या वंशजांच्या मुलाखती रेकॉर्ड करून ऑफिसला पाठवल्या. तर ऑफिसमधल्या मंडळींसाठी देखील हे अविश्वसनीय वाटत होतं.

त्यानंतर अवधूतने माझी दोन सज्जनांशी ओळख करून दिली. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वंशपरंपरागत चोपदार श्री राजाभाऊ आणि श्री रामभाऊ चोपदार. नंतर समजलं, की मंदिरात वारी सोहळ्याचा प्रचंड अनुभव अत्यंत मधाळ वाणीत ज्यांनी आपल्याला सांगितला ते चोपदार गुरुजी म्हणजे या दोघांचे वडील आहेत. रामभाऊ आणि राजाभाऊ यांनीही वारीचा अनोखा इतिहास त्यांच्या ओघवत्या शैलीत सांगितला आणि तो मी श्रोत्यांपर्यंत पोहचवला. मागच्या सलग सहा वर्षांपासून ‘वारी तुमच्या दारी’चा उपक्रम सुरू आहे.

श्रोत्यांनी या उपक्रमाला अक्षरशः उचलून धरलं आहे आणि माझा उत्साह वाढवला आहे. पण याचं सगळं श्रेय हा उपक्रम करत असताना भेटत गेलेल्या मंडळींना आहे… पहिल्या वारी सोहळ्यात अनेक मंडळीशी ओळख झाली. बरं ती नुसती ओळख नाही, तर जसे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असल्याप्रमाणे नातं निर्माण झालं. भाऊंच्या माध्यमातून वारकरी दर्पणचे तरुण आणि गोडभाषी ह. भ. प. सचिन पवार यांच्याशी ओळख झाली आणि रेडिओवरच्या ‘वारी तुमच्या दारी’ या उपक्रमाला आणखी उत्तम पद्धतीने सादर करण्यासाठी मदत झाली.

‘लाईव्ह’ कार्यक्रमाचा रोमांचक अनुभव

‘वारी तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत सासवडपर्यंत प्रत्यक्ष वारीतून आणि मग लाईव्ह अपडेट रुपाने वारी सोहळा रेडिओवर मी सांगत आलोय. मागील सहा वर्षां असंख्य वारकरी मंडळीशी बोलता आलं. त्यांचे अनुभव लोकांपर्यंत पोहचवता आले. वारीबद्दलचा काही लोकांचा काहीसा नकारात्मक दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न करता आला. वारीबद्दल प्रत्येक गोष्ट रेडिओच्या माध्यमातून पोहचवण्यासाठी कार्यरत राहता आलं. आणि याकामी वरील उल्लेखित मंडळींची आणि इतर अनेकांच्या सहकार्याची मदत झाली त्यांचा मी ऋणी आहे. प्रश्न असा होता, की ‘वारी तुमच्या दारी’ हा उपक्रम जर थेट सोहळ्यातून करायचा असेल, तर मग तिथे येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर मात कशी करायची? कारण तिथे असणारा सामूहिक आवाज किंवा येणारा नेटवर्क प्रॉब्लेम यावर उपाय काय? कारण रेडिओवर आवाज स्पष्ट येणं गरजेचं असतं. चर्चेअंती एकच तोडगा निघाला, की मी आणि समोरच्या मान्यवरांनी मोठ्याने बोलायचं आणि वारी सोहळ्याचा जो जल्लोष आहे तो पार्श्वसंगीत म्हणून श्रोत्यांना ऐकवायचा. शेवटी लाईव्ह हे लाईव्हच!

तांत्रिक अडचणींवर मात

मी माऊलींच्या समाधी मंदिरातून माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने रेकॉर्ड केलेलं सगळं एकाच वेळी मेल करणं गरजेचं होतं. तेव्हा नेटवर्कच्या शोधात माझा सहकारी पुन्हा बाहेर जाऊन ते मेल करून आला. त्या गर्दीत बाहेर जाऊन पुन्हा मंदिरात येणं हे तसं अशक्यच, पण पांडुरंगाची कृपा ते शक्य झालं… दोन वर्षांनंतर अवधूतच्या घरी असलेल्या वायफाय सुविधेने थोडं सुसह्य झालं. पण प्रस्थानाच्या दिवशी दिवसभर प्रचंड धावपळ, मेहनत, काम असूनही माऊलींची पालखी आजोळ घरी विसावल्यावर घरी निघताना पावलं जड व्हायची, ती यासाठीच की हा सोहळा आता पुढच्या वर्षीच अनुभवता येणार. अरे पण उद्या वारीत यायच आहेच की, असा विचार आला की पुन्हा प्रसन्न वाटायचं… आणि हो दिवसभर एवढं काम करूनही अजिबात थकवा जाणवत नसायचा.

नाही तर एरवी एवढं काम केलं, तर एखादी ‘पेन-किलर’ कुठे आहे का यासाठी घरात शोधाशोध करणारा मी प्रस्थान सोहळ्यातून घरी आल्यानंतर मात्र एकदम फ्रेश..! मला आठवतंय पहिल्यांदा मी जेव्हा सोहळ्याला उपस्थित राहिलो, त्या दिवशी घरी यायला साडेदहा वाजले होते रात्रीचे. आल्यावर मी बिल्डिंगमध्ये काही वेळ बॅडमिंटन खेळलो होतो. तेव्हा मला खऱ्या अर्थाने समजलं, की संपूर्ण जगाला चालवणाऱ्या शक्तीच्या भेटीसाठी आयोजित सोहळ्यातून आपणही जरा ऊर्जा घेऊन आलोय…

पालखी सोहळ्यात पायी प्रवास

एकदा मी पालखी सोहळ्यात लोणंद ते तरडगाव असा पायी प्रवास केला. त्यावेळी माझी सहकारी सानिका माझ्यासोबत होती. लाखोंच्या संख्येने वारकरी होते. वातावरणात एक प्रसन्नता होती. अनेकांशी बोलत होतो ते तोंडभरून आमचं कौतुक करत होते. म्हणत होते, की आजकालचे रेडिओ फक्त धांगडधिंगा करणारे असतात, पण पोरांनो तुम्ही नेटाने हे करताय पांडुरंग तुम्हाला काही कमी पडू देणार नाही! त्या पायी वारीत माझी आणि माझ्या सहकारी सानिका आमची चुकामूक झाली. फोनला नेटवर्क नाही. एवढ्या अथांग गर्दीत माझे इवलेशे डोळे तिला कुठं शोधणार? बरं ती वयाने लहान. ती माझ्या जबाबदारीवर वारीत आली होती. ती सापडली नाही तर? तिला शोधू कुठं, संपर्क कसा करू? आजवर एखादा नंबर कमीत कमी वेळात शेकडो वेळ डायल करण्याचा प्रसंग कधी आला नव्हता, पण तो त्या दिवशी आला. शेवटी संपर्क झाला, पण ती ज्या ठिकाणी होती ते तिला नीट सांगता येत नव्हतं किंवा मला नीट समजत नव्हतं. शेवटी ती तळावर पोलीस मदत केंद्रावर पोचली. आता माझं नाव माईकवर पुकारलं जाणार, तेवढ्यात मी तिच्या समोर उभा. तिला बरं वाटल आणि चिंतेने अगदी छोटा झालेला माझा जीव मोठ्या भांड्यात पडला…!

तिथून पुढे आम्ही फलटण मुक्कामी जाणार होतो. आमची राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती. आम्ही रामभाऊंचा निरोप घेऊन निघणार तोच त्यांनी जेवायचं आमंत्रण दिलं. आम्ही नाही म्हणताच दिंडीच्या जेवणाचं आमंत्रण नाकारू नये, असं सांगितलं. मग काय सडकून भूक लागली होतीच. वांग्याची भाजी, पोळी ( दिंडीतली एक पोळी म्हणजे घरच्या किमान तीन पोळ्या) मी त्या अडीच पोळ्या, लाडू, वरण भात यावर ताव मारला. त्यानंतर दिंडीचं सगळंच नियोजन कसं असतं, ते समजून घेऊन दुसऱ्याच दिवशी ते श्रोत्यांपर्यंत पोहचवलं.

वेगवेगळ्या लोकांशी संवाद

या सोहळ्याला येणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील अनेक दिगग्ज व्यक्तींशी संवाद साधताना त्यांनी दिलेली कौतुकाची थाप ही न विसरण्याजोगी आहे. सोहळ्याच्या धार्मिक, सामाजिक महत्वापासून, तर त्याच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींवर तज्ज्ञांकडून, अनुभवी जेष्ठ वारकरी मंडळींकडून माहिती गोळा करून ती रेडिओच्या माध्यमातून पोहचवली. कधी रेकॉर्डेडे किंवा कधी लाईव्ह. मला स्टुडिओतून माझा सहकारी कॉल करायचा आणि ते अपडेट मी लाईव्ह ऐकवायचो तस अवघड काम. पण सोपं व्हायचं कारण पांडुरंगाची कृपा…


जिथे जमेल तिथे फेसबुक लाईव्ह, जमेल तिथे फोटो काढून अपलोड करून वारीची क्षणचित्रे पोहचवणे, जे म्हणून माध्यम उपलब्ध आहे त्याचा पुरेपूर वापर करून ‘वारी तुमच्या दारी हा उपक्रम पोहचवण्यासाठी प्रयत्न केला आहे, अल्पबुद्धीने काही चुका झाल्या, पण त्या सुधारण्याचाही प्रयत्न केला.
वारी सोहळा सलग एवढी वर्षं ऑफिशियल का होईना करायला मिळतेय यासाठी देखील नशीब लागतं. अर्थात हे ऑफिशियल असलं तरी माझं पर्सनल कनेक्शन आहेच पांडुरंगाशी..!

आमच्या प्रोग्रॅमचा इम्पॅक्ट

एकदा रेडिओवर मी वारी तुमच्या दारी हा कार्यक्रम सादर करत असताना मुलाखती दरम्यान श्री रामभाऊ चोपदार यांनी आवाहन केलं, की वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांना जर आपणाला काही द्यायचं असेल तर जेवणाची स्टीलची ताटं द्या. जेणेकरून पत्रावळ्या किंवा कागदी प्लेटने होणारा कचरा होणार नाही. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत वारकऱ्यांसाठी पाणी आणि बिस्कीट खरेदीसाठी निघालेल्या विठ्ठल भक्ताने ताटांची खरेदी करून ती वारकऱ्यांसाठी दिली. तेव्हा आम्हाला समजलं, की हा आपला कार्यक्रम किती परिणामकारक आहे!

एक तरुण मला फोन करून म्हणाला, ज्यांना कामधंदा नाहीये अशा टाळकुट्यांचा सोहळा म्हणजे वारी, असा माझा समज होता. पण तू ज्या पद्धतीने ही वारी, हा अद्भूत सोहळा, त्याचं शास्त्र, व्यवस्थापन, धार्मिक महत्त्व, वारकऱ्यांच्या अनेक संस्थानी उभं केलेलं सामाजिक काम, तरुणांचा वाढता सहभाग आणि बरंच काही एवढ्या मनापासून माझ्या कानांपर्यत पोचवलं, मी धन्य झालो, माझा वारी सोहळ्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला…. किमान वीसेक मिनिटं तो अखंड बोलत होता आणि माझे डोळे भरून आले होते… पण गंमत आहे ना रेडिओची की दिसत नाही, फक्त ऐकावं लागतं. अगदी कानातून मनापर्यंत पोहचवाव लागतं. मला त्यात नखभर यश मिळालं होतं. नेहमी मी रेडिओवर ऐकवत असतो. त्यादिवशी मात्र तो बोलत होता आणि मी ऐकत होतो…!

कोविड काळातही घडली सेवा

यावर्षी रेडिओवरील माझ्या ‘वारी तुमच्या दारी’ या उपक्रमाचं सलग सातवं वर्ष आहे. कोविड काळात देखील डिजिटल माध्यमातून वारी पोहचवण्याचा प्रयत्न मी केला आहे. वारी सोहळा सर्वात पहिल्यांदा व्यावसायिक रेडिओच्या माध्यमातून श्रोत्यापर्यंत पोहचवण्याची सुरुवात माझ्यापासून झाली. खरं तर हे सगळं पांडुरंग आणि माऊलींच्या कृपेनेच झालं असं मला वाटतं.
वारीच्या वाटेवर भेटत गेलेल्या हजारो माऊलींना या उपक्रमाचं कौतुक आहेच. त्यांच्या शुभेच्छाच्या बळावर आणि हरी कृपेनं हे सगळं अव्याहतपणे सुरू राहील, अशी पांडुरंग चरणी प्रार्थना.

खूप सांगण्यासारखं आहे. लिहिण्यासारखं आहे. बोलण्यासारखं आहे, पण शब्दमर्यादा असल्याने थांबतो, पण एकच सांगावसं वाटतं, की अंगावर रोमांच उभा करणारा हा अलौकिक अनुभव सांगून समजत नाही. तो अनुभवावाच लागतो! जय हरी!

1 thought on “‘एफएम’ची वारी तुमच्या दारी…

  1. एकदम नविन प्रकारचा ऊपक्रम , पांडूरंगाची क्रूपा , ईच्छाशक्ती , कामावरची निष्ठा व धेय्यासक्ती असली की अशक्य ते कधि शक्य झाले हे कळत नाही हेच वारी तुमच्या दारी या कार्यक्रमामूळे सिध्द झाले.
    बंड्या , तूझे कौतूक करावे तेव्हढे थोडेच. स्टीलचे ताटं वाटण्याची कल्पना आवडली.कल्पनाशक्तीचा पूरेपूर वापर करून , अतिशय तन्मयतेने व श्रध्देने हि ऊपक्रम राबविला याबद्दल तूझे मनापासून त्रिवार अभिनंदन !!!
    भविष्यात असेच नविन काहीतरी करण्याची बूध्दी तूला देवो हीच पांडूरंगचरणी प्रार्थना !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *