तुकोबांचे टाळकरी मवाळबुवा

यांच्या मंदिरात दिवे उजळले

कडूस : तुकोबारायांच्या अभंगांचे लेखक आणि मुख्य टाळकरी गंगाराम बुवा मवाळ यांच्या गावी म्हणजे पुणे जिल्ह्यातील कडूस गावी पंढरीच्या श्री विठ्ठलाच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. आजपासून (बुधवार दि. २) प्रतिपंढरपूर असलेल्या कडूसमध्ये माघी नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाविक गंगाराम बुवा यांच्या मंदिरात आजपासून अखंड नंदादीप लावण्यास सुरुवात झाली.

शेकडो दिव्यांचा पांडुरंग उत्सव
माघ शुद्ध प्रतिपदा ते नवमी नवरात्र आणि नंतर शुद्ध दशमी ते पौर्णिमा या ६ दिवसांत पंढरीचा पांडुरंग या ठिकाणी येऊन मुक्कामी राहतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध नवमी अशा या नवरात्रोत्सवाच्या काळात हजारो भाविक येथे नंदादीप लावतात. माघ शुद्ध दशमीला पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवतात. त्यानंतरचे ६ दिवस पांडुरंग उत्सवास प्रारंभ होतो. या उत्सवाचे यंदाचे ३७६ वे वर्ष आहे.
याबाबतची कथा अशी की, पुणे जिल्ह्यातील तळेगावच्या महाजन कुटुंबात श्री गंगाजी यांचा जन्म झाला. त्यांच्या कुळात पाडुरंग भक्ती होती. तळेगाव आणि देहू गावाच्या मध्ये भंडारा डोंगर आहे. या डोंगरावर तुकोबाराया साधनेसाठी जात. तिथं आपली म्हैस चारण्यासाठी आलेल्या गंगाराम बुवांचे मन नैराश्येनं ग्रासलं होतं. गळफास घेऊन ते आत्महत्येचा प्रयत्न करत होते. त्यातून तुकोबारायांनी त्यांना सोडवलं आणि त्यांचं हृदय परिवर्तन केलं. त्यानंतर गंगाजी बुवा तुकोबारायांचे मुख्य टाळकरी बनले. मवाळ स्वभावाच्या गंगाराम बुवांना तुकोबाराय गंगाराम बुवा मवाळ असेच संबोधू लागले.
कडूस गाव तुकाराम महाराजांच्या देहू परिसरात आहे. तसेच तुकोबारायांच्या गुरुंच्या गावच्या रस्त्यावर म्हणजे जुन्नर तालुक्यातील ओतूर या बाबाजी चैतन्य यांच्या गावी जाणाऱ्या रस्त्यावर आहे. त्यामुळे या परिसरात त्यांचे येणेजाणे होते. एकदा तुकाराम महाराजांचे कडूसजवळच्या चास गावी कीर्तन झाले. तेव्हा झालेल्या साक्षात्कारानुसार त्यांनी सोबतची पांडुरंगाची मूर्ती कडूसमधील कुलकर्णी यांच्या मातीच्या वाड्यात प्रतिष्ठापन केली. टाळकरी गंगाजीबुवा मवाळांना त्यांनी तिथे थांबायला सांगितलं.
त्यानंतर गावकऱ्यांनी मंदिरासाठी जागा इनाम दिली. आता हे ठिकाण मवाळांचा वाडा किंवा मवाळांचे मंदिर म्हणून ओळखलं जातं. हे मंदिर खुप जुनं आहे. आत मवाळांची एक खोली आहे. या मंदिराला दोन दरवाजे आहेत. उजव्या दरवाजाला तुकाराम पायारी म्हणतात. माघ शुद्ध दशमी ते पौर्णिमा या काळात इथं मोठा सप्ताह होतो. भजन, कीर्तन, आरती, पूजन असे धार्मिक कार्यक्रम चालतात. या कार्यक्रमासाठी गावातील ब्राह्मण समाज पुढाकार घेतो, पण गावातील सर्व जाती-जमाती मिळून हा उत्सव करतात. सहा दिवस अन्नदान केले जाते. अन्नदानाचा पाहिला मान मवाळांचा असतो. गोडसे, पानसरे (शिंपी समाज) यांचेही मान असतात. या मानाव्यतिरिक्त गेल्या २० वर्षांपासून चिठ्या टाकून इतरांनाही अन्नदानाची संधी दिली जाते.
उत्सवात पंढरीहून येणाऱ्या पांडुरंगाच्या स्वागतासाठी पायघड्या टाकल्या जातात. पांडुरंग सहा दिवस इथं राहतात, अशी श्रद्धा आहे. या सहा दिवसांत देव कडूसला गेले म्हणून पूर्वी पंढरपूरला पांडुरंगाची आरती होत नसे. आता ही प्रथा बंद झाली आहे. उत्सव काळात संत तुकाराम महाराज सात दिवस इथं थांबायचे. वीणा घेऊन देवाजवळ उभे राहायचे. ते हयात असेपर्यंत अंदाजे २८ वर्षे इथे येत होते, असं सांगितलं जातं. इथं असताना तुकाराम महाराजांना जे अभंग स्फुरत ते अभंग मवाळ बुवा लिहून काढायचे. ती सुमारे ६०० पानांची हस्तलिखित गाथा मवाळ यांच्या वंशजांनी जपून ठेवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *