बीजेसाठी पंढरपुरातून प्रस्थान
पंढरपूर : देहूतील संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी श्रीसद्गुरू वैराग्यसंपन्न गंगूकाका शिरवळकर फडाच्या दिंडीने आज फाल्गुन शुद्ध एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपुरातून प्रस्थान ठेवले. ही दिंडी अवघ्या पाच दिवसांमध्ये २६० मैलांचा पायी प्रवास करून फाल्गुन वद्य प्रतिपदेला देहूमध्ये पोहचेल.
श्री तुकोबारायांचा बीज उत्सव अर्थात तुकोबारायांच्या वैकुंठगमन सोहळ्यात सेवा देणाऱ्यांमध्ये शिरवळकर फड अग्रेसर आहे. शिरवळकर फडाचे संस्थापक श्रीगुरू गंगूकाका शिरवळकर यांनी ही परंपरा फडाला घालून दिली आहे. ही परंपरा आजतागायत सुरू आहे.
देहूमध्ये फाल्गुन कृष्ण द्वितीया हा बीजेचा मुख्य दिवस असला तरी दशमीपासूनच हा उत्सव सुरू होतो. बीजेच्या उत्सवामध्ये विठोबा रखुमाई मंदिरातील मुख्य मंडपात शिरवळकर फडाचे कार्यक्रम होतात.
फाल्गुन वद्य द्वितीयेला म्हणजे बीजेच्या दिवशी तुकोबारायांच्या निर्याणाच्या प्रकरणावर गुलालाचे भजन होते. फाल्गुन वद्य द्वितीया ते षष्ठी अशी दररोज संध्याकाळी ५ ते ७ या वेळी मंदिरामध्ये वीणा/पालखी कीर्तन सेवा होते. कीर्तनानंतर मंदिराभोवती दररोज दिंडी प्रदक्षणा होते. त्यानंतर देहूकरांच्या फड परंपरेतील कीर्तनाला प्रारंभ होतो.
फाल्गुन वद्य सप्तमीला काल्याचे कीर्तन सकाळी १० ते १२ या वेळेत वीणा/पालखी मंडपामध्ये होते. फाल्गुन वद्य अष्टमी रोजी लळित दिंडी सोहळा होतो. मंदिरातील शीळा मंदिरापुढे देहूकरांनंतर शिरवळकर फडाचा अभंग होतो. नंतर नारळ प्रसाद स्वीकारून सोहळ्याची सांगता होते.
फाल्गुन वद्य अष्टमीला रोजी लळितानंतर दिंडी आळंदीकडे प्रस्थान ठेवते. आळंदीमध्ये दशमी, एकादशी, द्वादशी वारीच्या सेवा करून फाल्गुन वद्य त्रयोदशी रोजी दिंडी पंढरीकडे प्रस्थान ठेवते आणि चैत्र शुद्ध अष्टमीला पंढरीत पोहोचते.