आळंदी देवस्थानवर दुसऱ्यांदा
योगेश देसाई यांची निवड
आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या प्रमुख विश्वस्तपदी योगेश देसाई यांची पुढील एक वर्षासाठी फेरनिवड करण्यात आली आहे. आज (दि. ६ ऑगस्ट) झालेल्या विश्वस्त मंडळाच्या मासिक बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.
पुणे येथील संस्थानच्या कार्यालयात विश्वस्त मंडळाची बैठक झाली. यावेळी विश्वस्त डॉ. अभय टिळक, लक्ष्मीकांत देशमुख, ॲड. विकास ढगे पाटील, योगेश देसाई उपस्थित होते. एक विश्वस्त जागा रिक्त असून एक विश्वस्त डॉ. नरेंद्र वैद्य बैठकीस उपस्थित नव्हते.
श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे प्रमुख आणि प्रमुख विश्वस्त म्हणून देसाई यांनी यापूर्वी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. योगेश देसाई हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक असून देसाई आंबेवाले या पेढीचे मालक आहेत. देसाई यांनी यापूर्वी दोन वेळा पालखी सोहळा प्रमुख आणि एक वर्ष प्रमुख विश्वस्त म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. आता त्यांची प्रमुख विश्वस्त म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे. प्रमुख विश्वस्त म्हणून झालेल्या फेरनिवडीने त्यांच्या कार्याचा गौरव झाल्याची भावना वारकरी संप्रदाय तसेच भाविकांतून व्यक्त होत आहे.