घाटाने अनुभवला दोन वर्षांनी
||ज्ञानबातुकाराम||चा गजर
सासवड : ‘निढळावर कर ठेऊन’ गेली दोन वर्षे जो आपल्या भक्तांची अर्थात वारकऱ्यांची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होता, तो दिवे घाटातला विठुराया आज एकादशीच्या दिवशी आनंदून गेला! संत ज्ञानेश्वर माऊलींसोबत नाचत गात घाट चढणाऱ्या वारकऱ्यांवर त्याने पर्जन्यराजाच्या आनंदसरींच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव केला.
शिंदे छत्री येथे आरती
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुण्यातील दोन दिवसांचा मुक्काम संपवून आज (दि. २४) भल्या सकाळीच सासवड मुक्कामी निघाला. शिंदेछत्री येथे माऊलींच्या सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. पालखी सोहळा सुरू करण्यासाठी मदत करणारे महादजी शिंदे यांच्या छत्रीवर रिवाजाप्रमाणे आरती करण्यात आली. त्यावेळी माऊलींच्या दर्शनासाठी परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही ऐन एकादशीच्या उपवासाच्या दिवशी वारकऱ्यांची परीक्षा पाहणारा दिवे घाट जणू यंदा आनंदवाट बनला. कारण गेली दोन वर्षे कोरोनामुळे या घाटातून वारी गेलीच नाही. त्यादरम्यान घाटाच्या टोकावर येऊन उभा राहिलेला विठोबा आणि परिसर उदास झाला होता. वारकऱ्यांनाही त्याची ओढ लागली होती, त्यामुळे त्यांच्या पायाखालची चढणीची पायवाटही सोपी झाली.
संपूर्ण घाटाची स्वच्छता
वारकरी घाटात पोहोचण्यापूर्वी संपूर्ण दिवे घाट पुणे महानगरपालिका आणि वडकी ग्रामपंचायत यांच्या वतीने स्वच्छ करण्यात आला होता. तीन किलोमीटर परिसरातील जवळपास २५ टन कचरा उचलण्यात आला होता.
वारकऱ्यांसोबतच यंदा पुणेकरही मोठ्या संख्येने सासवडपर्यंत सहभागी झाले. दुपारी साडेतीनच्या दरम्यान घाट चढताना पावसाच्या धारा बरसल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ||ज्ञानबातुकाराम||चा गजर टीपेला पोहोचला. माऊलींचा पालखी रथ ओढणाऱ्या बैलांना घाट हलका जावा म्हणून परिसरातील शेतकऱ्यांनी रथाला आपल्या चार बैलजोड्या जुंपल्या. एकादशी असल्याने वाटेत ठिकठिकाणी वारकऱ्यांना उपवासाचे पदार्थ वाटण्यात येत होते.
खासदार सुप्रिया सुळेंचा सहभाग
यंदा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही वारकऱ्यांसोबत घाट चढण्याचा आनंद लुटला. सात किलोमीटरचा घाट चढून पाच वाजता पालखी सोहळा वर झेंडेवाडी फाटा येथे पोहोचला. तेथे खासदार सुळे, आमदार संजय जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, भाजपचे बाबाराजे जाधवराव, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनौबत यांच्यासह पुरंदर तालुका वासीयांनी सोहळ्याचे स्वागत केले.
पोलिसांकडून ड्रोनद्वारे चित्रीकरण
पोलिसांनी यंदा ड्रोनच्या साहाय्याने या घाट मार्गाचे चित्रीकरण केले. संध्याकाळी उशीरा पालखी सोहळा सासवडला पोहोचला. सासवडमध्ये पालखीचा दोन दिवस मुक्काम असणार आहे. सासवडमध्ये माऊलींचे धाकटे बंधू सोपानकाका यांची समाधी आहे. माऊलींचा मुक्काम सासवडमध्ये असतानाच सोपानकाकांच्या पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान होते.
तुकोबारायांचा सोहळा उरुळी कांचनकडे
दरम्यान दोन दिवस पुणे मुक्कामी असणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळाही आज (दि. २४) उरुळी कांचनकडे मार्गस्थ झाला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटातून पुणे-सासवड-लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर, संत तुकाराम महाराज पालखी ही पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती, इंदापूर, अकलूजमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होते.