नवी मुंबईत उभे राहणार
तिरुपती बालाजीचे मंदिर
मुंबई : नवी मुंबई विमानतळाजवळ अखेर तिरुपती बालाजी मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे मंदिर उभारण्यासाठी आवश्यक जमीन महाराष्ट्र सरकार नाममात्र भाडेतत्वावर उपलब्ध करून देणार आहे. याबाबतचे पत्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांच्याकडे तिरुपती येथे जाऊन सुपूर्द केले आहे.
ज्या भक्तांना आंध्र प्रदेश इथे जाऊन बालाजीचे दर्शन घेता येत नाही, त्यांच्यासाठी नवी मुंबईत भव्य दिव्य असे तिरुपती बालाजी मंदिर उभारण्यात येणार आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हाकेच्या आंतरावर उलवे इथे १० एकर जागेवर हे मंदिर साकारण्यात येणार आहे. मंदिर उभारण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी तिरुपती देवस्थानने महाराष्ट्र सरकारकडे केली होती. यावर सकारात्मक भूमिका घेत सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करून तो अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवा, असे निर्देश नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत तिरुमला तिरुपती देवस्थानला या मंदिरासाठी जमीन देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तिरुपती तिरुमला देवस्थानमचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांनी जमीन वाटपासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंदिरासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ योग्य जागा शोधण्याचे निर्देश सिडकोला दिले होते. जमिनीच्या वाटपाला तत्वतः मान्यता दिल्यानंतर सुब्बा रेड्डी यांच्यासह अतिरिक्त मुख्य अधिकारी धर्मा रेड्डी, विश्वस्त मिलिंद नार्वेकर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी जागेची पाहणी केली होती. ही जमीन सिडकोने मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कास्टिंग यार्डसाठी एमएमआरडीएला भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीचा भाग होती. मात्र, एमएमआरडीएने ही जमीन मार्च ते सप्टेंबर २०२३ पर्यंत टप्प्याटप्प्याने परत देण्याचे मान्य केले आहे.
यंदा तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराच्या विश्वस्तपदी महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव आणि विश्वासू नार्वेकरांना ही संधी मिळताच, त्यांनी आता महाराष्ट्रात तिरुमला तिरुपती मंदिर उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतल्यावरच तिरुपती बालाजीचे दर्शन पूर्ण होते, अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे कोल्हापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी नवी मुंबईतील बालाजी मंदिर वरदान ठरणार आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डातर्फे देशात हैद्राबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगलुरू, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र आणि हृषिकेश या ठिकाणी शहर पातळीवरील सुविधा म्हणून भगवान श्री व्यंकटेश्वराच्या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. आता असेच मंदिर नवी मुंबईतही उभे राहणार आहे.