गरीबांची काशी श्री क्षेत्र पानेट

येथे झटले समाजोद्धारासाठी

आपल्या साधू-संतांनी ईश्‍वरभक्‍ती, प्राणीप्रेम आणि परोपकाराची शिकवण दिली. मानवतेची ज्योत या संतांमुळे अखंड तेवत राहिली. समाजउद्धारासाठी सदैव झटणारे आणि मारुतीराया, भगवान शंकर आणि विठ्ठलाचे निस्सीम भक्‍त म्हणून अकोला जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पानेट येथील ब्रह्मचारी महाराज यांची ओळख आहे. महाराजांची आज
पुण्यतिथी.

अकोला-अकोट मार्गावर दोन किलोमीटरवर पूर्णा नदीच्या काठावर गोपाळखेड हे गाव आहे. या गावाभोवतालच्या परिसराला श्रीक्षेत्र पानेट म्हणतात. टेकड्या आणि पूर्णा नदीमुळे हा परिसर भौगोलिक दृष्ट्यादेखील परिपूर्ण आहे. याच गावात ब्रह्मचारी महाराजांचे वास्तव्य राहिले. शेगावचे संत श्री गजानन महाराज, अकोटचे श्री नरसिंग महाराज आणि ब्रह्मचारी महाराज हे समकालिन संत असल्याचे भाविक सांगतात.

कोण होते ब्रह्मचारीबुवा?
ब्रह्मचारी महाराज यांचे यांचे नाव, गाव, कूळ कोणालाही माहिती नव्हते. उत्तर भारतातून ते फिरत-फिरत आले असावेत, अशी नोंद आहे. पानेट येथे आले तेव्हा त्यांचे वय ६० वर्षे असावे, असे वडिलधारे सांगतात. ते नैमिष्यारण्यात गेले असता, तेथे ब्रह्मचैतन्य नावाच्या योगी व्यक्‍तीने ब्रह्मचारीबुवांना उपदेश केला. योगविद्या शिकवली. पुढे ब्रह्मचारीबुवांनी अध्यात्मक्षेत्रात अधिकार प्राप्त करून घेतला. पुढे ते नेरपिंगळाई, माहूर, उमकदेव, किनखेड असे फिरत पानेट येथे आले. परतवाडा येथील श्री योगानंद स्वामी यांच्याशीही त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल ते कोणालाही काही सांगत नसत. मात्र, ते वर्षातून एकवेळा उत्तर भारतात जात असत. एकूणच ब्रह्मचारी महाराज यांच्याबद्दल लोकांची वेगवेगळी मतं आहेत. ब्रह्मचारीबुवा हे तेजस्वी, उंच आणि गोरेपान अशा व्यक्‍तीमत्त्वाचे होते. योगसाधनेमुळे त्यांचे तेज प्रखर होते. असं म्हणतात, की गजानन महाराज यांना शेगावी जाण्याचा उपदेश ब्रह्मचारीबुवा यांनीच दिला.

येथेच आहे तुझा काशी-विश्‍वेश्‍वर
पानेट येथे आल्यावर ब्रह्मचारीबुवा पिलकवाडी येथे वास्तव्यास होते. तेथील सीताराम गंभीरजी पाटील यांनी बुवांना मारुती मंदिराजवळ नदीकाठी झोपडी बांधून दिली. त्यांची एकनिष्ठपणे सेवा केली. पुढे नामदेव पाटील यांनी मठ बांधून दिला. तेथे बुवांनी मारुतीरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. ब्रह्मचारीबुवांना एकदा काशी विश्‍वश्‍वराच्या दर्शनाला जायचे होते. त्यावेळी रामकृष्णशास्त्री तेथे आले होते. पण, तीन दिवसांनी बुवांना दृष्टांत झाला आणि त्यांनी तेथून जवळच असलेल्या बोरी वृक्षाखाली खोदकाम करण्यास सांगितले. तेथे ४० फुटांवर भगवान शंकराची पिंड सापडल्याची नोंद आहे. आजही ही पिंड तेथे असून दरवर्षी येथे महाशिवरात्रीची यात्रा भरते. नदीच्या पुरातील गाळाने ते शिवलिंग दरवर्षी जमिनीत दबले जाते. शिवरात्रीच्या काळात भाविक ही माती बाजूला सरकवून शिवलिंग मोकळे करतात. तेथे भव्य यात्रा आयोजित केली जाते.

…आणि बुवांनी देह सोडला
ब्रह्मचारीबुवांनी अनेक भक्‍तांना मार्गदर्शन केले. अनेकांना संसाराला लावले. संत गजानन महाराज यांच्यासोबत त्यांचे वास्तव्य राहिले. बुवा दरवर्षी पंढरपूर वारीलादेखील जात होते, अशी नोंद आहे. शके १८२६ माघ कृ. ६ म्हणजे दि. २५ फेब्रुवारी १९०५ रोजी बुवांनी वैकुंठी जाण्यासाठी मारुतीरायाकडे आज्ञा मागितली आणि त्याच दिवशी समाधी घेतली. तेथेच पूर्णा नदीकाठावर भाविकांनी त्यांना समाधी दिली. शेकडो भाविक-भक्‍तांनी तेथे भागवत, हरिपाठ, कीर्तन आयोजित केले. समाधीवर ७ दिवस रुद्राभिषेक करून बुवांना निरोप दिला. पुढे नामेदव महाराज मोडक यांनी बुवांची परंपरा चालवली. बुवांनी देह सोडल्यानंतर त्यांची वारीची परंपरा अनेक वर्षे सुरू होती, असे श्रीक्षेत्र पानेटचे अध्यक्ष मनीष मोडक यांनी सांगितले.

समाजकार्य सुरूच
मंदिर संस्थानातर्फे आज ब्रह्मचारी महाराज यांचा पुण्यतिथी सप्ताह साजरा केला जात आहे. या उत्सवात महाप्रसादात दिली जाणारी वांग्याची भाजी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. येणाऱ्या प्रत्येक भाविकास १ पोळी आणि वांग्याची भाजी दिली जाते. शिवाय, रक्‍तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केली जातात. मनीष मोडक यांनी सांगितल्यानुसार आतापर्यंत ५५ जणांच्या नेत्र शस्त्रक्रिया संस्थानने मोफत करून दिल्या आहेत. दरवर्षी एका अनाथ मुलीसोबत भाऊबीज साजरी केली जाते. आदिवासी बांधवांना वस्त्र आणि अन्नदान केले जाते. संस्थानातर्फे गोरक्षणदेखील केले जात असून सध्या ८० गायींचे संगोपन केले जाते. येथेच श्‍वानदेखील आहेत. ब्रह्मचारीबुवांना गाय आणि श्‍वान दोन्ही प्रिय होते. त्यांची शिकवण म्हणून हा वारसा संस्थानतर्फे चालवला जातो. पूर्णा नदीच्या काठावर शंभू महादेवाच्या पिंडीजवळ यात्रा भरते. तेथे नदीवर धरण बांधण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात हे ऐतिहासिक आणि स्वयंभू शिवलिंग पाण्यात जात आहे. त्यामुळे येथे मंदिर उभारण्याची आवश्‍यकता आहे. श्रद्धाळूंनी मदत करावी, असे आवाहन मनीष मोडक यांनी केले आहे.

(या माहितीसाठी श्री ब्रह्मचारी बुवा मंदिर संस्थानचे अध्यक्ष मनीष मोडक आणि बुवांचे भक्‍त विजय ढोरे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *