संत मुक्ताई अंतर्धान समाधी

सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव

मुक्ताईनगर : संत श्रेष्ठ श्रीमंत आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या ७२५ व्या अंतर्धान समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव सांगता सोहळ्याचे आयोजन आजपासून (दि. १८ मे २०२२) करण्यात आले आहे. यानिमित्ताने संत आदिशक्ती मुक्ताबाई समाधी स्थळ गुप्तस्थळ (अंतर्धान स्थळ) श्री क्षेत्र महतनगर-मुक्ताईनगर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या वर्षी सोहळ्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात विविध फड, संप्रदाय, संस्थानिक यांनी अखंड हरिनाम सप्ताह आणि नामसंकीर्तन सप्ताह सेवा अर्पण केली आहे. दरम्यान, २५ मे रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी श्री पांडुरंगराय पादुका पालखी सोहळ्याचे २३ मे रोजी श्री क्षेत्र मुक्ताईनगरकडे प्रस्थान होणार आहे. तर, पंढरपूर येथून संत श्री नामदेव महाराज, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून संत श्री निवृत्तीनाथ महाराज पादुका पालखी सोहळा, सासवड येथून संत सोपानकाका पादुका सोहळा, कौंडण्यपूर येथून माता रुक्मिणी पादुका सोहळा, संत ज्ञानेश्वर संस्थान आळंदी, संत तुकाराम महाराज देहू प्रतिनिधी आणि संत महंतांच्या उपस्थितीत हा अंतर्धान महोत्सव साजरा होत आहे.

या निमित्ताने वै. पंढरीनाथ महाराज मानकर यांच्या प्रेरणेने वै. प्रल्हाद महाराज सुळेकर यांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यात १८ ते २४ मे या काळात दररोज प्रवचन, कीर्तन अन्नदान कार्यक्रम होत आहेत. तर २४ मे रोजी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पादुका दिंडीचे आगमन होईल. २५ मे रोजी संत मुक्ताई महापूजा, समाधीवर पुष्पवृष्टी आणि संत नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज ह. भ. प. केशवदास नामदास महाराज पंढरपूर यांची गुलालाची कीर्तनसेवा होणार आहे. यानंतर अंतर्धान समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्याची सांगता होणार आहे.
२६ मे रोजी मुक्ताई मूळ मंदिर ते नवीन मंदिर पांडुरंग पालखी सोहळा मिरवणूक होईल. यात शेकडो दिंड्यांचा सहभाग असेल. तर सकाळी ह. भ. प. सारंगधर महाराज गोळेगावकर, सायंकाळी ह. भ. प. गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे कीर्तन होईल. तर, २७ मे रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत ह. भ. प. केशवदास नामदास महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. मुक्ताई मंदिर संस्थानाचे अध्यक्ष रवींद्र पाटील, ह. भ. प. रवींद्र महाराज हरणे, ह. भ. प. उद्धव महाराज जाणारे यांनी ही माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *