उमरी येथील माजी नगराध्यक्ष

पंढरीनाथ उत्तरवार यांची देणगी

हिंगोली : नांदेड जिल्ह्यातील उमरीचे माजी नगराध्यक्ष आर्यवैश्य समाजसेवक विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईसाठी १ कोटी रुपयांचे शुद्ध सोन्याचे दोन मुकुट बनवले आहेत. येत्या आषाढी एकादशीला उत्तरवार कुटुंब पंढरपुरात जाऊन हे सुवर्ण मुकुट अर्पण करणार आहेत.

एकूण किंमत १ कोटी ३ लाख

उत्तुर यांनी काही दिवसांपूर्वी देवाला हे मुकुट अर्पण करण्याचा संकल्प केला होता. हे दोन्ही मुकुट एकूण १९६८ ग्राम शुद्ध सोन्यापासून बनविले गेले आहेत. त्यांची एकूण किंमत १ कोटी ३ लाख रुपये आहे. मे. विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार सराफ आणि जयश्री उत्तरवार यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र ओंकार, अरविंद, अजय, अच्युत आणि डॉ. अनंत उत्तरवार हे मुकुट अर्पण करण्यासाठी जाणार आहेत. ही माहिती विजयकुमार उत्तरवार यांनी हिंगोली येथे पत्रकार डॉ. विजय नीलावार यांच्या निवासस्थानी दिली.

उत्तरवार कुटुंबीयांचा सत्कार

कोरोनाच्या सुरुवातीला विजयकुमार उत्तरवार ह्यांनी उमरी नगर परिषद, सरकारी दवाखाना आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठीही भरघोस देणगी दिली होती. त्यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल त्यांचा कुटुंबीयांसह सत्कार त्यांचे भाचे डॉ. विजय नीलावार यांनी केला.

विठ्ठल रखुमाईचे दागिने ७०० वर्षांपूर्वीचे 

गेल्या ७०० वर्षांपूर्वीपासून भक्त आणि राजेरजवाड्यांनी विठ्ठल-रखुमाईला अर्पण केलेले दागिने जपून ठेवण्यात आले आहेत. त्यातील प्रत्येक दागिन्यामागे एक रंजक गोष्ट आहे. ठरावीक दागिना कधी घालावा, याबद्दल पाळले जाणारे संकेतही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी सकवारबाई, संभाजीपुत्र छत्रपती शाहू महाराज, बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, शिंदे सरकार, अहिल्याबाई होळकर, नाना फडणवीस आदींनी वेळोवेळी श्री विठ्ठल-रुक्मिणीला अनेक मौल्यवान दागिने अर्पण केले आहेत.

श्री विठ्ठलाचे दागिने

श्री विठ्ठलाला सोन्याचे पैंजण, तोडे आहेत. सोन्याचे सोवळे (धोतर) आहे. कमरेला अमूल्य असा हिऱ्यांचा कंबरपट्टा आहे. तो नरहरी सोनारांनी घडवला आहे. हातामध्ये तोडे, बाजुबंद, दंडपेट्या, मणिबंध, सोन्याची राखी आहे. गळ्यामध्ये सोन्याची तुळशीची पंचेचाळीस पाने असलेली सोन्याच्या मण्यांत गुंफलेली माळ आहे. २० ते २५ पाचूंनी मढवलेला, मीनाकाम केलेला लहानमोठ्या सात फुलांचा लफ्फा आहे. देवाची ओळख ज्या कौस्तुभमण्यामुळे होते तो पाचूंनी मढवलेला, गोल नक्षी असलेला कौस्तुभमणी आहे. तो अगदी गळ्यालगत घालतात. बाजीराव पेशव्यांनी अर्पण केलेली हिरे, पाचूंनी गुंफलेली मोत्यांची कंठी आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये एकसारखे असे ४४ मोती आहेत. बोरमाळ, मोत्यांच्या माळा, पुतळ्यांच्या माळा, मोहरांच्या माळा असे गळ्यात घालायचे दागिने आहेत. मोहरांवर उर्दू आणि मोडी लिपीतील अक्षरे आहेत. मोरमंडोळी नावाचा दागिना आहे. त्यात पाचू, हिरे आणि अतिशय मौल्यवान माणिक बसवलेला आहे. नवरत्नांचा हार आहे. त्यात मोती, हिरे, पाचू, पुष्कराज अशी नऊ रत्ने बसवलेली आहेत. पाचूचा पानड्यांचा हार आहे.

