संत तुकाराम महाराज मंदिर
उभारणीची करणार पाहणी
पिंपरी : श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे संत तुकाराम महाराज यांच्या भव्य मंदिराच्या उभारणीचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १२५ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. या कामाची पाहणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार करणार आहेत.
देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी खासदार शरद पवारांची बारामती येथे जाऊन भेट घेतली. यावेळी मंदिर उभारणीच्या कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार असल्याचे पवार यांनी देवस्थानच्या विश्वस्तांना सांगितले. त्यानंतर पुढील मदतीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. माजी आमदार विलास लांडे यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
यावेळी बाळासाहेब काशिद यांनी संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरील पुस्तके, श्री ज्ञानेश्वरी, पुष्पगुच्छ देऊन खासदार शरद पवार यांचा सन्मान केला. ह. भ. प. पंकज महाराज गावडे यावेळी उपस्थित होते. श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सव्वाशे कोटींच्या मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. या मंदिराच्या कामाची पार्श्वभूमी माजी आमदार विलास लांडे यांनी खासदार पवार यांना सांगितली.
देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद पाटील यांनी मंदिराचे स्वरूप आणि सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. मंदिर उभारणीला येणारा एकूण खर्च, मंदिराचे बांधकाम, बांधकाम शैली, त्याबाबत होत असलेले प्रयत्न याबाबत पवार यांना सविस्तर माहिती देण्यात आली. ह. भ. प. पंकज महाराज गावडे यांनी मंदिर उभारण्यामागील आध्यात्मिक आणि सामाजिक उद्देश पवार यांना कथन केले.
खासदार शरद पवार यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिराच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच लवकरच कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांना मंदिराच्या कामाची माहिती देण्यात आली.
