देहूच्या श्री तुकाराम महाराज
संस्थानची पोलिसांकडे मागणी
पुणे : ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणींत वाढ झाली आहे. केतकीने फेसबुकवर पोस्ट केलेल्या पवारांच्या विरोधातील कवितेत ‘तुका म्हणे’ हा शब्द वापरण्यात आला आहे. त्याला आता देहूच्या श्री संत तुकाराम महाराज संस्थानने विरोध दर्शविला आहे. तसेच केतकीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याबाबतचे पत्र संस्थानने देहूरोड पोलिसांना दिले आहे. संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाला पूजनीय आहेत. ‘तुका म्हणे’ ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगांची स्वाक्षरी आहे, असे पोलिसांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
संत तुकाराम महाराजच नव्हे, तर देशातील सर्व संतांच्या नावाचा उपयोग करून जर कुणी असे वादग्रस्त, विटंबनात्मक लिखाण करत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. नितीन महाराज मोरे यांनी केली आहे.
केतकीला अटक आणि पोलीस कोठडी
दरम्यान, शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला शनिवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. केतकीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. यानंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकीला रविवारी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. केतकीने कोणताही वकील न घेता न्यायालयात स्वत:च युक्तिवाद केला. समाज माध्यमांवर माझे स्वत:चे मत मांडायचा अधिकार नाही का, असा सवालही तिने विचारला. हे सर्व ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली. यानंतर केतकी चितळेचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या एका व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने आपल्या फेसबुकवर शेअर केली आहे. ती पोस्ट अशी –
तुका म्हणे पवारा। नको उडवू तोंडाचा फवारा।।
ऐंशी झाले आता उरक। वाट पहातो नरक।।
सगळे पडले उरले सुळे। सतरा वेळा लाळ गळे।।
समर्थांचे काढतो माप। ते तर तुझ्या बापाचेही बाप।।
ब्राह्मणांचा तुला मत्सर कोणरे तू? तू तर मच्छर।।
भरला तुझा पापघडा। गप! नाही तर होईल राडा।।
खाऊन फुकटचं घबाड। वाकडं झालं तुझं थोबाड।।
याला ओरबाड त्याला ओरबाड। तू तर लबाडांचा लबाड।।
या पोस्टवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्निल नेटके यांनी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे केतकीवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
केतकीवर ९ ठिकाणी गुन्हे
केतकीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रारी करण्याचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत एकूण नऊ ठिकाणी तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात आणि अमरावतीतल्या गाडगेबाबानगर पोलीस ठाण्यात आणि नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात केतकीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
केतकी नेहमीच वादात
केतकी चितळे हिने अनेकदा वादग्रस्त टिप्पण्या करून वाद ओढवून घेतले आहेत. नवबौद्धांसंदर्भातील टिप्पणीप्रकरणी तिच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल झाली होती. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हाही दाखल झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून तिने वाद ओढवून घेतला होता.