गाभाऱ्यातील कामामुळे भाविकांना

मिळणार काही काळ फक्त मुखदर्शन

पंढरपूर : श्री विठ्ठल मूर्ती जतन, संवर्धनासाठी गाभाऱ्यात काम केले जाणार आहे. त्यासाठी विठुरायाचे पदस्पर्श दर्शन १५ मार्चपासून सुमारे दीड महिना बंद ठेवण्यात येणार आहे. त्याबाबत आज (दि. १२) झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मात्र पहाटे पाच ते सकाळी पावणे अकरा यादरम्यान भाविकांना मुखदर्शन खुले असेल. अर्थात या कालावधीत देवाच्या नित्योपचारांमध्ये कोणताही खंड पडणार नाही. तसेच गाभाऱ्यात काम सुरू असताना श्री विठ्ठल मूर्ती बुलेटप्रुफ काचेत बंदिस्त केली जाईल. ज्यामुळे काम करताना धुळीचे कण वगैरे मूर्तीवर पडणार नाहीत. या काळात पाद्य, तुळशी पूजा बंद राहणार आहे, तथापि मुखदर्शन मंदिराबाहेरच्या स्क्रीनवरही दाखविले जाईल, असे औसेकर महाराज यांनी सांगितले.

आज झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भक्त निवास येथे पार पडलेल्या या बैठकीला सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य, वारकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धनाचे काम सुरू झाले असून यासाठी राज्य सरकारने निधी दिला आहे. मंदिरात नव्याने केलेले बांधकाम, ग्रेनाईट फरशी, टाईल्स, लाईट फिटिंग, ऑईल पेंट आदी काढून मंदिराला मूळ, पुरातन स्वरूप प्राप्त करून देण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाने याबाबत सूचना केल्या होत्या. या कामाचे भूमिपूजन कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. मंदिर आवारातील महालक्ष्मी मंदिर आणि बाजीराव पडसाळी येथील कामही सुरू झाले आहे.

दर्शनाला येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये आणि आषाढी यात्रेपूर्वी कामे पूर्ण व्हावीत, याबाबत बैठकीत चर्चा झाली. पाच जूनपर्यंत सर्व कामे पूर्ण केली जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

दि १५ मार्च पासून देवाचे पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे. तर १७ मार्च पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. साधारपणे ४५ दिवसांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कालावधीत देवाचे मुखदर्शन रोज पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत घेता येणार आहे. तसेच मंदिराबाहेरील स्क्रीनवर देवाचे दर्शन घेता येईल. या कालावधीत चैत्री वारी आहे. दि. १५ एप्रिल ते २१ एप्रिल या वारी कालावधीत मुखदर्शन दिवसभर सुरू राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *