उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

चंद्रकांत पाटलांची घोषणा

औरंगाबाद : संतपीठाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेले २३ कोटी रुपये लवकरच देण्यात येतील. आळंदीसह राज्यातील विविध कार्यरत अध्यात्मिक संस्था संतपीठाला जोडण्यात येतील, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात दादा पाटील यांनी आज (दि. ९) येथे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित पैठण येथील संतपीठाचा पहिला प्रमाणपत्र वितरण सोहळा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ९) थाटात पार पडला. कुलगुुरु डॉ. प्रमोद येवले यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे रोहयो, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, संतपीठाचे समन्वयक डॉ. प्रवीण वक्ते आदींची मंचावर उपस्थिती होती.

प्रारंभी पाचही अभ्यासक्रमातील गुणानुक्रमे पहिल्या तीन अभ्यासकांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.यावेळी चंद्रकांत पाटील यांचे मुख्य भाषण झाले. ते म्हणाले, माणसाला भौतिक व तांत्रिक सोयी-सुविधा कितीही मिळाल्या तरी आत्मिक आनंदासाठी अध्यात्म, संत साहित्याचाच आधार लागत असतो. महाराष्ट्रात आळंदीसह देशात अनेक ठिकाणी संत साहित्य, अध्यात्म याविषयी शिक्षण, संशोधन करणाऱ्या संस्था आहेत. या सर्व संस्थांचा समन्वय घडवून आणण्याचे काम संतपीठाच्या माध्यमातून होईल.


‘डीपीडीसी’तून निधी देऊ : संदिपान भुमरे
संतपीठाची मुख्य इमारत अत्यंत सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त असून खूप वर्षांनंतर वापरात आली आहे. या भागातील विद्यार्थी, विद्यार्थिनी वसतिगृहाच्या दुरुस्ती, बांधकामासाठी जिल्हा नियोजन व विकास निधीतून रक्कम देण्यात येईल, असे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी घोषित केले. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी संतपीठाचे अभ्यासक्रम अत्यंत तातडीने सुरू करून मराठवाड्यातील जनतेची मागणी पूर्णत्वास नेली, असेही ते म्हणाले.

दोन विद्यापीठासोबत करार : कुलगुरु प्रमोद येवले

संतभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात संत एकनाथांच्या जन्मभूमीत संतपीठ सुरू झाल्याचा मनस्वी आनंद आहे. संतपीठासाठी २३ कोटींचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावासह संतपीठाला स्वायत्ता देण्याची गरज आहे, असेही कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले. नांदेड येथील गुरुद्वाराच्या सहकार्याने गुरुग्रंथ साहिब अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. रामटेक येथील कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ आणि गुजरात येथील तंत्रज्ञान विद्यापीठासोबत लवकरच करार होणार असल्याचेही कुलगुरु डॉ. प्रमादे येवले म्हणाले.

पहिल्या दोन्ही बॅचच्या पाचही अभ्यासक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता संत साहित्य पदविका आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस समन्वयक डॉ. प्रवीण वक्ते यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला. चक्रधर कोठी यांनी सूत्रसंचालन, तर रामकृष्ण आकेलकर यांनी आभार मानले.

संतपीठात सध्या ज्ञानेश्वरी परिचय प्रमाणपत्र (२२), तुकारात गाथा परिचय (३७), एकनाथाची भागवत परिचय (०३) आणि समग्र वारकरी संप्रदाय परिचय (१२), महानुभव संप्रदाय (१८) आदी अभ्यासक्रमास २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात १४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. संतपीठात सध्या पाच अभ्यासक्रमांना मिळून १७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *