नवीन लग्न झालेला टीव्ही पत्रकार

बायकोला राजी करून गेला वारीला

वारीची ओढ एखाद्याला किती लागू शकते? याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘झी २४ तास’ या न्यूज चॅनेलमध्ये काम करणारा मयूरेश कडव. वारीला जायला मिळावं म्हणून मयूरेश दरवर्षी प्रयत्न करायचा. शेवटी २०१० मध्ये त्याची विनंती मान्य झाली. पण, एक वेगळीच अडचण समोर आली. त्याचं नुकतंच लग्न झालं होतं! अखेर त्यानं बायकोला राजी केलं अन् तो वारीच्या वाटेला लागला. वाचा मयूरेशच्याच शब्दांत…

विठोबानं माझं म्हणणं ऐकलं…

पत्रकारितेत आल्यानंतर माझंही स्वप्न होतं, आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी कव्हर करायची. ‘झी २४ तास’मध्ये २००८ मध्ये जॉईन झालो, तेव्हापासून वारी कव्हर करायला मिळावी म्हणून दरवर्षी वरिष्ठांकडे तगादा लावायचो. विठुरायालाही माझी इच्छा समजली असावी आणि २०१० मध्ये मला वारीला जायला मिळालं. त्या वेळी अभिजित कांबळे सर, विठोबा सर ही मंडळी ‘आऊटपुट’ विभागात होती, तर मनोज गडनीस सरांच्या खांद्यावर ‘इनपुट’ची धुरा होती. या तिघांनीही कँटिनमध्ये बसून अचानक माझ्या निवडीचा निर्णय घेतला. त्यावेळी मी डेस्कवर बुलेटीनच्या गडबडीत होतो. त्यांनी मला आवाज दिला आणि वारीला जायचंय का? असं विचारलं. मी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. लगेच त्यांनी सांगितलं, लाग तयारीला…

परवानगी मिळाली, पण…

मी प्रचंड खूष झालो. अखेर प्रयत्न फळाला आले असं मनोमन म्हणत होतो; पण नंतर क्षणभर विचारात पडलो. चिंता हीच होती, की माझं लग्न नुकतंच मे महिन्यात झालं होतं. त्यात दोन जुलैला वारीला निघायचं. मग आता बायकोला पटवायचं कसं? कारण लग्नाला जेमतेम एकच महिना झालेला! पण विठ्ठलाच्या कृपेनं म्हणा किंवा लग्न नवीन नवीन होतं म्हणून म्हणा, तिनं थोड्याशा नाराजीनं का होईना होकार दिला. मी तिचा खरंच खूप मनापासून आभारी आहे. कदाचित ती त्या वेळी नाही म्हणाली असती, तर मला वाटत नाही पुन्हा ही संधी सहजासहजी मिळाली असती. तिच्या होकारानंतर मी लगेचच वारीची तयारी सुरू केली.

वारीत काय काय कव्हर करता येऊ शकतं, राहण्याची, खाण्यापिण्याची सुविधा इथपासून वारीविषयीच्या बारीकसारीक गोष्टींची माहिती देण्याचं काम माझे ‘झी’मधील सहकारी अमित जोशी आणि चंदन पूजाधिकारी या दोघांनी केलं. अमितने जो कानमंत्र दिला तो मी माझ्या आयुष्यात विसरणार नाही. त्यानं एव्हढंच सांगितलं होतं. ‘वारीत कुठेही गेलास तरी हातातला बूम सोडायचा नाही. अगदी टॉयलेटला गेलास तरीसुद्धा…’ मी त्याचा कानमंत्र ऐकला आणि खूप फायदा झाला. मीडियातल्या लोकांना वारीत अगदी अमिताभ बच्चनसारखी किंबहुना त्यांच्यापेक्षा चांगली वागणूक मिळते, हे माझं ठाम मत आहे. फक्त तुमच्या हातात बूम किंवा जवळपास ओबी, कॅमेरा असायला हवा. वारीला निघण्यापूर्वी माझ्या चुलत बहिणीचे मिस्टर शिंदे (अंबरनाथ) यांनी आपल्या नातेवाईकांकडून वारीसंदर्भातल्या काही सीडीज मिळवून दिल्या.

मी वारीला जातोय म्हटल्यावर वारकरी संप्रदायातल्या माझ्या अंबरनाथमधील मावशीनं (अनुसया हडप) अभंगाचं छोटंसं पुस्तक दिलं. ज्याचा मला संबंध वारीत खूप फायदा झाला. प्रत्येक लाईव्हची सुरुवात करताना, ओवी म्हणताना आपण कुणीतरी कीर्तनकारच आहोत असंच वाटायचं. असं सगळं झाल्यानंतर प्रत्यक्ष वारीच्या प्रवासाला सुरुवात झाली. मी, कॅमेरामन संदेश बैकर, अटेंडंट शेखर एका गाडीत आणि ओबी इंजिनीअर चिलवेरी अण्णा, ओबीचालक सुनील एका गाडीत.

सुरुवातच झाली बिघाडानं…

पहिलाच दिवस होता देहूतल्या मंदिरात. सकाळी नऊच्या बुलेटीनला माझ्या आयुष्यातलं पहिलंच लाईव्ह. त्यामुळं सगळी माहिती घेऊन घोकमपट्टी करूनच ठेवली होती. तिकडे स्टुडिओत अँकर होते अजितभाऊ चव्हाण. लाईव्ह सुरू झालं आणि अजितभाऊंनी खूप बॅटिंग केल्यानंतर मला पहिला प्रश्न विचारला. उत्तरादाखल मी जेमतेम दोन-चार वाक्यसुद्धा बोललो नसेल. भाऊंची तिकडे पुन्हा बॅटिंग सुरू झाली आणि मला काही प्रश्नच विचारला जाईना. मी म्हटलं झालं तरी काय? इकडे मंदिराच्या परिसरात वारकऱ्यांचं भजन जोरजोरात सुरू, पाच-दहा मिनिटं कानात फक्त भाऊंचाच आवाज. म्हटलं पहिल्याच लाईव्हला आपली पंचाईत झाली वाटतं. सगळं संपल्यावर पुन्हा ऑफिसला फोन केला तेव्हा कळलं, कॉर्डलेस बूमला काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे माझा आवाजच पोहचत नव्हता…असो.

त्यानंतर अगदी शेवटी फक्त एकदाच असा प्रसंग घडला. वाखरीत पोहचल्यानंतर जिथं सगळ्यात मोठं गोल रिंगण होतं तिथं मी आमच्या गाडीच्या टपावर दिमाखात लाईव्हसाठी उभा होतो. दुसरीकडे ओबीच्या टपावर संदेश कॅमेरा लावून लाईव्हच्या तयारीत होता. फोन कनेक्ट झाला आणि लाईव्ह सुरू होणार तेव्हढ्यात पोलिस आणि माऊलींच्या पालखीतली माणसं आली. ‘तुम्ही माऊलींच्या अश्वाच्या मार्गात गाडी लावलीय’ असं सांगून आमचं काहीही न ऐकता ताबडतोब तिथून हटायला सांगितलं. त्यामुळे त्या वेळेपुरतं लाईव्ह वगैरे काही झालंच नाही, हे वेगळं सांगायला नको.

विठोबानं केली पोटोबाची सोय…

वारीत खूप चांगले अनुभव आले. ते सगळेच लिहीत नाही. आठवणीत राहिलेला आणि सांगण्याजोगा एक किस्सा म्हणजे माळशिरसला पोहचल्यानंतर कुठेतरी काहीतरी घडलं त्यामुळे पोलिसांनी वारकऱ्यांसह सगळ्यांच्याच गाड्या अडवून धरल्या. तास-दोन तास झाले तरी ट्रॅफिक जागची हलेना, पोटात कावळे अक्षरश: ओरडू लागले होते. कुणीतरी आधीच सांगितलं होतं वारीत तुमची कधीच उपासमार होणार नाही. तशी ऑफिसनं आमच्या पोटापाण्याची हॉटेलात सोय लावली होती. पण तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकला असाल तर कुठचं हॉटेल आणि कुठचं काय? एका ठिकाणी वारकऱ्यांनी तंबू लावून जेवणाची तयारी सुरू केली होती. संदेश म्हणाला, चल मयूरेश झाली आपली जेवणाची सोय… वारकऱ्यांच्या भोजनावर, तयारीवर काहीतरी स्टोरी कर, दोन-चार बाईट घेऊन स्टोरी झाली की, वारकरी जेऊन जा असं म्हणतीलच.. मग लगेच ताव मारू… झालं आमचा प्लान शिजला. आम्ही तिथे गेलो. वारकरी खूप खूष झाले. सगळी तयारी शूट केली अगदी त्यांच्या दिंडीतल्या वारकऱ्यांच्या पंगतीचंही शूट केलं. बाईट घेतले. पण माऊली जेवायचा आग्रहच करेनात… आता काय? संदेश, मी आणि शेखर पुन्हा हिरमुसलो. आधीच पोटात भूक, त्यात आणखी अर्ध्या तासाची मेहनत…