विठुरायाला ६ सोन्याचे मुकुट

डोक्यावरील दागिन्यांमध्ये सहा सोन्याचे मुकुट आहेत आणि तीन-चार चांदीचे, सोन्याचे पाणी दिलेले मुकुट आहेत. सगळ्या मुकुटांत अमूल्य असा हिऱ्यांचा मुकुट आहे. त्याला सूर्यकिरणांचा मुकुट म्हणतात. इतर पाच सोन्याचे मुकुट आहेत. सोन्याची शिंदेशाही पगडी आहे. पाडव्याला चांदीची काठी, खांद्यावर घोंगडी, धोतर, पगडी असा पोशाख असतो. पगडीवर बसवण्यासाठी रत्नजडित शिरपेच आहे. हे चार आहेत. अतिशय पुरातन आणि मौल्यवान पाचू, हिऱ्यांनी मढवलेले आहेत. सोन्या-मोत्यांचे तुरे आहेत. देवाची ओळख ज्या मकरकुंडलांमुळे होते ती कानात घालण्याची सोन्याची मकरकुंडले आहेत. त्यात माणिक आणि पाचू जडवलेले आहेत. कपाळावर किमती नील आणि हिरे बसवलेला नाम म्हणजे सोन्याचा गंध आहे.

श्री रुक्मिणी मातेचे दागिने

साक्षात श्री लक्ष्मीचा अवतार असणाऱ्या रुक्मिणी मातेला अनेक सुंदर, अमूल्य दागिने आहेत. पायातील सोन्याचे वाळे, पैंजण आहेत. सोन्याची साडी आहे. दोन कंबरपट्टे आहेत. एक सोन्याचा आहे. दुसरा माजपट्टा आहे. हा वेगळ्या प्रकारचा कंबरपट्टा आहे. त्याला बसवण्यासाठी किल्ली आहे. रत्नजडित पेट्या आहेत. त्या हिरे, माणिक, पाचू अशा रत्नांनी मढवलेल्या आहेत. हातामध्ये पाटल्या, मोत्यांच्या, रत्नजडित जडावांच्या बांगड्या गोठ, तोडे आहेत. तोडे शिंदेशाही पद्धतीचे आहेत. हातसर आहेत. त्यामध्ये हिरे, माणिक, पाचू जडवले आहेत. चटईची वीण असलेल्या वाक्या आहेत. माणिक, पाचू जडवलेले बाजुबंद आहेत. गळ्यातील अलंकारांमध्ये कारल्याचे मंगळसूत्र, दशावतारी मंगळसूत्र, कोल्हापुरी साज, पाचूची गरसोळी, लहान सरी, मोठी सरी, पुतळ्याची माळ, मोहरांची माळ, एकदाणी, बोरमाळ, ठुशी, तुळशीचा हार, झेला, पोहे हार, चंद्रहार,चपलाहार, पेट्यांचा हार, शिंदेशाही हार, तन्मणी, चिंचपेटी, नवरत्नांचा हार, शिंदे हार, जवाच्या माळा आणि हायकोल असे दागिने आहेत.

निजामाच्या दिवाणाने दिला नवरत्न हार

गळ्यातील सारे अलंकार अतिशय मौल्यवान आहेत. यातील नील, पाचू, हिरे यांनी जडवलेला नवरत्न हार निजामाचे दिवाण चंदूलाल यांनी मातेला सुमारे ४०० वर्षांपूर्वी अर्पण केलेला आहे. तो अत्यंत मौल्यवान आहे. दुसरा मौल्यवान दागिना म्हणजे शिंदे हार. जडताचे सोन्याचे आवळे असलेला, पाचूंनी जडवलेला, मोत्यांनी गुंफलेला, तीन तुकड्यांत विभागलेला हा हार आहे. तो पेशव्यांचे सरदार जयाजी शिंदे यांनी अर्पण केला आहे. अतिशय किमती असा हा हार शिंद्यांचा हार म्हणून ओळखतात. रुक्मिणीची उंची कमी असल्यामुळे तो हार रुक्मिणी मातेच्या पायाच्याही खालपर्यंत येत होता. म्हणून तीन तुकड्यांमध्ये विभागून एकमेकांत अडकवून घालतात. त्याला आवळ्याचा हार असेही म्हणतात. याशिवाय छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला हिऱ्यांचे खोड असलेला तन्मणी आहे. तारामंडल हा एक दागिना आहे.

टिपू सुलतानाचा संदर्भ

असे म्हणतात की टिपू सुलतानला काही शाळीग्राम मिळाले. ते कालांतराने मराठेशाहीत आले. त्यात हिरे निघाले. त्यापासून लफ्फा तयार केला आणि तो रुक्मिणी मातेला अर्पण केला. एक मोत्याची, एक पाचूची, एक माणकाची आणि एक हिऱ्याची अशा या चार चिंचपेट्या, बाजीराव पेशव्यांनी दिलेली गरसोळी आहे. जवाच्या दोन माळा आहेत. रुक्मिणी मातेला देवाने सोन्याचा वरवंटा केला, असे मानले जाते. त्याला ‘हायकोल’ म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सकवारबाई आणि पेशवे या सर्वाचे शिक्के असलेली मोहरांची माळ आहे. कानामध्ये घालण्यासाठी गुजराती पद्धतीचे तानवडे आहेत. द्वारकेवरून रुसून आल्याची ती खूण आहे. सोन्यात गुंफलेली मोती जडावांची कर्णफुले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे  सोन्याचे मत्स्यजोड आहेत. त्याच्या डोळ्यांमध्ये माणिक बसवलेले आहेत. खवल्यांमध्ये परब म्हणजे हिऱ्यांचे तुकडे बसवलेले आहेत आणि शेपटीमध्ये लालबुंद माणिक आहेत. अतिशय मौल्यवान असे हे मत्स्यजोड देवाप्रमाणे रुक्मिणी मातेलाही आहेत. कानात घालायच्या बाळ्या आहेत.

चार मुकुट, तीन नथी…

नाकामध्ये घालायच्या तीन नथी आहेत. एक मोठी मोत्यांची नथ, दुसरी हिऱ्याची नथ आणि तिसरी एक मोत्याची नथ. एक मोत्याची नथ शेजारती करताना घालतात. याशिवाय मारवाडी पद्धतीची नथदेखील आहे. नवरात्रीमध्ये द्वितीयेला रुक्मिणीला मारवाडी लमाणी पद्धतीचा पोशाख करतात. त्या वेळी ही नथ आणि झेला म्हणून एक दागिना आहे तो घातला जातो. या दागिन्यांच्या पदकामध्ये सोन्याचं कान कोरणं, दातकोरणं आहे. हे लमाणी पद्धतीचे दागिने वर्षांतून फक्त एकदा- नवरात्रीत द्वितीयेला घातले जातात. रुक्मिणी मातेला भांगेत घालण्यासाठी सोन्याचा रत्नजडित बिंदी बिजवरा आहे. पेट्यांची बिंदी आहे. डोक्यात घालण्यासाठी रत्नजडित हिऱ्याची वेणी आहे. तिला मुद्राखडी म्हणतात. रुक्मिणी मातेला चार प्रकारचे सोन्याचे मुकुट आहेत. एक जडावाचा, दुसरा शिरपेच आणि तिसरा नुसता सोन्याचा मुकुट आहे. चांदीचे, सोन्याचे पाणी दिलेले दोन मुकुट आहेत. सोन्याचा चौथा खूप जुना मुकुट आहे तो आता जीर्ण झाला आहे. त्याला परबाचा मुकुट म्हणतात. कपाळावर लावण्यासाठी सोन्याची जडावाची चंद्रकोर आहे. तिला चंद्रिका म्हणतात. तसेच सोन्याचे रत्नजडित सूर्य आणि चंद्र आहेत. याशिवाय मातेला मोठे चांदीचे दोन आणि सोन्याचा एक करंडा आहे. महत्त्वाचे सण, महालक्ष्मीचे तीन दिवस, नवरात्र, या दिवशी मातेची निरनिराळ्या पद्धतीचे पोशाख व दागिने घालून पूजा केली जाते. नवरात्रीत ललितापंचमीला पूर्ण फुलांचा पोशाख केला जातो. अष्टमीला पांढरी रेशमी साडी व पूर्ण मोत्यांचे दागिने घालतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *