हरीहर ऐक्याच्या घोषात
पालखी सोहळा जेजुरीत

जेजुरी :
अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगारा वारी।
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी॥
असा संत एकनाथांचा अभंग गात आणि
||ज्ञानबातुकाराम||च्या गजरासोबतच वारकऱ्यांनी आज (दि. २६ जून) जेजुरीत ‘खंडोबाचा येळकोट’ केला.

दोन दिवसांच्या सासवड मुक्कामानंतर पंढरीकडे निघालेली संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज महाराष्ट्राचे लोकदैवत असलेल्या श्री खंडेरायाच्या जेजुरीत दाखल झाली. यावेळी माऊलींच्या अबीर- बुक्क्यासह खंडेरायाच्या बेलभंडाराची उधळण करत संतांनी सांगितलेल्या शैव-वैष्णव ऐक्याचा वारकऱ्यांनी गजर केला.

सासवड मुक्कामी पहाटे माऊलींच्या पादुकांची विधीवत पूजा संस्थानचे अध्यक्ष योगेश देसाई यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर सोहळा सकाळी ७ वाजता जेजुरीकडे मार्गस्थ झाला. सकाळी ७.३० वाजता हा सोहळा शिंपी आळीच्या नामदेव महाराज मंदिराजवळ पोहोचला. येथे संत नामदेव संस्थानच्या वतीने माजी नगरसेवक मनोज मांढरे यांनी सोहळ्याचे स्वागत करून माऊलींना निरोप दिला.

वारकऱ्यांवर पावसाच्या सरी

पालखी सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी सकाळी साडेनऊ वाजता बोरावके मळा येथे पोहोचला. बोरावके मळा येथे माऊलींसह वैष्णवांनी विसावा घेतला. सकाळी साडेदहा वाजता हा सोहळा दुपारचा नैवेद्य आणि विश्रांतीसाठी यमाई शिवरीकडे मार्गस्थ झाला.
दुपारी साडेबारा वाजता हा सोहळा यमाई शिवरी येथे पोहोचला. दुपारचे भोजन आणि विश्रांतीनंतर वाटचाल सुरू झाली असताना काही काळ पावसाच्या जोरदार सरी आल्या. त्यात वारकरी चिंब झाला. बेलसर फाटामार्गे साकुर्डे फाट्यावर विश्रांती घेवून सायंकाळी सव्वा पाच वाजता सोहळा जेजुरी हद्दीवर पोहोचला.

जेजुरीकरांकडून उत्साही स्वागत

माऊलींचे अश्व सायंकाळी पाच वाजता, तर पालखी रथ सायंकाळी साडेपाच वाजता जेजुरी नगरीत दाखल झाला. दूरवरूनच खंडेरायाचा मल्हारगड पाहून वारकर्‍यांच्या आनंदाला उधाण आले.
टाळ-मृदंगाच्या गजरात संत एकनाथांची भारूडे, पदे, गौळणी तसेच खंडोबाची पारंपारीक गीते गात मल्हारीची सोहळा जेजुरीत दाखल झाला.

जेजुरी हद्दीत जिल्हा न्यायाधीश भूषण क्षीरसागर, धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुके, नगराध्यक्षा वीणाताई सोनवणे , उपनगराध्यक्ष गणेश निकुडे , मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, खंडोबा देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त तुषार सहाणे, विश्‍वस्त ॲड. प्रसाद शिंदे, ॲड. अशोक संकपाळ, संदीप जगताप, राजकुमार लोढा, शिवराज झगडे, पंकज निकुडे, राष्ट्रवादीचे युवक नेते जयदीप बारभाई , सागर दरेकर, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप यांच्यासह जेजुरीकरांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले आणि माऊलींसह वैष्णंवावर बेलभंडाऱ्याची मुक्त उधळण केली. मावळतीच्या वेळी सोहळ्यावर भंडारा उधळला जात असताना संपूर्ण सोहळ्याला सोन्याची झळाळी आली होती.

चिंचेच्या बागेत मुक्काम

स्वागत स्वीकारून सायंकाळी सहा वाजता पालखी सोहळा जेजुरी येथील चिंचेची बाग या सुमारे नऊ एकरांच्या नवीन पालखीतळावर पोहोचला. ही जागा नगरसेवक नाना भानगीरे यांनी पालखी तळासाठी दिली आहे. मल्हार गडावरही वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. वारकरी पताकांनी गडाचा सारा परिसर फुलून गेला होता. जेजुरीतील चिंचेची बाग, छत्री मंदिर, लवथळेश्वर औद्योगिक वसाहत, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी तंबू उभारून वारकरी दिंड्या उतरल्या आहेत.

पालिकेतर्फे पुरेसा पाणीपुरवठा करण्यात आला आहे, गावातील विविध संस्था, मंडळांच्या वतीने वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. समाज आरतीनंतर सोहळा जेजुरी मुक्कामी विसावला. उद्या सकाळी ६ वाजता हा सोहळा वाल्हे मुक्कामाकडे निघणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *