देश-विदेशात पारितोषिके
पटकावणारे फोटोग्राफर वारीत
पुणे : पंढरपूरला जाणारा पायी आषाढी वारीचा सोहळा म्हणजे महाराष्ट्राचा महाउत्सव. या सोहळ्यातील भक्ती, संस्कृतीचे रंग टिपण्यासाठी हौशी, तरुण फोटोग्राफर यात सहभागी झाले आहेत. शिवराज तलवार आणि आशुतोष कोळी हे त्यापैकीच दोघे.
दोघांनाही यापूर्वी फोटोग्राफीतले अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. शिवराज तलवार यांना २५ हून अधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आशुतोष कोळी यांना फेडरेशन ऑफ इंडियन फोटोग्राफीची नॅशनल डिग्री मिळाली आहे.
गुलालात न्हालेली जोतिबाची पालखी, मातीतली कुस्ती, बगाड यात्रा या शिवराज यांच्या फोटोंना नॅशनल एवॉर्ड मिळाले आहेत. तर, पालच्या खंडोबाच्या यात्रेत भंडाऱ्यात न्हालेले भाविक, वाखरीच्या रिंगणात दंग झालेले वारकरी,
पंढरपुरात पहाटे गोपालकृष्ण मंदिराला प्रदक्षिणा घालणारा वारकऱ्यांचा ओघ, माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यात रंगलेले वारकऱ्यांचे खेळ, भिगवणच्या जलाशयातील फ्लेमिंगो या आशुतोष कोळी यांच्या फोटोंना देश विदेशात पारितोषिके मिळाली आहेत.
सध्या हे फोटोग्राफर वारीच्या वाटेवर पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली फोटो जर्नलिझमचे धडे गिरवत आहेत.