श्री संत नामदेव जयंतीनिमित्त
पालखी पत्रकार संघाचा उपक्रम
पंढरपूर : समतेचा वारकरी विचार देशभर पोचवत भागवत धर्माची पताका अटकेपार फडकविणारे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंती निमित्त पंढरपूर ते पंजाबमधील घुमान अशी सायकल यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
४ ते २४ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान या सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. ४ नोव्हेंबर या संत नामदेव महाराजांच्या जयंतीच्या दिवशी ही वारी सुरू होईल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा सांगता दिनाच्या दरम्यान म्हणजे २४ नोव्हेंबरला या सायकल वारीची सांगता होईल.
महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ, संत नामदेव समाजोन्नती परिषद आणि श्री संत नामदेव समाज युवक संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा २१ दिवसांचा सायकलवारी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे आणि संत नामदेव समाजोन्नती परिषदेचे सचिव डॉ. अजय फुटाणे यांनी याबाबत माहिती दिली.
संत नामदेव महाराजांचे वंशज ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज नामदास, केशव महाराज नामदास, कृष्णदास महाराज नामदास, मुकुंद महाराज नामदास आणि माधव महाराज नामदास यांनी या उपक्रमासाठी आशीर्वाद दिले आहेत.
बंधुभावाचा वारकरी विचार सांगत, भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन संत नामदेव देशभर फिरले. पंजाबमधील घुमान या गावी त्यांनी तब्बल २० वर्षे वास्तव्य केले. इथेच त्यांनी शीख धर्माचा पाया घातला. त्यामुळे ते शीख धर्मीयांसाठी पूजनीय बनले. शिखांच्या गुरू ग्रंथ साहीब या पवित्र ग्रंथात संत नामदेवांच्या ६१ पदांचा समावेश करण्यात आला आहे. बाबा नामदेवजी म्हणून संत नामदेवांची पंजाबात ओळख आहे.
वयाच्या ८० व्या वर्षी आपली मायभूमी पंढरपुरात येऊन नामदेवरायांनी समाधी घेतली. त्यामुळे पंढरपूर आणि घुमान अर्थात महाराष्ट्र आणि पंजाब नामदेवरायांच्या प्रेमबंधाने बांधला गेला आहे. २०१५ मध्ये घुमानमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यात आले होते. या सायकलवारीमुळे मराठी आणि पंजाबी समाजाचे हे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होईल, असे पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले.
श्री क्षेत्र पंढरपूर, फलटण, सासवड, पुणे, आळंदी, देहू, नाशिक, त्र्यंबकेश्वर मार्गे ही सायकल वारी महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यांतून अमृतसर मार्गे घुमान असा २ हजार १०० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या वारीत संत नामदेव महाराज आणि गुरू गोविंदसिंह यांचे पवित्र ग्रंथ, पादुका, भागवत धर्माची पताका आणि पालखी रथ असणार आहे. या वारीत १८ ते ३० वयोगटातील स्त्री, पुरुष सायकलस्वारांना सहभागी करून घेतले जाणार आहे. या सायकलस्वारांचा श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमानपर्यंतचा चहा, नाश्ता, जेवण आणि निवास तसेच घुमानहून सायकली पंढरपूरपर्यंत गाडीने आणण्याचा खर्च मोफत करण्यात येणार आहे.
या सायकल वारीत सहभागी होण्यासाठी सूर्यकांत भिसे (वेळापूर) ९८२२०२३५६४, डॉ. अजय फुटाणे (पुणे) ९४२२३६२५९५,
शंकर टेमघरे (पुणे), ७९७२८५३८९५ , संजय नेवासकर (पुणे) ९८२२२८१५८८, ॲड. विलास काटे (आळंदी), ९८२२८५४९५५ , रोहित यवतकर (पुणे) ९९७०००१०१०, सुनील गुरव (पंढरपूर) ९७६७२५७३६७, मनोज मांढरे (सासवड) ९४२२३०३३४३, सुभाष भांबुरे (फलटण)९८२२४१४०३०, गणेश जामदार (अकलूज) ९७६७७९९५९५, सिध्देश हिरवे (शिक्रापूर) ८०८७७६२७८२ आणि अनंत जवंजाळ (वेळापूर) ७४१०११०४०३ यांच्याशी ३० सप्टेंबर २०२२ पूर्वी संपर्क साधून नाव नोंदणी करावी.
नाव नोंदणी करताना ग्रामपंचायत किंवा पोलीस ठाण्याचा वर्तणुकीचा दाखला, ओळखपत्राची झेरॉक्स, दोन आयकार्ड साईझ फोटो, शासकीय किंवा खासगी रुग्णालयाचे फिटनेस सर्टिफिकेट, कोरोनाचा बूस्टर डोस घेतलेले सर्टिफिकेट आवश्यक असल्याचे आहे, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहेत.
या सायकल वारीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र आळंदी, श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू, श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्री संत सोपानदेव महाराज संस्थान श्री क्षेत्र सासवड, श्री संत मुक्ताबाई महाराज संस्थान श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर, श्री संत नामदेव महाराज संस्थान श्री क्षेत्र पंढरपूर आणि श्री संत एकनाथ महाराज संस्थान श्री क्षेत्र पैठण यांचे सहकार्य लाभणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.