भटक्यांची पंढरी असलेल्या
कानिफनाथांच्या मढीची यात्रा
नगर जिल्ह्यातील मढी येथे दरवर्षी रंगपंचमीला श्री ब्रह्मचैत्यन्य कानिफनाथ महाराज यांची यात्रा भरते. प्रत्यक्षात होळी ते गुढीपाडवा काळात हा उत्सव असतो. पण, कानिफनाथांनी रंगपंचमीला समाधी घेतली होती. त्यामुळे यात्रा उत्सवात रंगपंचमीला खूप महत्त्व आहे. यात्राकाळात दरवर्षी साधारणतः २० लाख भाविक महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश आदी प्रांतांमधून येतात. विशेषतः गोपाल, वैदू, कैकाडी कोल्हाटी, कुंभार या समाजातील मंडळी आवर्जून येतात. अठरा पगड जातीचे मढी हे पंढरपूर मानले जाते. या समाजांतील वादांचा येथे न्यायनिवाडा होतो.
कानिफनाथांची महती
श्री नऊनारायणांनी भगवान श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रुपाने अवतार घेतले. त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले. ब्रह्मचैतन्य कानिफनाथांनी प्रर्दीर्घ काळ नाथसंप्रदायाचे काम केले. धर्माचे संस्कृतीचे रक्षण केले. नाथ पंथाचे कार्य करत करत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी साधारणपणे दहाव्या शतकातनगर जिल्ह्यातील मढी येथे फाल्गुन वद्य पंचमीला (रंगपंचंमी) च्या संजीवनी समाधी घेतली. भेदाभेद टाळत सर्वांना समान वागणुकीची शिकवण कानिफनाथांनी दिली. ती मढी आणि परिसरात आजही जपली जाते.
कानिफनाथ गडाचे ऐतिहासिक महत्त्व
कानिफनाथ मंदिर किल्ल्याप्रमाणे असलेल्या टेकडीवर आहे. राणी येसूबाई आणि बाळराजे शाहुमहाराज (पहिले) जेव्हा मोगलांच्या वेढ्यामध्ये होते. तेव्हा सुटकेसाठी राणी येसूबाईंनी श्री कानिफनाथस नवस केला होता. दरम्यान, पाच दिवसांत राणी येसुबाई आणि युवराज शाहुराजे (पहिले) यांची सुखरुप सुटका झाली. वस फेडण्यासाठी राणीसाहेबांच्या आज्ञेने बडोद्याचे सरदार पिलाजी गायकवाड यांनी चिमाजी सावंत यांना मढी येथे भव्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, पाण्यासाठी गौतमी बारव इ. भव्य बांधकाम केले तसेच चैतन्य कानिफनाथाच्या समाधीच्या पूजेसाठी गंगाराम दीक्षित उपनाम चौधरी काशीकर (वास्तव्य पैठण) यांना १७४३ मध्ये सनद दिली. यानंतर समाधी मंदिरातील पितळी घोडा आणि नंदादीप सरदार कान्होजी आंग्रे व त्यांचा मुलगा बापुराव आंग्रे यांनी अर्पण केलेला आहे.
रेवडी आणि मलिद्याचा प्रसाद
भाविक भक्त नाथांच्या समाधीला गलफ (वस्त्र), पुष्पहार, दवना, सुगंधी अत्तर, रेवडी आणि मलिद्याचा (चपाती, गूळ, तूप आणि बडिशोप एकत्र केलेला) प्रसाद अर्पण करतात. यावेळी नाथांच्या जयजयकाराने आणि डफ ढोल-ताशांच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमुन जातो. पाडव्याच्या पहाटे भक्तगण कावडीने पाणी आणून नाथांच्या समाधीला स्नान घालतात. मढीची रेवडी तर प्रत्येकाच्या आवडीची आहे. विशेषत: मुख्य मंदिरावर रेवड्या उधळल्या जातात. दरम्यान, रंगपंचमीला कानिफनाथांचे दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविक मच्छिंद्रनाथांनी समाधी घेतलेल्या मायंबा, वृद्धेश्वर आणि मोहटा येथे जातात. तर, अनेक भाविक हे पैठणच्या दिशेने रवाना होतात. पाडव्याच्या आदल्या दिवशी फुलबागेतील बाजार प्रसिद्ध आहे. यात्रा काळात येथे प्रजातीच्या गाढवांचा बाजारही येथे भरतो.
देवाच्या काठीची प्रथा
या ठिकांणी वेगवेगळ्या प्रकाचे भाविक देखील पाहायला मिळतात. काही तरुण मंडळे वाजत गाजत कानिफनाथाला येतात, तर काही भाविकांकडे वेगवेगळ्या रंगाचे झेंडे असलेल्या काठ्या पाहायला मिळतात. त्या काठीला देवाची काठी म्हणतात. ही काठी मंदिराच्या कळसाला लावण्याची प्रथा आहे. गुढीपाडव्यापर्यंत मढी आणि निवडुंगे या गावांमध्ये विविध व्रतबंधने पाळली जातात. यात शेतीची कामे, विवाह, वास्तुशांती इत्यादी मंगलकार्ये, गादी, पलंगावर झोपणे, दाढी करणे, नवीन कामास प्रारंभ, तसेच पदार्थ तळणे ही कामे वर्ज्य मानली जातात. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत यात्रेची तयारी करावी, ही त्यामागची भावना आहे.
नाथ आणि वारकरी अनुबंध
मच्छिन्द्राने बोध गोरक्षासी केला।
गोरक्ष वोळला गहिनीप्रति।।
गहिनी प्रसादे निवृत्ती दातार।
ज्ञानदेवे सार चोजविले।।
अशी वारकरी संप्रदायाची गुरुपरंपरा आहे. श्री ज्ञानदेवांचे सद्गुरू आणि मोठे बंधू निवृत्तीनाथांनी नाथ परंपरा वारकरी परंपरेशी जोडली. त्यातून नाथ संप्रदायातील अठरापगड जाती वारकरी संप्रदायाला जोडल्या गेल्या. मढी यात्रेला येणारे लोक पंढरीच्या आषाढी यात्रेलाही जातात. संत ज्ञानदेव, संत तुकारामांना, ज्ञानेश्वरी ग्रंथाला मानतात. तर पंढरीचे वारकरी श्रावणात नवनाथांची पोथी वाचतात. विखुरलेल्या समाजाला एकत्र आणून ज्ञानमार्गाला लावणं हाच या दोन्हीही पंथाचा उद्देश. समता, मानवता, ऐक्याचा मार्ग दाखविणाऱ्या कनिफनाथांना यात्रेनिमित ।।ज्ञानबातुकाराम।। परिवाराचे वंदन!🙏