शरद पवार यांच्या हस्ते
गुरुजींचे स्मारक लोकार्पण
पंढरपूर : संत नामदेवांनी अस्पृश्य समजल्या गेलेल्या आणि मंदिरात प्रवेश न दिल्या गेलेल्या संत चोखोबांची हाडे विठ्ठलाच्या दारात आणून पुरली. त्याचप्रमाणे साने गुरुजींनी जातीअंताचा लढा लढत दिनदलितांना मंदिरात प्रवेश मिळवून दिला. पंढरपुरातील स्मारकाच्या रुपाने गुरुजींचे हे कार्य सर्वांना प्रेरणा देत राहील, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले.
शरद पवार यांच्या हस्ते पंढरपूर येथील साने गुरुजी यांच्या स्मारकाचे मंगळवारी (दि. ८ नोव्हेंबर) ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पंढरपुरातील तनपुरे महाराज मठात यानिमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संत तनपुरे बाबा यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम देखील पार पडला.
यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात साने गुरुजींच्या कार्याचा विस्ताराने उल्लेख करीत या कार्यक्रमाला किमान ऑनलाईन हजर राहता आले, याबद्दल आयोजकांचे आभार मानले. संत नामदेवांनी मंदिरात प्रवेश न दिल्या गेलेल्या चोखाबांची हाडे आणून विठ्ठल मंदिराबाहेर त्यांचे स्मारक उभे केले. तर साने गुरुजी यांनी जातीअंताचा लढा लढत दिनदलितांना मंदिरात प्रवेश मिळवून दिला. त्यांच्या या लोकोत्तर कार्याची या स्मारकाच्या निमित्ताने इतिहासात नोंद झाली आहे, असे पवार म्हणाले.
या सोहळ्यासाठी शरद पवार पंढरपूरला येणार होते. परंतु, तब्येत बिघडल्याने त्यांना ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना किमान आठवडाभर रुग्णालयात राहण्याची गरज असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी मुंबईतूनच या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावत लोकार्पण केले.
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्व जातीच्या लोकांना खुले करण्यासाठी १ मे १९४७ ते १० मे १९४७ या काळात प्राणांतिक उपोषण केले होते. साने गुरुजींची तब्येत खालावू लागल्यावर अखेर विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश देण्याचे मान्य करण्यात आले. हे उपोषण साने गुरुजी यांनी संत तनपुरे महाराज यांच्या मठात केले होते. या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त साने गुरुजी यांच्या विचाराचे स्मारक तनपुरे मठात उभारण्यात आले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ अवसक यांनी पुढाकार घेऊन संत सेनानी साने गुरुजी मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मारक समिती स्थापन केली. त्या माध्यमातून अथक पाठपुरावा करत हे स्मारक उभारले.
साने गुरूजी यांच्या स्मारकाचे शरद पवार यांच्या हस्ते ऑनलाईन लोकापर्ण झाल्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संत बद्रीनाथ महाराज तनपुरे, आमदार बबनदादा शिंदे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, पन्नालाल सुराणा, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यासोबतच मंगळवारी (दि. ९) संत तनपुरे बाबा यांचा ३७ वा पुण्यतिथी सोहळा असल्याने राष्ट्र सेवादलाच्या कार्यकर्त्यांसह शेकडो वारकरी या सोहळ्यासाठी उपस्थित होते.