निराश होऊन गाडीकडे परत येत होतो तोच एक वारकरी धावत आला आणि म्हणू लागला मीडियावाले चला, चला.. तिकडे आमचे वारकरी पोलिसांचा निषेध म्हणून रस्त्यातच पंगत लावून बसलेत. संदेश आणि मी तिकडे गेलो तर खरंच वारकऱ्यांनी रस्त्यातच पंगत मांडली होती. संदेशनं लगेच वरणाची बादली हातात घेतली आणि वाढप्याचं काम करू लागला, मी पण भाजी घेतली आणि वाढायला लागलो. थोडा वेळ वाढप्याची भूमिका साकारल्यानंतर वारकऱ्यांनीच आम्हाला हाताला धरून जेवायला बसवलं. विठ्ठल पावलाच म्हणायचा..! असे खूप सारे किस्से वारीत घडले.

वारीत टीव्हीवाल्यांची क्रेझ…

लोकांचं प्रेम मिळत होतं. काही ठिकाणी नको इतका बातमीसाठी आग्रह होत होता. काही जण तर नुसता कॅमेरा फिरवा, दाखवायचं असेल तर दाखवा नाहीतर राहिलं, असंही सांगायचे. एकदा तर बंडातात्या कराडकर दाढी करत बसले होते. (त्या वेळी त्यांचं डाऊ आंदोलन खूप गाजलं होतं) एक वारकरी बूम पाहून आमच्याजवळ धावत आला. चला म्हणे तिकडे बंडातात्या कराडकर दाढी करतायेत. शूटिंग करा. असं दृश्य तुम्हाला कधी पाहायला मिळणार नाही. आमची हसताहसता पुरेवाट झाली होती. वारीत अनेक गमतीजमती घडायच्या. हातात ‘झी २४ तास’ असा ठळक अक्षरातला बूम पाहूनही बरेच जण काय ‘आयबीएन लोकमत’ का? ‘स्टार माझा’ की ‘ईटीव्ही’वाले (आताचं Abp तेव्हा Star होतं) असा प्रश्न विचारायचे. कधीकधी रागही यायचा तर कधी गंमत वाटायची. संदेश तर रागावूनच त्यांना बूम दाखवून वाचायला सांगायचा. मग ते मोठ्या आवाजात म्हणायचे ‘झी २४ तास..’ एकदा तर कहरच झाला.

एका मुक्कामी सहज ओबीमधून प्रवास करावा असं वाटलं म्हणून सुनीलसोबत बसलो. ओबीत बसल्यानंतर आपण सर्कशीतले प्राणी तर नाहीत ना? याची जाणीव व्हायला लागली. एक तर ओबीबद्दल लोकांना प्रचंड कुतूहल आणि जोडीला त्यांचे असंख्य प्रश्न. त्यांना नेमकं कसं समजवावं हेच कळत नव्हतं. आमची ओबी मुंगीच्या गतीनं पुढे पुढे सरकत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूनं वारकरी चालत होते. अशातच एका पोरसवद्या वारकऱ्यानं कुणाला तरी मोबाईलवरून फोन लावला आणि सेम ‘आर्ची’ स्टाईलनं आवाज दिला, ‘ए भावड्या टीव्ही बघ.. मी ‘झी टॉकिज’वर दिसतोय..’ मी अक्षरशः फुटलो… सुनील म्हणाला, रोज आम्हाला असे पाच पंचवीस भेटतात. मी सुनीलला कोपरापासून नमस्कार केला म्हटलं तुम्ही खरंच ग्रेट आहात. नशीब तेव्हा सेल्फी-बिल्फीचं फॅड नव्हतं…

आता ओबी पाहिल्यानंतर काय होत असेल माहीत नाही. या प्रसंगानंतर संपूर्ण वारीत ओबीतून प्रवास करण्याचा आग्रह मी अजिबात धरला नाही. मजल दरमजल असाच आमचा प्रवास सुरू होता. अनुभव येत होते. एक प्रसंग असा होता की, जेजुरी ते वाल्हेदरम्यान प्रचंड ट्रॅफिक झालं. ओबी आणि आमची ताटातूट झाली. हातातलं फुटेज ऑफिसला पाठवता येईना, गाडी जागची हलेना. अशा परिस्थितीत आम्ही पाचेक किलोमीटरचं अंतर पायीच चाललो.

माझा फोटो उद्धव ठाकरेंनी टिपला…

या वारी सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या वेळी वारीत ‘गजर’ सिनेमाचं शूटिंग सुरू होतं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रोज हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफीसाठी येत. ‘गजर’ सिनेमाचं माहीत नाही, पण उद्धव ठाकरेंच्या ‘पहावा विठ्ठल’ या पुस्तकात माझी छबी टिपली गेलीय. अर्थात हा फोटो हेलिकॉप्टरमधून काढलेला असल्यानं मी त्यात स्पष्ट दिसत नाही. आधी सगळ्यांना फेकाफेकीच वाटायची, पण नंतर चौधरी यात्रा कंपनीची बस, त्याच्या टपावरचा कॅमेरा, कॅमेरासमोर सदऱ्यात उभा असलेला मीच आहे या खाणा-खुणा पटवून दिल्या, की पाहणारेही आश्चर्यानं म्हणतात, हो रे.. फोटोत तूच आहेस की! तेव्हा खूप बरं वाटतं.

खरंच २० ते २१ दिवसांचा हा वारीसोहळा आनंदाची अनुभूती देतो. जगण्याचा खरा अर्थ इथं आल्यानंतर कळतो. आपल्याला बऱ्याचदा वाटतं काय असतं त्या वारीत. हातात टाळ घ्यायचे आणि उगीचच पायी चालत पंढरपुरात जायचं. पण जोपर्यंत तुम्ही वारीत जात नाहीत तोपर्यंत तुम्हाला ‘वारी’ कळणारच नाही. वारीतले खेळ, रिंगण सोहळा, वारकऱ्यांचा रोजचा दिनक्रम, तिथली शिस्त हे सगळं तुम्ही त्रयस्थ म्हणून जरी अनुभवलं तरी तुमच्या अंगात चैतन्य संचारल्याशिवाय राहत नाही; मग विचार करा तुम्ही त्या वारीचा भाग असाल तर..? असो.

आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही झीरो…

पंढरपुरात आम्ही जेव्हा प्रत्यक्ष आषाढी एकदशीच्या दिवशी पोहचलो. तेव्हा काय करावं, कुठं उभं रहावं, असा प्रश्न पडतो. कारण सबंध वारीत तुम्ही खरंच हीरो असता; पण प्रत्यक्ष आषाढीच्या दिवशी झीरो होता. कारण एकतर तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या महापूजेचं कव्हरेज करता येत नाही. मंदिर परिसरातला मानाच्या वारकऱ्यांचा सत्कार सोहळा सोडला तर बाकी चॅनलच्या पत्रकारांना मंदिर परिसरात ठाण मांडता येत नाही. तिथं फक्त चालतं ते ‘सह्याद्री’राज! पत्रकार म्हणून त्या दिवसापुरता का होईना ‘सह्याद्री’चा रागपण येतो आणि हेवापण वाटतो. त्यांचे मोठमोठाले कॅमेरे, अँकर, संपूर्ण लवाजमा पाहिल्यानंतर आपण खूप खुजे आहोत असं वाटायला लागतं. ‘सह्याद्री’ची ओबी पाहिल्यानंतर पहिला प्रश्न पडला ही नक्की ओबी आहे की, अग्निशमन दलाची गाडी! अख्खा पीसीआर मावेल इतकी जागा आणि साधनसामग्री. हाही एक चांगला अनुभव या वारीच्या निमित्तानं अनुभवता आला.

खरं तर या वारीच्या निमित्ताने सहकाऱ्यांचे आभार मानावे तितके कमीच. पण या प्रवासाविषयी लिहिताना त्यांच्याप्रती आवर्जून कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते ती म्हणजे माझे सहकारी रमेश जोशी आणि कपालिनी सिनकर यांच्याबद्दल. मी वारी कव्हर करत असताना डेस्कवर कोऑर्डिनेट करण्याची संपूर्ण जबाबदारी या दोघांवर होती. वेळोवेळी पाठवलेलं स्क्रिप्ट, वन टू वन, वॉक थ्रू, फूटेज याच्या अचूक नोंदी ठेवून कपालिनी हा फॉलोअप रमेशकडे देत होती आणि रमेश माझ्या प्रत्येक बातमीवर स्वत:च्या बातमीइतकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रेम करून ते ऑनएअर घालवण्यासाठी कष्ट घेत होता. या सगळ्यांमुळेच माझी वारी खूप चांगली झाली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!

असा सगळा एकंदरित हा वारीचा प्रवास आणि अनुभूती होती. आता माझ्या वारीला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण आजही ही वारी काल-परवा केल्यासारखीच वाटते. आयुष्यात पुन्हा संधी मिळाली तर वारीला जायला नक्कीच आवडेल. मी तर म्हणेन मराठी मातीत जन्मलेल्या प्रत्येकानं आयुष्यात एकदा का होईना वारी करायलाच हवी! जय हरी.

मयुरेश तुकाराम कडव, सीनिअर प्रोड्युसर/अँकर, झी २४ तास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *