भोळ्याभाबड्या भाविकांना सन्मार्ग
दाखविणारे सद्गुरू श्री बाळूमामा
कोरोनामुळे गेली दोन वर्षे होऊ न शकलेला कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील श्री बाळूमामा देवस्थानचा वार्षिक भंडारा उत्सव आणि अमावस्या यात्रा आजपासून सुरू झाली आहे. हा उत्सव २ एप्रिलपर्यंत चालणार आहे. यंदाचा उत्सव गुढीपाडव्यासह एकूण १० दिवसांचा आहे.
सर्वसामान्य आणि भोळ्याभाबड्या भाविकाला देवधर्माचा सोपा मार्ग दाखवणारे संत म्हणून श्री बाळूमामा यांची तमाम महाराष्ट्राला ओळख आहे. अखंड नामस्मरण आणि ‘राम कृष्ण हरी’ हा जप असा साधासोपा मूलमंत्र बाळूमामा यांनी समाजाला दिला. बाळूमामा यांनी जिथं समाधी घेतली, त्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर इथं सद्गुरू श्री बाळूमामा भंडारा यात्रा उत्सव आयोजित केला जात आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा…
जन्म आणि प्रपंच
श्री बाळूमामा यांचा जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अकोल नावाच्या गावात सोमवार आश्विन शुद्ध द्वादशी शके १८१४ म्हणजेच ३ ऑक्टोबर १८९२ रोजी झाला. लहानपणापासूनच बाळूमामा हे ध्यानात हरवलेले असत. पुढे बाळूमामा हे बहिणीकडे राहायला गेले. बहिणीची मुले त्यांना मामा नावाने हाक मारत. तेव्हापासून त्यांची ओळख बाळूमामा अशी रूढ झाली. तिथं बाळूमामा यांचा विवाह झाला, पण तो संसार जास्त दिवस राहिला नाही. दरम्यानच्या काळात त्यांच्या सासऱ्यांनी सुमारे १५ मेंढ्या दिल्या होत्या. तिथूनच बाळूमामा यांची ओळख मेंढपाळ अशी झाली.
परमार्थाची आवड
काही साधू महाराजांनी बाळूमामा यांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. पुढे मेंढ्या चारण्यासाठी जात असताना त्यांना गारगोटी (जि. कोल्हापूर) येथील श्री मुळ्ये महाराजांची भेट झाली. त्यांनी बाळूमामा यांना अनुग्रह दिला. विशेष म्हणजे मुळ्ये महाराज हे श्री हालसिद्ध नाथांचा अवतार मानले जातात. त्यांच्याच शिकवणीत बाळूमामा यांनी ईश्वरसाधना आणि नामस्मरण सुरू केले.
मराठी आणि कानडी भाषेत उपदेश
मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी फिरत असत. जमीन, पाणी, अग्नि, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांवर त्यांचा विश्वास होता. कानडी व मराठी भाषेत ते सर्वांना न्याय देत धर्म चरणाचा उपदेश करत. बाळूमामा हे स्वभावाने करारी आणि कठोर शिस्तीचे होते. ते अनेकदा साधकांवर ओरडत असत. पण, लोक ते आशीर्वाद म्हणून स्वीकारत असत. शर्ट, धोतर, फेटा, कोल्हापुरी चप्पल, कांबळा असा मामांचा पेहराव होता. ते कायम मेंढ्यासोबत शिवारातच मुक्काम करत असत. गोरगरिबांना अन्नदान व्हावे म्हणून १९३२ पासून भंडारा उत्सव सुरू केला. जो आजही सुरूच आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक हा बाळूमामा यांचा मोठा शिष्य आहे. त्यांनी बाळूमामा यांना ‘संत’ ही पदवी दिली. विठ्ठलभक्ती करत हरिनाम घ्या, रामकृष्णहरी जपत राहा, असे बाळूमामा सतत सांगायचे. बाळूमामा यांच्या मेंढ्यादेखील तितक्याच पवित्र मानल्या जातात.
मेंढ्यांची संख्या ४० हजारांवर
बाळूमामा यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी १९६६ मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर या गावात निधन झाले. तिथं त्यांच्या स्मरणार्थ मंदिर बांधण्यात आले. या मंदिराची देखभाल श्री बाळूमामा ट्रस्ट करते. मेंढ्यांची संख्या आता सुमारे ४० हजार इतकी झाली आहे, ज्यांची देखभाल मंदिर ट्रस्ट करत आहे. आज ज्या मेंढ्या आहेत, त्या बाळूमामा यांच्या मेंढ्यांच्या वंशज मानल्या जातात. जर बाळूमामाच्या मेंढ्यांचा कळप एखाद्याच्या शेतात किंवा शेतात राहिला किंवा गेला तर ते पवित्र आणि पुण्यवान मानले जाते. श्री बाळूमामा यांच्या या मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई यांची सुंदर मूर्ती आहे. त्यामुळं आदमापूर क्षेत्राची ओळख प्रतिपंढरपूर अशी देखील आहे. बाळूमामा यांच्या जयंती आणि पुण्यतिथी उत्सव सोहळ्यावेळी भंडारा उधळला जातो आणि ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ असा गजर केला जातो. एकूणच, भोळ्याभाबड्या आणि गोरगरीब जनतेला सदैव ईश्वरभक्तीची वाट दाखवणारे संत श्री बाळूमामा यांचे कार्य अलौकिक असेच आहे. त्यांच्या या कार्याला।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन.🙏