पंतप्रधान मोदींच्या हस्ते

शिळा मंदिराचे लोकार्पण

देहू : पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी देहूमध्ये येणार आहेत. त्यांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना देहूत येण्याचे निमंत्रण देण्यात आले होते. विश्वस्तांसोबत त्यावेळी तुषार भोसलेही होते. देहूकरांचे हे निमंत्रण पंतप्रधानांनी स्वीकारले आहे. १४ जून रोजी पंतप्रधान देहूत येणार आहेत, अशी माहिती आचार्य तुषार भोसले यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान देहूत
महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी हा ऐतिहासिक क्षण असेल, असे आचार्य तुषार भोसले यांनी टि्वटमध्ये लिहिले आहे. इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्री क्षेत्र देहूत येणार आहेत. असेही त्यांनी लिहिले आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी १४ जून रोजी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करणार असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
शिळा मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार
गेले काही वर्षे देहूतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री तुकोबारायांच्या शिळा मंदिराचे लोकवर्गणीतून काम सुरू होते. इंद्रायणी नदीत गाथा बुडविल्यानंतर आनंद डोहाशेजारी ज्या दगडी शिळेवर संत तुकाराम महाराज अनुष्ठानाला बसले त्याच शिळेचा काही भाग तुकोबारायांच्या पूर्वजांनी उभारलेल्या विठ्ठल रुक्मिणी आणला गेला. त्यावर मंदिर उभारण्यात आले. याच मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे.

मूळ मंदिराचे सौंदर्य अबाधित ठेऊन आकर्षक असे संपूर्ण दगडी बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम पूर्ण होण्यास १२ वर्षे लागली. या कामासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च झाला. शिवाजी बुट्टे या शिल्पकाराने मंदिराचे हे काम केलेले आहे. मंदिराला दोन सोन्याचे कळस बसविण्यात येणार आहेत. अकलूज येथील विजयश्री पाटील, सुशांत पाटील, निशांत पाटील, ऋतुराज पाटील यांच्या वतीने हे सोन्याचे कळस देण्यात आले आहेत. देहूत येणारा प्रत्येक भाविक या शिळा मंदिरात नतमस्तक झाल्याशिवाय जात नाही. ऐन वारीच्या तोंडावर आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या दौऱ्याला महत्त्व आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *