बाबांनी मशिदीत सुरू केला

उरुसासोबत रामनवमी उत्सव

शिर्डीचे श्री साईबाबा म्हणजे सर्व धर्म, पंथांना जोडणारे आधुनिक संत. साईबाबांनी संतांचाच बंधुभावाचा विचार जगाला सांगितला. ‘द्वारकामाई’वर भगवे आणि हिरवे निशाण एकत्र फडकवून त्यांनी ऐक्याचा संदेश दिला. शिर्डीत उरुसाबरोबरच श्रीरामनवमी उत्सवही सुरू केला. साईबाबांचा हा विचार आणि त्यांचे भक्त आज जगभर पसरले आहेत.

शिर्डी माझे पंढरपूर
वारकरी संतांनी सांगितलेला सर्वधर्म समभावाचा विचार खऱ्या अर्थाने जगले ते शिर्डीचे साईबाबा. साईबाबा संत परंपरेचे पाईक होते, म्हणूनच बाबांचे सेवेकरी संतकवी दासगणू महाराज यांनी ‘शिर्डी माझे पंढरपूर। साईबाबा रमावर, शुद्ध भक्ती चंद्रभागा। भाव पुंडलिक जागा।।’ ही छोटी आरती रचली. साई मंदिरात ही आरती नित्य आळवली जाते. विठोबाच्या पायी वीट होती. तर, साईंच्या उशाला वीट कायमची होती. साईबाबा १८६८ ते १८७२ दरम्यान शिर्डीला आले. सुरुवातीला ते गावाच्या वेशीवर एका लिंबाच्या झाडाखाली राहत. नंतर त्यांनी आपला मुक्काम मोडक्या मशिदीत हलवला. ते सुरुवातीला गावात भिक्षा मागत.

काही वर्षांनी त्यांच्याभोवती भक्त जमा होऊ लागले. त्यांचे भक्त मशिदीत त्यांची पूजा करत. या मशिदीतच बाबांनी वार्षिक उरूस आणि रामनवमी उत्सव एकाच दिवशी साजरा करण्यास सुरुवात केली. बाबांनी ज्या पडक्या मशिदीत वास्तव्य करून रंजल्या-गांजल्यांची सेवा केली, तिला ते कधी द्वारका, तर कधी द्वारावती म्हणत. पुढे त्यांनीच या वास्तूचे नामकरण द्वारकामाई असे केले. बाबा मुस्लीम आहेत, की हिंदू असे अंदाज अनेकांनी लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. बाबांचा वेश मात्र मुस्लीम फकिरासारखा होता. ते राहत होते, त्या मशिदीत त्यांनी भक्तांना शंखनाद, पूजाअर्चा करण्याची परवानगी दिली होती. बाबा मुखाने सतत ‘अल्ला मालिक’ असे म्हणत आणि हिंदूंची भजनेही म्हणत. मोडकळीस आलेल्या मशिदीच्या डागडुजीसाठी पैसे जमले, तेव्हा साईबाबांनी मशिदीआधी गावातील सर्व मंदिरे दुरुस्त करण्याचा आग्रह धरला होता.

द्वारकाधीश म्हणजे श्रीकृष्ण. पंढरीचा विठोबा हा श्रीकृष्णाचा अवतार. बाबांचे महानिर्वाण झाले, त्या वेळी एकादशी सुरू झाली होती. साईमंदिरात बाबांना नित्याचा नैवेद्य पिठलं-भाकरीचा असतो. आषाढी-कार्तिकीला मात्र उपवासाच्या साबुदाणा खिचडीचा नैवेद्य असतो. आषाढीला साईदर्शनाला येणाऱ्या भाविकांना खिचडीचा प्रसाद दिला जातो. बाबांचे सेवेकरी नागपूरचे नवकोट नारायण श्रीमंत गोपाळराव बुटी यांनी द्वारकामाईलगत चिरेबंदी वाडा बांधला. त्यात त्यांना मुरलीधराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करायची होती. नंतर बाबांनीच तेथे चिरविश्रांती घेण्याची इच्छा व्यक्त केली. मुरलीधराची मूर्ती अद्यापही तशीच आहे आणि बुटीवाड्याचे रूपांतर साईबाबांच्या समाधी मंदिरात झाले आहे. मुरलीधर मूर्ती, पंढरपूरचा विठोबा आणि साई समाधी मंदिर यांचे एकत्रित दर्शन शिर्डीमध्ये होते.
भगवे आणि हिरवे निशाण एकत्र
बाबांनी द्वारकामाईत अग्नी पेटविला. समया प्रज्वलित करून ज्ञानाचा प्रकाश निर्माण केला. द्वारकामाईवर भगवे आणि हिरवे निशाण एकत्र फडकावून ऐक्याचा संदेश दिला. उरुसाबरोबरच श्रीरामनवमी उत्सव सुरू केला. साई मंदिरात दहाच्या सुमारास नित्याची शेजारती होते. त्या वेळी ज्ञानेश्वर माउली आणि संतश्रेष्ठ तुकोबांच्या आरत्यादेखील आळवल्या जातात. ७ एप्रिल १९११ रोजी पहिला श्रीरामजन्मोत्सव पार पडला. त्या वेळी श्रीरामजन्मावर आधारित पहिले कीर्तन ह. भ. प. कृष्णराव भीष्म यांनी केले. पुढे दोन वर्षांनी संतकवी दासगणू महाराज साईंच्या दरबारात दाखल झाले.

त्यांनी त्या वर्षी श्रीरामनवमी उत्सवात पहिले कीर्तन केले. हयातभर आपली कीर्तनसेवा बाबांच्या चरणी समर्पित केली. तेव्हापासून सुरू झालेली येथील नारदीय कीर्तन परंपरा आजही कायम आहे. एकदा नारदीय कीर्तनकार करतात तसा वेशभूषेचा थाट करून संतकवी दासगणू कीर्तनास उभे राहिले. बाबा म्हणाले, “तू नवरदेव आहेस का? ते कपडे बाजूला कर.” मग दासगणूंनी अंगरखा आणि टोपी दूर भिरकावून दिली. कमरेला धोतर आणि खांद्यावर उपरणे अशा वेशात कीर्तन केले. तेव्हापासून असाच वेश परिधान करून कीर्तन करण्याची प्रथा सुरू झाली. ती आजही कायम आहे. आज बाबांच्या नगरीत श्रीरामनवमी, गुरुपौर्णिमा आणि विजयादशमी (बाबांची पुण्यतिथी) हे तीन उत्सव साजरे होतात.

श्रीरामनवमीसाठी येतात पायी पालख्या
आषाढी आणि कार्तिकीचे वेध जसे पंढरीच्या वारकऱ्यांना लागतात, तसे शिर्डीतील श्रीरामनवमी उत्सवाचे वेध मुंबईकर पदयात्री भाविकांना लागतात. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून मुंबईकर भाविकांच्या साई पालख्या शिडीकडे कूच करतात. रणरणत्या उन्हात अडीचशे पावणेतीनशे किलोमीटर अंतर पायी पार करून हे साईंचे वारकरी श्रीरामनवमीच्या उत्सवाच्या पहिल्या दिवशी शिर्डीत प्रवेश करतात. वाद्यांच्या गजरात ठेका धरून नाचतात. साई समाधीचे दर्शन घेऊन आपल्या घराकडे माघारी फिरतात. श्रीरामनवमी उत्सवासाठी शिर्डीत पायी पालख्या येण्याची प्रथा सुरू होऊन, सुमारे ३१ वर्षे लोटली. मुंबई परिसरातून शंभराहून अधिक पालख्या येतात. पंढरीच्या विठोबाचे वारकरी प्रामुख्याने ग्रामीण भागातले, तर साईंचे वारकरी प्रामुख्याने शहरी भागातील असतात.

पंढरीच्या वाटेवरचे वारकरी शेतकरी वेशातील, तर शिर्डीच्या वाटेवरचे वारकरी अर्धी चड्डी, अर्ध्या बाह्यांचा सदरा, डोक्यावर हॅट, हातात पिण्याच्या पाण्याची बाटली, पायात स्पोर्टस् शूज, डोळ्यांवर गॉगल, खिशात मोबाईल, कानात इअरफोन, दुसऱ्या हातात काठी, असा असतो. महिला वारकरी पंजाबी ड्रेस अथवा सहावारी साडी, बऱ्याच युवती जीन्स आणि टी शर्ट असा वेश परिधान केलेल्या असतात. अर्थात सामान्य वारकरीही त्यांच्या दिंडीत असतात. मुंबईतील आमदार, खासदार, नगरसेवक या पालख्यांना मदत करतात. आता तर बारा महिने शिर्डीत पालख्या येत असतात. त्यात गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि ओडिशातून येणाऱ्या पालख्यांचादेखील समावेश आहे. वर्षभरात एक हजाराहून अधिक पालख्यांत एक ते दीड लाखाहून वारकरी येतात.

साईबाबांनी सुरू केलेल्या हिंदू मुस्लिम संयुक्त परंपरा देवस्थानने सुरू ठेवल्या आहेत. साईबाबांनी मशिदीत पेटवलेले अग्निकुंड आजही प्रज्वलित ठेवलेले आहे. दर गुरुवारी रात्री गावातील देवळापासून या मशिदीपर्यंत साईबाबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. हिंदु आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील कट्टरवाद्यांना अजूनही बाबांच्या वागण्याचे कोडे उलगडत नाही. मात्र सर्व धर्मांतील भक्त शिर्डीला येऊन त्यांच्या चरणी लीन होतात. साईबाबा आता केवळ महाराष्ट्राचे राहिले नाहीत, तर संपूर्ण देशाचे झाले आहेत. त्यांचे भक्त जगभर पसरले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *