संत कबीरांचा विचार जगणारे

केशव उर्फ बापूसाहेब महाराज

आधुनिक काळात संत कबीर महाराजांचा विचार जागविणाऱ्या आळंदीतील कबीर घराण्यातील एक कर्तृत्त्ववान सत्पुरुष वै. ह. भ. प. केशव महाराज कबीर यांचा आज १७ वा पुण्यस्मरण दिवस. त्यांना वारकरी आणि आळंदीकर प्रेमाने ‘बापू’ असे संबोधत. बापूसाहेब महाराजांनी वारकऱ्यांचे नेतृत्व करत त्यांना खऱ्या अर्थाने संतविचारांच्या वाटेवर आणले. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आळंदीमध्ये पंचदिनी अखंड हरिनाम सप्ताह होतो आहे.

संत कबीरांची परंपरा

वारकरी आचार विचाराने प्रभावित झालेले उत्तर भारतातील संत कबीर महाराज महाराष्ट्रात आले. खरे तर संत कबीर निर्गुण निराकार परमेश्वराची भक्ती करणारे. पण, महाराष्ट्रातील वारकरी संतांच्या विचाराने प्रभावित झाले आणि इथल्या संत मांदियाळीत रमून गेले. वारकऱ्यांचा कटेवर कर ठेवून विटेवर उभा राहिलेला, निशस्त्र, सहिष्णु, वात्सल्यमूर्ती, सगुण साकार सावळ्या विठुरायाच्या ते प्रेमातच पडले. त्याहूनही ते अधिक रमून गेले ते चंद्रभागेच्या वाळवंटातील सर्व जातीधर्माच्या, एकमेकांच्या पायी लागणाऱ्या संतांच्या मेळ्यात, संत नामदेवांच्या कीर्तनात. संतांनी वाळवंटात मांडलेल्या समतेच्या खेळात ते दंग झाले आणि पंढरीचे वारकरी झाले.

वारकऱ्यांचे समर्थ नेतृत्त्व
काशीहून संत कबीरांची पालखी सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी पंढरपूरच्या आषाढी वारीला येत होती, अशी नोंद न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी करून ठेवली आहे. संत कबीरांच्या समता, बंधुभावाच्या विचारांनीच भारतीय समाजाची जडणघडण झाली. त्यांनी सांगितलेली डोळस आणि समाजाभिमुख भक्तीच्या परंपरेची शुभ्र पताका महाराष्ट्रातील त्यांच्या अनुयायांनी या आधुनिक काळातही फडकत ठेवली आहे. या परंपरेचे एकनिष्ठ पाईक म्हणजे आळंदी येथील कबीर घराणे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपाछायेखाली माऊलींच्या मंदिराच्या शेजारीच संत कबीर मठाच्या माध्यमातून हे कबीर घराणे ज्ञानाची गंगा महाराष्ट्रभर पोहचवत आहे. ही थोर परंपरा पुढे नेणारे कबीर घराण्यातील एक सत्पुरुष म्हणजे वैकुंठवासी ह. भ. प. श्री केशव महाराज अर्थात बापूसाहेब महाराज कबीर. त्यांचा जन्म कार्तिक वद्य पंचमी १५ नोव्हेंबर १९३५ रोजी झाला. कृषिपदवीधर असलेल्या बापूंनी आपल्या परंपरेचा वारसा समर्थपणे पुढे नेला. त्यांनी वारकरी संप्रदायाचे अनेक वर्षे नेतृत्व केले. आळंदीतील श्री कबीर मठातच त्यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी महामंडळाची स्थापना झाली. मुंबईचे महापौर बाबासाहेब वरळीकर यांना त्यांनी महामंडळाचे अध्यक्षपद भूषविण्यास सांगितले. या महामंडळाने पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरातील ‘बडवे हटाव’ मोहिमेला चालना दिली. महाराष्ट्रातील सर्व पालख्यांचा महासंघ बापूंनी स्थापन केला. या संघाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. बापूंनी संत ज्ञानदेवांचा संजीवन समाधी सप्तशताब्दी सोहळा, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन सोहळा, मुक्ताई ज्ञान ज्योत यात्रा, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी विजययात्रा आदी कार्यक्रमांचे यशस्वी नेतृत्व केले.

सत्यशोधक विचारांची जोपासना
आळंदीच्या या श्री कबीर मठाने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय चळवळीचे नेतृत्त्व केले. सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाज जागृतीची ऐतिहासिक चळवळ उभारणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांना आळंदीच्या या कबीर मठानेच बळ दिले. महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेची बीजे याच मठातील वैचारिक बैठकीत रुजविली गेली. संतांच्या आणि सत्यशोधकी विचारांची जोपासना बापूंनी आयुष्यभर केली. श्री संत कबीर महाराज मठाच्या परंपरेत अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले. मठाचे चौथे सत्पुरुष सद्गुरू रामदास बाबा होते. रामदास बाबांनी आपली परंपरा आणि तिचा विस्तार मुंबई आणि परिसरातही केला. महाराष्ट्रातील समग्र कोळी आणि आगरी समाजाला वारकरी संप्रदायात अनुग्रहित करून घेतले. सुमारे १०० वर्षांपूर्वी मुंबई येथील वरळी कोळीवाड्यात त्यांनी हरीनाम सप्ताह चालू केला.

महाराणी ताराराणी आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये ज्या देवीच्या समोर तह झाला, त्या आदिशक्ती कमलजा माता, कळंब, (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे ११४ वर्षांपूर्वी नाम सप्ताह चालू केला. असे विविध ठिकाणी उत्सव चालू करून सामाजिक अभ्युदयाची चळवळ सुरू केली. सद्गुरू रामदास बाबा यांचे थोरले बंधू सद्गुरू वैकुंठवासी ह. भ. प. श्री. एकनाथ बाबा कबीर महाराज यांनी बडोदा येथे वास्तव्य करून महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे राजगुरू म्हणून मार्गदर्शन केले. हीच प्रेरणा आणि मार्गदर्शन सद्गुरू बाबांच्या पुढील पिढीला प्राप्त झाली. थोरले सुपुत्र वैकुंठवासी ह. भ. प. श्री. पंढरीनाथ कबीर महाराज यांनी सामाजिक आणि राजकीय चळवळीत, स्वातंत्र्य पूर्व काळात सहभाग घेतला. त्यांनी सलग २५ वर्षे आळंदी देवाची नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषविले. १९५२ च्या पहिल्या विधानसभेत खेड आळंदी मतदार संघातून ते आमदार म्हणूनही निवडून गेले. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षणाचे जाळे विणणाऱ्या जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाची स्थापना केली. या संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.

माझ्या वडिलांची मिरासी
सद्गुरू बाबांचे दुसरे सुपुत्र वेद शास्त्र संपन्न वैकुंठवासी ह. भ. प. श्री. तुकाराम कबीर महाराज यांनी काशी क्षेत्री कबीर कीर्ती मंदिरात १२ वर्षे अध्ययन करून, संपूर्ण देशात वारकरी परंपरा, विचार नेण्याचे काम केले. आपल्या या पूर्वजांची हीच सेवाभावी परंपरा वैकुंठवासी ह. भ. प. श्री. केशव महाराज कबीर यांनी पुढं नेली. परमार्थासोबतच ते सामाजिक कार्यात सक्रीय असत. त्यामुळे वारकरी आणि आळंदीत त्यांना मान सन्मान होता. आळंदीकरांनी त्यांना आळंदी नगर परिषदेचे अध्यक्ष पदही बहाल केले होते. बापूंचा वारसा त्यांचे चिरंजीव ह. भ. प. श्री. चैतन्य महाराज कबीरबुवा समर्थपणे चालवत आहेत.

भाद्रपद शुद्ध चतुर्थी ५ सप्टेंबर २००५ रोजी बापूंनी आपला देह ठेवला. अशा या संत कबीरांचा आणि सत्यशोधकी विचार जगणाऱ्या वैकुंठवासी ह. भ. प. श्री. केशव महाराज कबीर यांना त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे त्रिवार वंदन!

2 thoughts on “केशव महाराज कबीर पुण्यतिथी

 1. वै. ह. भ. केशव महाराज कबीर पुण्यस्मरण

 2. On Kabir Math Traditions

  Historical perspective of Kabir stalwart social activists, reformers, spiritual leaders provides the submerged portion of the Tip of the Iceberg. It is noteworthy that Shri. Sant Kabir Maharaj was not an idol worshipper untill he joined Warkari Pageant marching over to Pandharpur; and was overwhelmed to see Vitthal standing on a brick: unarmed as a deity of compassion. He was deeply moved to see the Warkaries touching each others feet testifying presence of Divine Soul in each one’s body. The great soul returned to Varanasi but ever since then his disciples would take out a pageant with a Palakhi to Pandharpur.
  The first three progenies of Shri Sant Kabir Maharaj who made Aalandi as their permanent habitat worked for spread of Warkari tradition in the vicinity of Aalandi. Sant Ramdas Baba and his younger brother Eknath Baba strived for spread of Warkari tradition in Badoda and Mumbai, respectively. In course of time the Kabir Math became centre of socio-political and spiritual movements functioning in Maharashtra.
  The work of dynamic persons like Sant Keshav Maharaj and his predecessors elicited good changes in the contemporary social life; as a recognition of their services they were elected mayors of Aalandi many a time.
  Kabir family hailed from the land of ascetic practices: Varanasi, but as time passed on, they nurtured humanitarian values sporting the Warkari Pataka. It is very interesting to see in Kabir family that every generation has spared atleast one family descendant for socio-religious duties unto the extended family I.e. socio-cultural movement.
  Sant Keshav maharaj’s spouse is my real Maoshi: Ratantai. The former’s talk on spiritual topic and the latter’s talk with my mother would involve me in their language and contents. Shri. Chaitanya Maharaj’s way of maintaining the family traditions and guiding the volunteers of the socio-religious activities is praiseworthy. Like Kabir family hardly we can find a few families dedicating their contribution to the ancestral cause.
  Date: 31/09/2022 Ganesh Chaturthi
  Composed by Dr. uttam B. Parekar
  Mob. 9921436640 (Wardha)

Leave a Reply

Your email address will not be published.