बेल, शमी, पिंपळ आदी

देशी वृक्ष लावण्याचे आवाहन

जळगाव : व्रतवैकल्यांचा महिना अशी ओळख असलेला श्रावण सुरू झाला आहे. बेलासह विविध वृक्ष, वेलींची पाने पूजाविधीसाठी वापरली जातात. निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ राहिले, तरी आरोग्यावर चांगला परिणाम होतो. श्रावणातला प्रत्येक दिवस हा व्रत असल्यासारखा आहे. हे व्रत निसर्गाशी निगडित आहे. त्यामुळे केवळ बेल, शमी यांची पाने न तोडता या श्रावणात एक तरी बेल, शमी किंवा पिंपळाचे झाड लावा, असे आवाहन जळगाव येथील श्रीराम मंदिर संस्थानचे गादिपती मंगेश महाराज यांनी केले आहे.

श्रावण महिन्यानिमित्त www.dnyanbatukaram.comच्या प्रतिनिधीसोबत बोलताना मंगेश महाराज म्हणाले, “श्रावणात वेगवेगळी झाडे, वेली आणि गवताच्या पत्री (पाने) पूजेसाठी वापरली जातात. या झाडे-वेलींचे पूजेप्रमाणेच औषधीदृष्ट्याही तेवढेच महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचे जतन व्हायला हवे.

श्रावण असो की कोणताही महिना, झाडे लावल्याने आणि निसर्गाचे संगोपन केल्याने पुण्यच मिळेल. पूजेसाठी ही झाडे मुळापासून न ओरबाडता आवश्‍यक असेल तेवढीच पाने खुडून घ्यावीत. निसर्गाकडून आपण जसे घेतो तसे आपणही या दिवसांत एकतरी बेल, शमी, पिंपळाचे रोपटे लावून ते जगवायला हवे, असा सल्ला त्यांनी श्रावणात बेल, पत्रीने पूजा करणाऱ्या भाविकांना दिला.

आवश्‍यक तेवढीच पाने तोडा
बेलाला धार्मिक महत्त्व आहे. तसेच या झाडाची फळेही औषधी गुणधर्मामुळे अधिक उपयुक्त आहेत. त्यामुळे या झाडाच्या फांद्या न तोडता केवळ पानेच तोडली गेली पाहिजे. या महिन्यात बेलाच्या झाडाकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले जाते. त्यामुळे या झाडांची मोठ्या प्रमाणात हानी होते. पूजेसाठी पाहिजे तेवढीच पाने तोडावी, असे आवाहनही त्यांनी केले.

श्रावणातील सणांसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पती
नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, दहीहंडी, पोळा आणि श्रीकृष्ण जयंती, श्रावण सोमवार आदी सण-उत्सव श्रावण महिन्यात येतात. या महिन्यात कटुर्ले, कुंजीर, शिंदे, आघाडा, भारंगी, कुरडू, केना, चिराटी, घोळ, करांदे, हलुंदा, पेव, गजकर्णिका, जिवती, टाकळा, माकडशिंगी, हमाम, करपुडी, फांग, बेल, तुळस, आघाडा, अर्जुन सादडा, शमी, आवळा, धोत्रा, बेल, रुई, करंडा या खाद्य आणि पूजेसाठी लागणाऱ्या वनस्पती येतात. तर चवर, पाण-तेरडा, वन-तेरडा, माळी-मुसळी, अग्निशिखा, सीतेची आसवे, पंद निचुर्डी, शिवसुमन, कचोरा, कावळी, भुई-अमर्या, भूतकेस आदी रानफुले या महिन्यात येतात, अशी माहिती मंगेश महाराज यांनी दिली. या वृक्षवेलींचे पर्यावरणीय महत्त्वही आपण ओळखावे आणि त्यांचे जतन करावे, असे आवाहनही मंगेश महाराज यांनी यानिमित्ताने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *