श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपुराकडे निघाल्या आहेत. हे पालखी सोहळे म्हणजे महाराष्ट्राची थोर सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा. नव्हे महाराष्ट्राची ओळखच. या पालखी सोहळ्यांचा काय इतिहास आहे, याबाबत लिहून ठेवले आहे, थोर तुकारामभक्त, अभ्यासक श्रीधरबुवा देहूकर आणि त्यांचे चिरंजीव डॉ. सदानंद मोरे यांनी.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपुराकडे निघाल्या आहेत. हे पालखी सोहळे म्हणजे महाराष्ट्राची थोर सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा. नव्हे महाराष्ट्राची ओळखच. या पालखी सोहळ्यांचा काय इतिहास आहे, याबाबत लिहून ठेवले आहे, थोर तुकारामभक्त, अभ्यासक श्रीधरबुवा देहूकर आणि त्यांचे चिरंजीव डॉ. सदानंद मोरे यांनी. त्यांनी लिहिलेला इतिहास संपादित स्वरुपात देत आहोत…

संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा॥
जावे पंढरीशी आवडी मनाशी। कै एकादशी आषाढी ये॥
– श्री तुकाराम महाराज

माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी॥
पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुणी वेधीले॥
– श्री ज्ञानेश्वर महाराज

श्री तुकाराम महाराजांची पालखी आषाढी वारीला श्री क्षेत्र देहू गावाहून निघून पंढरपूरला प्रतिवर्षी जात असते. हा पालखी सोहळा महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी सुरू केला. श्री नारायण महाराज हे श्री तुकाराम महाराज आणि श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून ती पालखी समारंभपूर्वक मोठ्या सोहळ्याने दिंड्या, पताका, गरुडटक्के, टाळमृदंगांच्या घोषात वैष्णव मंडळींसह ज्ञानोबा-तुकाराम भजन करीत आषाढी वारीला देहूहून पंढरपूरला नेत असत. हा पालखी सोहळा सुमारे ३०० वर्षांपूर्वी सुरू झाला, तो आजतागायत अखंड चालू आहे.

विश्वंभरबाबांना आईची आज्ञा
त्यापूर्वी कोणाही संताची पालखी त्याचे जन्मगावाहून आषाढी वारीला पंढरीला नेली जात नव्हती. श्री नारायण महाराजांनी पालखीच्या सोहळ्याची आणि ज्ञानोबा-तुकाराम भजनाची प्रथा सुरू केली.
तशी पंढरीची वारी ही श्री तुकाराम महाराजांच्या घराण्यात पिढ्यान् पिढ्या चालू होती. तुकाराम महाराज सांगतात की,
पंढरीची वारी आहे माझे घरी।
आणिक न करी तीर्थव्रत॥
या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंभरबाबा (तुकाराममहाराज त्यांच्यापासून आठव्या पिढीचे वंशज), यांना त्यांची आई ‘तुझ्या वाडवडिलांनी पंढरीची वारी निर्धाराने चालविली, आता तू चालीव’, असे सांगते. मातेची आज्ञा शिरसावंद्य मानून विश्वंभरबाबा दर पंधरा दिवसांच्या एकादशीला पंढरपूरला जाऊ लागले.
विश्वंभरबाबांच्या भक्तीमुळे श्रीविठ्ठल रखुमाई देहूला आले.

तुकाराम महाराजांचे १४०० टाळकरी
त्यानंतर आठव्या पिढीतील श्री तुकाराम महाराज पंढरीची वारी करू लागले. त्यांची दिंडी मोठी होती. दिंडीत १४०० टाळकरी होते. ही सर्व टाळकरी मंडळी वारीच्या वेळी देहूला जमत असत. तुकाराम महाराज दर वद्य एकादशीला दिंडीसह आळंदीसही जात आणि कीर्तन करीत. ती परंपरा अजूनही सुरू आहे. इतकेच नव्हे, तर त्यांनी आळंदीला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर बांधले.

तुकोबांच्या वारीचा नेम कधी टळला नाही. पण एकदा ते वारीच्या वेळेला आजारी पडले. तशाही स्थितीत ते वारीला निघाले, पण पाऊल उचलेना. वारीत अंतर पडल्याचे दुःख श्री तुकोबांना अनिवार झाले. ते शोक करू लागले. वारीला जाण्याकरिता आलेल्या वारकऱ्यांबरोबर त्यांनी एक २४ अभंगांचे पत्र देवाला दिले. त्यात तुकोबांनी व्यक्त केलेली हतबलता आणि व्याकुळता फारच हृदयद्रावक, अंतःकरणाला पीळ पाडणारी आहे.

श्री तुकोबा वैकुंठाला जाईपर्यंत हा वारीचा सोहळा प्रतिवर्षी पार पाडीत असत. ते वैकुंठाला गेले त्यावेळी त्यांची मुले लहान होती. तेव्हा पंढरीच्या वारीची परंपरा तुकोबांचे धाकटे बंधू कान्होबा यांनी चालू ठेवली. कान्होबा तुकोबांचे बंधू तर होतेच, पण याहूनही निष्ठावंत वारकरी आणि प्रगल्भ कवीही होते.

कान्होबा तुकोबांचे अनुग्रहित होते. तुकोबांबरोबर असणाऱ्या वैष्णवजनांत ते श्रेष्ठ आणि प्रिय होते.

 

 

आषाढी वारीचा उगम आणि विकास
आषाढी-कार्तिकी वारीचा उगम, श्री विठ्ठल अवताराच्या उगमाबरोबर आहे. जशी भगीरथ राजाने महत् प्रयासाने स्वर्गातून गंगा पृथ्वीतलावर पूर्वजांच्या उद्धाराकरिता आणली, तसे भक्त पुंडलीकाने महत् प्रयासाने परम सत्तेला जगाच्या उद्धाराकरिता निराकारातून, निर्गुणातून, सगुण साकारतेला आणले. पुंडलिक करत असलेली आईवडिलांची सेवा पाहून देव त्याच्यासाठी तिथेच विटेवर तिष्ठत उभा राहिला अशी एक-कथा आहे. तर, दुसऱ्या कथेत गोकुळाचा श्रीकृष्ण गोपाळ, गाईगुरांसह पंढरीला आला आणि विठोबा म्हणून विटेवर उभा राहिला. कुठल्याही प्रकारचा भेद न करता सर्व भक्तांवर सारखेच प्रेम करणाऱ्या या सावळ्या विठुरायाला भेटायला संत आपल्या सहवारकऱ्यांसोबत गात, नाचत पंढरीला जाऊ लागले. त्या आनंदसोहळ्याचे सुंदर वर्णन संतांनी आपल्या अभंगांतून करून ठेवले आहे.

संशोधकांना सापडलेला विठ्ठल
पंढरपुरात आतापर्यंत जे शिलालेख उपलब्ध झालेले आहेत, त्यामध्ये शके ११५९ (इसवीसन १२३७) होयसाळ राजाच्या कारकिर्दीतील शिलालेख आहे. तो विठ्ठल मंदिरातील सोळा खांबी मंडपाच्या तुळईवर तिन्ही बाजूने लिहिलेला आहे. तो संस्कृत आणि कानडी अशा संमिश्र भाषेत, देवनागरी लिपीत आहे. त्याच्यात पुंडलीक मुनींचा आणि विठ्ठल देवाचा उल्लेख आहे. तसेच तुळईच्या पूर्वभागातील ७१ व्या ओळीत वारीचा उल्लेख आहे. पंढरीच्या वारीचा हा सर्वात प्राचीन उल्लेख होय.
तसाच दुसरा महत्त्वाचा शिलालेख शके १९९५ (इसवीसन १२७३) मधील. याला चौऱ्यांशीचा शिलालेख म्हणतात. या शिलालेखात पंढरपुरास फागनीपूर आणि विठोबास विठ्ठल असे म्हटले आहे. याच्यात रामचंद्रदेव यादवाचा उल्लेख आहे. त्यात त्यांना पांढरीफडमुख्य म्हणून संबोधले आहे.

तिसरा प्राचीन संदर्भ म्हणजे, शालिवाहन शके १११० मधील शिलालेख. त्यात विठ्ठल देवाचा उल्लेख आलेला आहे. त्यात देवालय बांधणारांची नावे आलेली आहेत. पंढरपूर येथे सापडलेल्या शिलालेखातून विठ्ठलाचे उल्लेख आले आहेत. पण ताम्रपटात पंढरपूरचे पांडुरंगपल्ली असे नाव आहे हे त्याचे वैशिष्ट्य आहे. हा ताम्रपट शके ४३८ म्हणजे इसवीसन ५१६ चा आहे.

पंढरी हा गाव शालीवाहन शकाच्या प्रारंभापासून वसलेला आहे. विठ्ठल मंदिरही त्यावेळेपासून आहे असे मालू सोनाराने ‘मालूतारण’ ग्रंथात म्हटले आहे. पण ग्रंथ अलीकडील असून ऐतिहासिक कसोटीला उतरलेला नाही. वरील सर्व गोष्टी लक्षात घेता श्री पुंडलीक महामुनींच्या कालासंबंधी आणि श्री विठ्ठल देवाच्या कालासंबंधी निश्चित ऐतिहासिक पुरावा हाती आला नाही. डॉ. भांडारकर, डॉ. डेली, डॉ. शोभना गोखले, डॉ. वा. ल. मंजूळ वगैरे इतिहाससंशोधकांनी श्रीविठ्ठल देवाचा, पंढरी क्षेत्राचा, पुंडलीक मुनीराजाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मान्यवर इतिहास संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी आद्य विठ्ठलमूर्तीचा शोध हा लेख लिहिला. त्यांच्या संशोधनानुसार त्यांनी हल्लीची मूर्ती ही आद्य नसून माढ्याची विठ्ठलमूर्ती आद्य आहे असे ठरविले. तथाकथित आद्य माढ्याच्या मूर्तीच्या दर्शनाला यात्रा सुरू झाली. माळ्याची विठ्ठलमूर्ती आद्य नाही आणि हल्ली विटेवर असलेली श्रीविठ्ठलमूर्तीच आद्य आहे, असे डॉ. सदानंद देहूकर यांनी सप्रमाण सिद्ध केल्यावर आणि देहूकर यांच्या मताचे डॉ. ढेरे यांना खंडण न करता आल्यामुळे त्यांनी पवित्रा बदलून कोण्या एका संन्याशाने आद्य विठ्ठलमूर्तीला इजा केल्यामुळे बडव्यांनी मूर्ती बदलली आणि तिच्या जागी सांप्रतच्या नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली अशी भूमिका घेतली. त्यावर भारत इतिहास संशोधक मंडळात चर्चासत्र होऊन त्यात, डॉ. देहूकर यांनी सप्रमाण सिद्ध केलेली, सांप्रत विटेवर असलेली मूर्ती हीच आद्य मूर्ती आहे, इजा झालेल्या भागाला टेकू देऊन तीच पुन्हा प्रस्थापित केली, असे मान्य झाले.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र या प्रांतात यादवकालापासून जे संप्रदाय उपासना मार्ग चालू आहेत, त्यांमधील वारकरी संप्रदाय हा सर्वात प्राचीन असा आहे. त्याला आदि संप्रदाय म्हटले असता वावगे होणार नाही. रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, मध्वाचार्य, निंबार्क यांचे वैष्णव संप्रदाय आहेत, ते सत्तेची जी चार अंगे चैतन्य, आनंद, स्वरूप, प्रकाश यांवर प्रतिष्ठित झालेले आहेत आणि ते त्या त्या नावाने ते संबोधिले जातात. तेथे सत्तेच्या एका एका विशिष्ट अंगावर जोर आहे म्हणून ते एकांगी आहेत. वारकरी संप्रदाय सर्वांगीण – संपूर्ण आहे. ‘वारी’ हा या संप्रदायाचा प्राण आहे. त्याचा तो पारिभाषिक शब्द आहे. विठ्ठलाची वारी करणारा तो वारीकर – वारकरी.

तपोनिधी नारायण महाराज
तुकयाबंधू कान्होबांनी आपल्या हयातीतच वारीची, परंपरेची, संप्रदायाची धुरा तुकोबांचे धाकटे सुपुत्र नारायणबाबा यांच्या खांद्यावर दिली. नारायणबाबांनी तुकोबांच्या शेकडो अभंगांचे पाठांतर केले. कान्होबा प्रसंगविशेषी त्यांना कीर्तनासही उभे करीत. तुकोबांचे टाळकरी गवारशेट वाणी यांनी अंत्यसमयी कान्होबा आणि नारायणबाबा यांना निरोप पाठवून आपल्या गावी सुदुंबऱ्यास बोलावून घेतले. त्या समयी नारायणबाबांनी कीर्तन केल्याचा उल्लेख आहे. तुकोबांनी गवारशेट वाण्याला तुझ्या अंत काळी तुला भेटेन म्हणून वचन दिले होते. दिलेल्या वचनाप्रमाणे तुकोबा भेटीला आले. गवारशेटने तुकोबांना हार घातला, पायावर मस्तक ठेवले आणि प्राण सोडला. हार अधांतरी लटकत असलेला कीर्तनास बसलेल्या सर्व लोकांनी पाहिला. नंतर नारायणबुवा कीर्तन आटोपून कान्होबासह देहूगावी परतले.

नारायण महाराजांचे कार्य
नाराणबुवांनी जसे पारमार्थिक, धार्मिक कामात लक्ष घातले तसे सामाजिक कार्यातही घातले. त्यांनी ढोंगी मंबाजीला देहूगावाबाहेर हाकलून दिले. तसेच सेनापती दाभाडे यांचा सरदार लोदीखान पठाण देहूजवळील सांगुर्डी गावी राहत होता. तो थोडे सैनिक बाळगून होता. सभोवतालच्या गावी लुटालूट करीत असे. तो फारच प्रबळ झाला होता. नारायण महाराजांनी सभोवतालच्या लोकांना जमा करून त्याच्यावर हल्ला चढवला. धुमश्चक्री झाली. नारायणबाबांनी त्याचा पराभव करून त्याला सांगुर्डीतून हाकलून लावले. तुकाराम महाराजांनी दुष्काळ पडला तेव्हा दुष्काळपीडित लोकांना जवळचे द्रव्य वाटून टाकले. दुष्काळ संपल्यानंतर सर्वप्रथम कोणते काम केले असेल तर देवाचे देऊळ बांधले.

नारायण महाराजांच्या वेळीही दुष्काळ पडला. तुकाराम महाराजांनी बांधलेले देऊळ वाढत्या यात्रेला अपुरे पडू लागले म्हणून नारायण महाराजांनी नवे देऊळ बांधण्याचे काम सुरू केले. दुष्काळग्रस्त लोक कामावर लावले. त्यांना आपल्याकडील धान्य दिले. पुढे छत्रपती शाहूमहाराज यांनी ५००० रुपये देवळाच्या कामाकरिता पाठविले. तसेच फलटणचे राजे रंभाजी बाजी निंबाळकर आणि तळेगावचे सेनापती खंडेराव दाभाडे यांनीही देवळाच्या कामाला मदत केली. नारायण महाराजांनी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले. वाडा लुटविला, तरी यात्रामहोत्सव, सदावर्त, अन्नछत्र, अतिथी अभ्यगतांचा परामर्ष, देवाची पूजाअर्चा, दाने यथासांग, चालावीत म्हणून मराठा साम्राज्याकडून गावे इनाम मिळविली. मिळालेली स्वीकारली.

नारायण महाराजांच्या कसोटीची वेळ
औरंगजेब बादशहा प्रचंड सैन्य आणि विपुल युद्धसामुग्रीसह शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य नष्ट करण्याकरिता महाराष्ट्रात उतरलेला होता. सैन्याच्या हालचाली दोन्ही बाजूंनी जोरात चालू होत्या. चकमकी झडत होत्या. स्वराज्य धोक्यात होते. छत्रपती राजाराममहाराज, बालराजे शिवाजी (दुसरे), महाराणी ताराबाई संकटात होत्या. संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केली होती. प्रसंग गंभीर होता. अशा समयी, संत-महंतांच्या दर्शनाची, अभिष्टचिंतनाची जरुरी होती. छत्रपती राजाराम महाराजांनी इसवीसन १६९४ मध्ये दिलेल्या येलवंडी गावच्या इनामाच्या सनदेत तसा उल्लेख आढळतो.

सैन्याच्या हालचाली चालू असल्यामुळे श्री पंढरपूर आणि श्री महादेव स्थानेश्वर तसेच देहू येथल्या यात्रेस जाणाऱ्या यात्रेकरूंना सेनेचा उपद्रव होत होता. तो उपद्रव दूर करावा म्हणून छत्रपती राजाराम महाराजांना, श्री नारायण महाराजांनी पत्राने कळविले होते. त्याचे राजाराम महाराजांनी उत्तर दिले. त्यात राजाराम महाराजांनी ‘आम्हांस निरंतर आशीर्वाद चिंतीत जावा’ म्हणून विनंती केली. यात्रेकरूंना उपद्रव देऊ नये आणि सुप्रवृत्तीने येऊ-जाऊ द्यावे म्हणून सैन्यास पत्र दिल्याचे लिहिले आहे.
नारायण महाराजांचा राजघराण्यासोबत नित्य संपर्क होता. तसेच वारकरी, भाविकांमध्येही ते अत्यंत प्रिय होते.

 

पालखी सोहळा, मठ, पट, संस्थान
श्री तुकाराम महाराज १४०० टाळकऱ्यांसह आषाढी वारीला श्रीक्षेत्र देहू गावाहून श्रीक्षेत्र पंढरपूरला प्रतिवर्षी जात असल्याचे आपण वर पाहिले आहे. महाराजांच्या प्रयाणानंतर हा दिंडीसोहळा तुकयाबंधू कान्होबा यांनी चालविला, पण तुकोबा बरोबर नसल्यामुळे त्यांचा वियोग त्यांचे निकटवासातले १४ टाळकरी आणि दिंडीतील टाळकरी यांना जाणवत होता.

तुकोबांचा आठव होतच होता. पण निदान कान्होबांकडे पाहून दुःखाची तीव्रता कमी होत होती. कान्होबांनी आपल्या हयातीतच दिंडीची देवस्थानाची व्यवस्था नारायणबाबांवर सोपविली होती. कान्होबा आणि नारायणबाबा दोघेही जातीने दिंडीबरोबर असत. कान्होबांच्या निधनानंतर सर्व भार नारायणबाबांवर येऊन पडला. सर्वांनाच चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागले. यातून काही तरी समाधानाचा, दु:खाची तीव्रता कमी करण्याचा मार्ग काढणे भाग होते आणि नारायणबाबांनी तो काढला. श्री तुकोबांच्या आणि श्री ज्ञानेश्वर
पमहाराजांच्या पादुका पालखीत ठेवून पादुकांसह म्हणजे ज्ञानोबा-तुकोबांसह, ज्ञानोबा-तुकाराम भजन करीत ते पालखी पंढरपूरची वाट चालू लागले. अशा प्रकारे पालखी सोहळा सुरू झाला. ‘ज्ञानोबा-तुकोबा पालखीत आपल्याबरोबर आहेत, त्यांच्या समागमे आपण पंढरपूरला चाललो आहोत, अशी वारकऱ्यांची धारणा असते. या सोहळ्याच्या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये नोंदी आहेत.

एकोणिसाव्या शतकातील पालखी सोहळा
ज्येष्ठ वद्य नवमीला पालखी देहूहून निघून आळंदीस जाई आणि आळंदीहून दशमीला पुण्याकडे रवाना होई. हा उपक्रम साधारणपणे इसवीसन १६८० पासून १८३५ पर्यंत अव्याहत चालू राहिला. १८३५ च्या दरम्यान देहू संस्थानामध्ये तुकोबांच्या वंशजांमध्ये मालकी हक्कावरून आणि सेवेच्या प्रश्नावरून तंटा सुरू झाला. त्याचा उपसर्ग पालखी सोहळ्याला होतो की काय या शंकेने शिंद्यांचे सरदार हैबतराव आरफळकर यांनी ज्ञानदेवांची पालखी आळंदीहून स्वतंत्रपणे नेण्यास सुरुवात केली. तत्पूर्वी हैबतबाबा देहूकरांच्या दिंडी सोहळ्याबरोबर पंढरीस जात असत. देहूच्या उत्सव महोत्सवात भाग घेत असत. या कामात हैबतरावबाबांना सरदार शितोळे त्याचप्रमाणे बाबासाहेब आजरेकर यांची भरीव मदत झाली. परिणामतः आजही ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यात शितोळे आणि आजरेकर यांना अनेक अग्रमान आहेत असे दिसून येते.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर महाराष्ट्रातील कर्त्या पुरुषांनी वारकरी संप्रदायाच्या वाढत्या प्रभावाची नोंद आणि दखल घेतली होती असे म्हणता येते. लोकहितवादींचे वारकऱ्यांविषयीचे मूल्यमापन फारच महत्त्वाचे आहे. हा संप्रदाय त्याला योग्य नेतृत्व मिळाले तर सामाजिक परिवर्तनाची प्रभावी शक्ती बनू शकेल, असे त्यांना वाटत होते. याउलट भोळे वारकरी ब्राह्मणांच्या काव्याला बळी पडत आहेत, असे महात्मा फुल्यांना वाटायचे. ब्राह्मण संतांविषयी फुल्यांना शंका होती परंतु तुकोबांना मात्र ते मानीत असत. इतकेच नव्हे तर त्यांच्या विचारांवर आणि शैलीवर तुकोबांचा विलक्षण प्रभाव होता. सत्यशोधक समाजाला सुरुवातीच्या काळात जे अनुयायी मिळाले ते वारकऱ्यांच्या प्रभावक्षेत्रातले आणि पुष्कळदा पारंपरिक वारकरी कुटुंबांमधून आलेले होते हे विसरता कामा नये. सत्यशोधकांनी अभंग, दिंड्या आणि कीर्तन यांचा उपयोग केला हेही लक्षात घेतले पाहिजे.

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी महाराष्ट्रात आधी सामाजिक की आधी राजकीय अशी चर्चा झाल्याचा आणि आगरकर व टिळक हे अनुक्रमे सामाजिक व राजकीय पक्षांचे पुरस्कर्ते असल्याचा साधारण समज आहे. परंतु एका जटिल वास्तवाचे हे स्थूल चित्र आहे. धार्मिक सुधारणा या सामाजिक व राजकीय सुधारणांना पायाभूत असल्या पाहिजेत, असा तिसराही एक पक्ष होता. तथापि सामाजिक राजकीय या वादात हा पक्ष सामाजिक पक्षाची बाजू घेई म्हणून त्याचा स्वतंत्रपणे विचार केला जात नसावा.

प्रार्थना समाजिस्टांवर प्रभाव

तथापि सामाजिक राजकीय या वादात हा पक्ष सामाजिक पक्षाची बाजू घेई म्हणून त्याचा स्वतंत्रपणे विचार केला जात नसावा. प्रार्थना समाजाचे अनुयायी हे धार्मिक पक्षाचे होते. दादोबा पांडुरंग यांच्या पुढाकाराने स्थापन झालेली परमहंस सभा अस्ताला गेल्यानंतर तिच्या अवशेषांवर १८६७ मध्ये प्रार्थना समाज उभा राहिला. दादोबांसारख्या परमहंसावर वारकरी विचारांचा प्रभाव होता. परंतु प्रार्थना समाजिस्टांवर हा प्रभाव लक्षणीय होता. विशेषत: तुकोबा हा तर प्रार्थना समाजाचा प्राण होता असे म्हटले तरी चालेल. भांडारकर, रानडे, चंदावरकर, शिंदे इत्यादी महत्त्वाचे समाजिस्ट ठायी ठायी तुकोबांच्या हाताला धरून चाललेले आहेत असे दिसते. विशेषतः रानड्यांचे लेखन पालखीसोहळ्याच्या विवेचनासाठी फारच महत्वाचे आहे.

न्यायमूर्ती रानडे यांनी पुणे नगर वाचन मंदिराजवळून पालखी जाताना पाहिली. वारकऱ्यांना देहभान विसरून नाचताना पाहिले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांनी पालख्यांसंबंधी आणखी माहिती मिळविली. १८८२ मध्ये त्यांनी या विषयावर प्रार्थना समाजात एक व्याख्यान दिले.

प्रार्थना समाजातील लोकांना रानड्यांनी असे सांगितले की, प्रार्थना समाजिस्ट हे वारकरी पंथाचे अनुयायी नसले तरी इतके लाखो लोक दरवर्षी हा उत्सव नेमाने करतात; त्याबद्दल सविस्तर अशी माहिती करून घेऊन, त्याच्या वर्तमानापासून काही बोध होण्यासारखा आहे किंवा नाही या दोन गोष्टींचा विचार अवश्य केला पाहिजे. स्वतः रानड्यांनी अशी माहिती गोळा केली व त्यापासून काय बोध घेता येतो हे सांगण्याचा प्रयत्न केला.

रानडे यांनी दिलेल्या माहितीवरून शंभर वर्षांपूर्वी पालखी सोहळ्याचे स्वरूप कसे होते हे तर समजतेच, परंतु गेल्या शंभर वर्षांत त्याच्यात कोणते बदल झालेले आहेत याचीही कल्पना करता येते.
रानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून ज्ञानदेव आणि तुकोबा या दोन संतांच्या पालख्या पंढरीस रवाना होत. त्यांना वाटेत पैठणहून एकनाथांची पालखी मिळे. याचा अर्थ असा होतो की, मधल्या काळात एकनाथांच्या पालखीने मार्ग बदलला.

या तीन पालख्यांशिवाय अमळनेर येथील गोविंदबाबा, चोपडे येथील सखारामबाबा, अरणभोंडी येथील सावता माळी, काशी येथील कबीर, धामणगावाचे बोधलेबाबा, विठ्ठल पुरंदर, कर्नाटकाचे बोरवणकरबाबा अशा आठ पालख्यांची नावे रानडे देतात. म्हणजे अकरा पालख्या झाल्या. परंतु रानडे म्हणतात की, पंधरा पालख्या परस्पर पंढरपुरास जातात म्हणजे आणखी सात पालख्यांची नावे ते देत नाहीत. थोडक्यात तेव्हा अठरा पालख्या होत्या असे म्हणता येते.

वारीत सामील होणाऱ्या दिंड्या
या निरनिराळ्या पालख्यांमध्ये सामील होणाऱ्या दिंड्यांची संख्या न्यायमूर्ती सुमारे शंभरावर असल्याचे सांगतात. त्यांतील मुख्य दिंडीवाले लोकांची नावे, कुल व जात यांची माहिती करून घेणे अवश्य असल्याचेही ते म्हणतात. कारण त्याशिवाय या यात्रेचे खरे स्वरूप ध्यानात येणार नाही. ज्ञानदेवांच्या पालखीपुढे मुख्य दिंड्या तीन व तुकोबांच्या पालखीपुढे मुख्य दिंड्या दोन. त्यांतील एक एकनाथांच्या वंशजांची आणि दुसरी अमृतराय कवी यांच्या वंशजांची. (यांतील एकही दिंडी आज तुकोबांच्या पालखीबरोबर नसते हा बदल ध्यानात घ्यावा.)

पुणे शहरातून पालख्यांबरोबर जाणाऱ्या दिंड्यांची यादी न्यायमूर्तींनी दिलेली आहे. त्यात सिद्धेश्वप्रमुख राम मंडळी, पुंडलिक व सुऱ्या महार, भवानी पेठेतील
खडकतकर व रामा निकम, रामा बुरुड, रामा भोपळे माळी, तुकाराम न्हावी, खंडुजीबाबा वाडीकर, लखोबा सोनार, बापू तांबट, श्रीपतीबोवा भिंगारकर, पांडोबा भडभडे, डांगे इत्यादी सुमारे वीस दिंडीवाल्यांच्या दिंड्यांचा समावेश आहे. याशिवाय खानदेशातील मालेगाव, चोपडे, अमळनेर; सातारा प्रांतातील कोरेगाव, कऱ्हाड, तासगाव, वाई, कोल्हापूर, मिरज, आजरे येथील गोविंदबाबा शेणवई; बेळगावचे शहापूरकर महादजी पाटील, शिंदे व शितोळेकर, लष्करवाले, नागपूरकर, बेलापूरकर, शिरोळेकर (शिरोळकर म्हणजे शिरवळकर याची मात्र नोंद घ्यायला हवी).

हैदराबादकर नारायणबाबा, सावता माळी, गोरा कुंभार, चोखा महार, कर्नाटकातील विठ्ठल पुरंदर, काशीतील कबीर, सोलापूर येथील वारकऱ्यांच्या फडातील चार दिंड्या, पुण्याजवळील पाबळ, वाल्हे, तळेगाव, सुपे, केंदूर, नारायणगाव, लोहगाव, चोली, आळेबेल्हे, नासिककर, नगरकर वगैरेंचा निर्देश केलेला आहे. त्यांतील श्रीपतबुवा भिंगारकर हे स्वतः रानड्यांच्या घरी उपाध्याय म्हणून येत व ते लोकमान्य टिळकांचेही मित्र होते हे सर्वज्ञात आहे. शितोळेकर म्हणजे अंकलीचे सरदार शितोळे, गोविंदबाबा शेणवई हे आजरेकर फडाचे त्यावेळचे प्रमुख होते. त्यांचा उल्लेख लोकहितवादींनीही केलेला आहे. ते सारस्वत होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

काशीतील कबीरांची दिंडी
रानड्यांनी दिलेल्या यादीमधील काशीतील कबीर हा उल्लेख फार महत्त्वाचा आहे. पुढे एकोणीसशे वीसमध्ये लिहिल्या गेलेल्या एका पंढरीवर्णनात उत्तर हिंदुस्थानातून कबीराची पालखी पंढरपूरला येत असे. असे म्हटले आहे. हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. उत्तर हिंदुस्थानातील संतांपैकी फक्त कबीरालाच एकनाथ-तुकारामांनी स्वीकारले हे तर खरे आहेच; परंतु वारकरी पंथ व कबीर पंथ यांनाही पंढरीच्या विठोबाचे आकर्षण वाटत होते. स्वतः कबीराच्या काव्यातून विठ्ठलाचे निर्देश आढळतात. यामागची वस्तुस्थिती अशी दिसते की, मुळात कबीरानेच वारकरी संप्रदायापासून प्रेरणा घेतलेली होती आणि दोघांची सामाजिक दृष्ट्या पुरोगामी भूमिका हेच या मागचे कारण आहे.

उपरोक्त तपशील देऊन न्यायमूर्ती असे म्हणतात की, महाराष्ट्र देशातील, सर्व ठिकाणचे सर्व जातींचे सर्व धंद्यांतील व स्थितींतील लोक आपला व्यवसाय सोडून व भिन्नपणा विसरून केवळ भक्तिभावाने या कामास प्रवृत्त होतात, असे दिसून येते. न्यायमूर्तींनी असेही म्हटले आहे की, दिंड्यांमध्ये “जाती, विद्या,
अधिकारपदाचे भेद यात्रेकरू मानत नाहीत, पण हा विचार ब्राह्मणधर्मात नाही. त्यांत भेदाभेद व आग्रहाचा प्रकार विशेष आहे. ज्या वैष्णव साधू लोकांनी आपल्या उपदेशात व आचरणात हा आग्रहाचा भाग सोडून सर्वत्र समबुद्धी ठेवली त्या वैष्णवमताचा हल्लीच्या कालमानाप्रमाणे आपण (प्रार्थना समाजिस्ट) अंगीकार करतो. अराध्यदैवत एक आहे, दुसरे नाही व आपण सर्व त्याचे सारखेच भक्त आहोत ही मते आपणास ग्राह्य आहेत.”

लोकमान्य टिळक शुक्रवार पेठेतील विंचूरकरांच्या वाड्यात राहत. त्यांनीही अनेकदा तेथून जवळूनच जाणाऱ्या पालख्यांचे अवलोकन केलेले होते असे रामभाऊ टिळकांनी त्यांच्या आठवणींमध्ये नमूद केलेले आहे. टिळकांवरही या वारकरी संघटनाचा परिणाम झालेला होता. त्यांनी पुण्यात गणेशोत्सव सुरू केला तेव्हा त्यांनी हा उत्सव मुसलमानांना शह देण्यासाठी, मुसलमानांच्या ताबुतावरून उचलला असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. यावर टिळकांनी असे सांगितले की, मुळात मुसलमानांनीच ताबुताची कल्पना वारकऱ्यांच्या मेळ्यावरून उचलली आहे. टिळकांचे हे मत चूक की बरोबर हे सांगता येत नाही. परंतु टिळकांना गणेशोत्सव सार्वजनिक करण्याची कल्पना मात्र पालखी सोहळ्यावरून सुचली असावी असे म्हणता येते. खरे तर राजारामशास्त्री भागवत यांनी टिळकांच्या या नवीन उपक्रमाबद्दल नापसंती व्यक्त केली होती. त्यांनी असे स्पष्ट म्हटले होते की, या उत्सवाने धर्मभावना वाढीस लागणार नाही. टिळकांना जागृती घडवून आणण्यासाठी हा नवीन उत्सव सुरू करण्याची गरज नव्हती. पालखी सोहळ्यास जागृतीच्या अंगाची जोड त्यांना देता आली असती व त्यांनी द्यायला हवी होती. भागवतांनी प्रार्थना समाजाच्या अनुयायांना असे सुचविले होते की, नवीन समाज स्थापन करण्याऐजवी त्यांनी सरळसरळ वारकऱ्यांबरोबर पंढरीच्या वारीत सामील व्हायला हवे होते.

भागवतांची सूचना टिळकांना मानवण्यासारखी नव्हती हे स्पष्ट आहे. टिळकांना पालख्यांबद्दल आणि वारकऱ्यांबद्दल आदर आणि कौतुक निश्चित होते. परंतु वारकरी पंथाकडे ते तो एकंदर वैदिक परंपरेचा भाग म्हणून पाहत. पंथापंथांमधील भेदांवर भर देणे त्यांना कदाचित तेव्हा रास्त वाटले नसावे हे त्यांच्या ‘साधकानानां अनेकता’ या धोरणाला धरूनच आहे. याउलट रानडे प्रभृती प्रार्थना समाजिस्टांचा कल ब्राह्मणी धर्म आणि वारकरी पंथ यांच्यातील फरकावर बोट ठेवण्याकडे होता. न्यायमूर्ती रानडे यांच्या एका श्राद्धदिनी गणेश जनार्दन आगाशे यांनी केलेल्या भाषणात तुकारामांची पालखी पाहून न्यायमूर्तीना रडू आले त्या प्रसंगाचा उल्लेख होता. तो टिळकांना आवडला नव्हता हे ध्यानात घेतले पाहिजे. या एकदेशीय व एकतर्फी गोष्टी होत व म्हणून सांगू नयेत असे टिळकांचे म्हणणे होते. अर्थात भागवतांनी टिळकांना गणेशोत्सवाबद्दल जो इशारा दिला होता तो किती सार्थ होता हे गणेशोत्सवाच्या आजच्या स्वरूपावरून कोणालाही दिसून येईल.

वारकरी नेत्यांची लोकमान्यांना मदत
याचा अर्थ असा मात्र नाही की, टिळकांनी वारकरीपंथीयांचा उपयोग राष्ट्रकार्याकरिता करून घेण्याच्या दृष्टीने पावलेच टाकली नव्हती. जोग महाराजांसारख्या तत्कालीन काही वारकरी नेत्यांची टिळकांना सहानुभूती व मदतही हवी होती. मात्र विनायकबुवा साखरेंसारख्या वेदांत्यांनी टिळकांना मदत करण्याऐवजी त्यांना नाउमेद

 

केले. इतकेच नव्हे तर टिळकांवरील बहिष्कार आणि (चहा) ग्रामण्य प्रकरणात त्यांच्याविरुद्ध कारवाया केल्या. म्हणजे तत्कालीन वारकरी नेत्यांनी लोकहितवादींना सामाजिक बाबतीत आणि टिळकांना राजकीय बाबतीत निराश केले असे दिसते.

मात्र एकोणिसाव्या शतकात टिळकांनी पुढे आणलेल्या गणेशोत्सवातील भावना आज लुप्तप्राय झालेली दिसते. जागृतीचे अंगही कोठे आढळत नाही. प्रार्थना समाज तर जवळजवळ संपुष्टात आल्यासारखा आहे. राजारामशास्त्री भागवतांच्या इशाऱ्यामध्ये निश्चितच तथ्य होते असे म्हणता येते. कारण पालख्यांचा सोहळा आजही जवळजवळ त्याच स्वरूपात टिकून आहे.

(‘श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा उगम व विकास’ या श्री विठोबा-रखुमादेवी देवस्थान संस्थान पंचकमिटी, श्री क्षेत्र देहू प्रकाशित (१९९५) पुस्तिकेतून साभार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *