पहिल्या वारीतच विठ्ठलानं

महापूजेसाठी थांबवून घेतलं

दरवर्षी आषाढी एकादशीपर्यंत विठ्ठल रखुमाईचं अंगण वारकऱ्यांचा उत्साह, आनंदानं ओसंडून वाहत असतं. पण २०२० मध्ये कोरोनानं शिरकाव केला. वारी रद्द झाली. हे थैमान वाढत गेलं आणि २०२१ मध्येही वारीवर निर्बंध आले. कोरोनानं देव-भक्तांची ताटातूट केली. पण या वर्षी वारकऱ्यांची आस पूर्ण होत आहे. हरिनामाच्या गजरानं अवघं अवकाश दुमदुमून गेलं आहे. माझ्या कानात टाळ मृदंगाचा आवाज घुमतोय. जसं मी वारकऱ्यांच्या गर्दीतच आहे…

अक्षरा चोरमारे

टाळ्यांच्या गजरात सगळे गातायत, ज्ञानोबा माऊली.., ज्ञानराज माऊली तुकाराम… ‘एबीपी माझा’ची पत्रकार म्हणून २०१९ ला पहिल्यांदाच वारीला गेलेले. तीसुद्धा अगदी कालचीच गोष्ट वाटतेय.

बस इथे. ऐक. आता किमान आठवडाभर बाहेर असणारेस. अजिबात तिथे चिडचिड करायची नाही. कोणावर ओरडायचं नाही. टीम सोबत राहायचं. जपून राहायचं. सांभाळून राहायचं. समोर बसवून बाबांनी हा उपदेश दिला… पण मी मात्र वारीला जाणार यामध्येच गुंग होते. वारी कव्हर करायला मिळणार याच आनंदात मी मश्गूल होते. ‘एक तरी वारी अनुभवावी…’ वारीबद्दल मी वाचलेलं-ऐकलेलं हे पाहिलं वाक्य. हे सगळ्यांनीच ऐकलंय… पण चालत वारीला जाणं कधी स्वप्नातही आलं नव्हतं आणि आणलंही नव्हतं… पण यावर्षी ठरवलेलं… वारी कव्हर करायला जायचं. आणि अनपेक्षितपणे राजीव खांडेकर सरांनी अनुमतीसुद्धा दिली.

लोणंद ते चांदोबाचा लिंब तीन तास

थोडा उशीरा का होईना, पण वारीचा प्रवास सुरू झाला. लोणंदहून मी वारी कव्हर करायला सुरुवात करणार होते. फलटण तालुक्यातील चांदोबाचा लिंब येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पाहिलं उभं रिंगण होतं. रिंगणापासून सुरुवात होणार होती, त्याचंच अप्रूप होतं. अंधेरी, मुलुंड, डोंबिवली मग लोणंद असं साधारण तीनेकशे किलोमीटरचं अंतर आम्ही पाच तासांत पार पाडलं. पण लोणंद ते चांदोबाचा लिंब हे नऊ किमीचं अंतर पार करायला तीन तास लागले, इतके लोक रस्त्यावर होते. लोकांचा, वारकऱ्यांचा महासागर होता तो. पुढचे काही दिवस आम्ही याच महासागराचा भाग बनणार होतो.

याच सागरातून वाट काढत, शॉर्टकट शोधत, लॉंगकट मारत आम्ही चांदोबाचा लिंब येथे पोहोचलो. पालखी यायला अजून वेळ होता. तोपर्यंत एखादी स्टोरी उरकून घेतली. वारकऱ्यांच्यात बसून गप्पा मारल्या, पिठलं भाकरी खाल्ली. सगळंच कसं भारी भारी वाटत होतं. हे नऊ दिवस आता माझे होते. आणि मला हेच करायचं होतं. पालखी यायची वेळ झाली. ‘वॉकथ्रू’ करायचं ठरवलेलं. कॅमेरामन आधीच एका गाडीच्या छतावर सेटल होऊन गेले होते. पालखी आली रिंगण सुरू झालं. सगळीकडे धावपळ, गर्दी. काय करायचं काहीच सुचेना. पूर्णपणे गोंधळून गेले होते, लक्षात होतं नव्हतं ते सगळं विसरले… मनात म्हटलं का आले मी वारीला? मला तर काहीच बोलता नाही येत. बाहेरगावी जाऊन रिपोर्टिंग करण्याची पहिलीच वेळ होती. त्यामुळे गोंधळ उडाला होता. माझ्यासोबत कॅमेरामन होते अरविंद वारगे. सर खूप धीर देत होते. होतं असं, नको काळजी करू. अनेक नावाजलेले रिपोर्टर गोंधळतात. आपण नवीन आहोत. पण नंतर लोकांसोबत एक-दोन ‘चौपाल’ करून घेतल्याने थोडा धीर आला.

मुंबईत पाऊ, वारी कोरडी

मुंबईमध्ये पावसानं थैमान घातलं होतं. पण इकडे पावसाचा शिडकावाही नव्हता. पावसाची आस लागलेल्या वारकऱ्यांनाही उन्हाने रखरखत ठेवलं होतं. उन्हात खूप चालल्याने मी थकून बाजूला बसले. हा माझा थकवा कोणालातरी जाणवला. एका मावशींनी हातावर गुळाचा खडा टेकवला. दिलेला गूळ तोंडात विरघळत नाही तोपर्यंत घोटभर पाणीही समोर आणलं. जणू काही मी माझ्या घरातच आहे. बोलता बोलता कळलं त्या कोल्हापूरच्या आहेत. त्यांचं वाक्य संपतं न संपतं मी म्हणाले, ‘अरे मी पण कोल्हापूरचीच.’ मावशी म्हणाल्या ‘बघ आपली लोकं भेटली की कसं फ्रेश वाटून जातं. हे नातंच असं असतं.’ जाता-जाता मावशींनी आवर्जून सांगितलं. ‘हे बघ कोणी नंबर मागितला तर देऊ नको हां.’ पाच-दहा मिनिटांची ही भेट, त्यात गुळाचा गोडवा होता, पाण्याचा ओलावा होता, मायेची साद होती आणि तेवढाच हक्काने दिलेला सल्लाही होता. ही आपुलकी, काळजी ज्या पद्धतीनं जाणवत होती, त्यातलं माणूसपण, वेगळेपण भावत होतं.

दोन दिवस मुक्काम बारामतीला होता. गोविंद शेळके सर भेटले. ते पहिल्या दिवसापासून वारी कव्हर करत होते. रात्री जेवताना त्यांनी त्यांचे आधीचे वारीचे अनुभव सांगितले. काय करायला हवं, काय नाही, कशावर भर द्यावा, लोकांना कलर बघायला आवडतात अशा गोष्टी करायच्या. मी ठरवलं उद्यापासून खूप काय काय आणि वेगळं करायचं. अरविंद सर म्हणाले, अक्षरा, आपली पहिली वारी आहे, त्यांची चौथी. जास्त एक्साईट नको होऊ. जमेल तसं करू आपण. दुसऱ्या दिवशी बेलवाडीला तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण होतं. सकाळी लवकर निघूनही आम्ही अडकलो. बराच वेळ गाडीत अडकून होतो. पर्याय नव्हता. म्हटलं चला चालत निघू आणि सामान घेऊन निघालो. चाललो चाललो. थकून गेलो. एका टू व्हीलरवाल्या काकांकडून लिफ्ट घेतली. त्यांना म्हटलं, काका सोडा ना थोडं पुढे. त्यांनी आनंदाने होकार दिला. आम्हाला लिफ्टचा नवीन पर्याय कळला. ज्याचा वापर पुढे बऱ्याचदा झाला.

वारीतून गाडी काढणं महाकठीण

दिंड्या चालू लागल्या की सहा-सात किलोमीटरच्या रांगा असायच्या. आणि त्यातून गाडी काढणं म्हणजे महाकठीण. त्यामुळं कुठेही पोहचायचं तर पालखी आणि दिंडीच्या आधी पोहचण्याला आमचं प्राधान्य असायचं. पण पहिले दोन-तीन दिवस आमचं गणित हमखास चुकायचं आणि पुढे जायला आमची पायी वारी व्हायचीच. दररोज सकाळी साडेपाच-सहा पर्यंत आम्ही रस्त्यावर उतरायचो. कॅमेरामन अरविंद सर आणि ड्रायव्हर अरविंद दादा हे तेवढेच हौशी असल्यानं कामात एक हुरुप होता. ड्रायव्हर म्हटलं की साधारणतः कामाच्या ठिकाणी रिपोर्टर कॅमेरामनला सोडलं की काम संपलं. पण अरविंद दादा आमच्या सोबत दिवसरात्र पायी भटकायचे आणि नंतर ड्रायव्हिंगही करायचे. अरविंद सरांचे पेशन्स खूप भारी होते. ज्यांनी मला खरंच खूप सांभाळून घेतलं. म्हणजे आपली टीम चांगली असली, की सगळ्या गोष्टी सकारात्मक वाटतात.

अपघात होता होता वाचला

टाळ मृदुंगाच्या तालावर हरिनामाचा गजर करत वारकऱ्यांचा प्रवास सुरू होता. दुरुन कुठून पाहिलं, की हे दृश्य खूप मनमोहक दिसायचं. कुठल्यातरी चढावर असा मस्त वारकऱ्यांनी भरलेला रस्ता, नागमोडी वळणावरची ही पंढरीला जाणारी पांढरी रांग आकर्षक वाटायची. इंदापूरमध्ये तुकारामाच्या पालखी सोहळ्यातील मोठं गोल रिंगण होतं. शाळेच्या पटांगणात हे रिंगण साकारलं जातं. रिंगण असेल त्यादिवशी कुठे तरी उंचावर जाऊन जागा पटकावणं हे आमचं ध्येय असायचं. मग कधी ट्रक, बस, टँकर, भिंत अशी ठिकाणं आम्ही कॅमेरा सेट करायला शोधायचो. ज्यामुळे पूर्ण मोठं गोल रिंगण दाखवता येईल. गोविंद सरांचं एक आणि आमचं एक असे दोन कॅमेरा युनिट सोबत असल्यानं एक कॅमेरा उंचीवर आणि एक रिंगणात ठरलेला असायचा. गोविंद सरांसोबत कॅमेरा करायला होता ऋषी घोडके. बीडचाच. वय वर्षे फक्त बावीस. तो आणि मी रिंगणात होतो.

अश्वांच्या रिंगणाला अजून सुरुवात नव्हती झाली. खूप वेळ उभे राहून पाय दुखायला लागले, त्यामुळे मी खाली बसले आणि माझ्यासोबत ऋषीपण. स्लो मोशन, अश्वांचे फोटो काढणं सुरू होतं. सगळं सुरळीत सुरू असताना आमच्या थोडं अलीकडे एक अश्व पायात अडखळला आणि तो आम्हा दोघांवर पडता पडता सावरला. कोणी बघितलं नसावं असं गृहीत धरून आम्ही तोंड बंद ठेवलं. नाहीतर त्या दिवशी एखादी ब्रेकिंग न्यूज ठरलेली होती. आम्ही चूपचाप मागे आलो. पण रिंगण संपताच सरांची प्रेमळ फायरिंग सुरू झाली. ते दुसऱ्या कॅमेऱ्यासोबत बिल्डिंगवर असल्याने त्यांनी आणि सगळ्यांनीच ते पाहिलं होतं आणि म्हणालेही होते, हे दोघे चुकीच्या ठिकाणी बसलेत.

रिंगण, खेळ आणि भटकणं

रिंगण झालं की आम्ही काही वेगळ्या स्टोरीज करायचो. सगळ्यांना कॅमेऱ्यावर यायचं असायचं. टीव्हीवर दिसायची हौस असायची. त्यामुळे खूप गोंधळ व्हायचा. सांभाळणं मुश्किल व्हायचं. स्टोरीज म्हणजे काय तर रिंगण, रिंगणानंतर होणारे वेगळे खेळ, पालखी विसावा किंवा मुक्कामाच्या ठिकाणी दिसलेलं वेगळं चित्र. चालताना त्यांची शिस्तबद्धता. गायले जाणारे अभंग. त्यामुळे इतरवेळी आम्ही रिकामेच असायचो. कोणत्याही दिंडीत जाऊन वारकऱ्यांशी गप्पा मारणं, ते थांबलेल्या ठिकाणी जाऊन गप्पा मारणं, ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीतून तुकारामाच्या दिंडीत जाणं, तुकाराम महाराजांच्या दिंडीतून माऊलींच्या दिंडीत येणं. जितकं वारकऱ्यांच्यात वारकऱ्यांसोबत भटकायला मिळेल तेवढं भटकणं, हा आमचा दिनक्रम होता.

रिंगण पूर्ण होताच मस्त खेळ रंगून जायचे. रिपोर्टिंग करता करता त्यांच्यासोबत खेळण्यात वेगळीच मजा यायची. रिपोर्टिंग म्हणजे काय तर आपल्या समोर काय सुरू आहे, कशाप्रकारे सुरू आहे हे दाखवणं. पण त्यांच्यात सहभागी होऊन तेच खेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारत खेळल्यामुळे तेही आपलेसे होऊन जातात. त्यामुळे आणखी मोकळेपणाने बोलतात. फुगड्या खेळताना आपल्यासोबत फुगडी घालण्यासाठी त्यांची चढाओढ लागते. आजी, आजोबा सगळेच कसे उत्साही असतात. डोक्यावर तुळस घेऊन कसं काय हे तोल सांभाळत फुगड्या घालतात पांडुरंगच जाणे!

‘ए लेकी, य इकडं. बस हितं…’

अशी सर्व रिंगणं कव्हर केली. मुक्काम पार पाडले. विसावे गाठले. हळूहळू कॉन्फिडन्स वाढत होता. वेगवेगळ्या स्टोरीज मिळत होत्या. रिस्पॉन्स चांगला येत होता. खूप छान लोक भेटत होते. वारीतल्या या आज्जी आजोबांकडून मी खूप लाड करुन घेत होते. असंच एकदा चालता चालता मागून आवाज आला. अनोळखी पण तितकीच जवळची वाटावी अशी हाक कानी पडली. एक आज्जी आवाज देत होत्या. ‘ए लेकी, य इकडं. बस हितं. मगाच्यानं बगतुया नस्ती फिरतेय. पोटाला खा की कायतरी’ म्हंटलं नको आज्जी मी सकाळीच खाल्लंय भरपूर. तर म्हणाल्या ‘काय गं, आज्जीच्या हातनं खायला आवडणार नाई काय?’ खूप भावनिक साद होती ती. गुमान बसून त्यांच्या सोबत गप्पा मारत चिवडा खाल्ला. विठ्ठलाच्या ओढीनं ही म्हातारी-कोतारी पंढरीच्या दिशेने निघतात, पण त्यांच्या मागे असतं ते त्यांचं घरदार, पोरंबाळ आणि लाडकी नातवंडं. त्यामुळे वारीत जी कोणी लहान मुलं दिसतील त्यांच्यात हे त्यांची नातवंडं शोधत असतात. तशीच मी त्यांच्यासाठी एक होते. त्यांची नात होते.


हे सगळे आज्जी आजोबा खूप लाड करतात. ‘माझी नातवंडं अशीच तुझ्यासारखी आहेत’ म्हणून हातात काहीतरी खाऊ टेकवून देतात. ‘उनात लई फिरू नगं’ म्हणून ताकीद देतात. एकदा चालून दमले म्हणून एका वारकऱ्यांच्या ग्रुपमध्ये बसले. त्यांची चौकशी सुरू झाली. कुठून आली? काय करते? सोबत कोण आहे? बाकीचे कुठेत? तुला एकटीला कसं सोडलं? आणि काळजीपोटी सांगितलंही, ‘असं एकटी नाही फिरायचं. दोघी तिघींना बरबर घेऊन फिरत जा. जमाना लई वंगाळ हाय…’ ही साधी माणसं खूप प्रेम देऊन जातात. लळा लावतात.

‘बंधुभेटी’नं पाहिली परीक्षा

दिंडीच्या रांगा खूप लांब असायच्या. असंच एकदा बंधुभेट कव्हर करायला जाताना सगळेच अडकलो, गोविंद सरांना म्हटलं चला पायी जाऊ. अंतर किती बाकी आहे माहिती नव्हतं. सकाळपासून पोटात काहीच नव्हतं. पोटात कावळे ओरडत होते. गर्दीमुळे मोबाईललाही रेंज नव्हती. सकाळपासून ऑफिसलाही काही फीड पाठवलं नव्हतं. त्यात डोक्यावर होता मस्त तापलेला सूर्य. डोक्याचं आणि आणि मोबाईलचं दोन्ही नेटवर्क जाम होते. रेंज शोधत सामान घेऊन आम्ही आपलं चालतोय चालतोय… या प्रवाहात रंगून टिपलेले क्षण ऑफिसला पाठवण्यासाठी रेंजची गरज होती. त्यासाठी या प्रवाहातून कुठेतरी दूर जाऊन आम्हाला रोजचीच ही कसरत करावी लागायची.

वाटेत एका दिंडीचं जेवण सुरू होतं. रेंज मिळतेय का बघायला थांबलो, तर त्यांनी जेवायला आग्रह केला. आम्ही का सोडू दिंडीतलं जेवण? मस्त ताव मारला. चालायला जीव आला. चार किलोमीटर अंतर पार केलं होतं. बंधुभेटीचा टप्पा अजून किती दूर आहे लक्षात येत नव्हतं. चालणं सुरू होतं. वाटेत इतर मीडियावाले भेटत गेले. सगळे एकत्र चालतायत. मुलींमध्ये तेव्हा मी एकटीच होते. माझे पाय दुखायला लागले. पाच-सहा किलोमीटर चाललो असू आम्ही. सरांना म्हटलं मी जाते लिफ्ट घेऊन, माझे त्राण संपले आता. तुम्ही या सगळे पुढे चालत. सरांनी एक गाडी पकडून दिली. खुश होऊन माझी स्वारी निघाली. वाटेत लोकांना विचारतेय, कुठेय टप्पा? टप्पा कुठे आहे?? टप्पा म्हणजे जिथे संत सोपानकाका आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची भेट होते ते ठिकाण. कोणी म्हणतंय टप्पा तर मागे गेला. कोणी म्हणतंय अजून खूप पुढे आहे. बऱ्याच लोकांना टप्पा माहितीही नव्हता. सगळी उत्तरं वेगवेगळी होती. म्हटलं जाऊदे आणि पुढे दोन-तीन किलोमीटर जाऊन उतरले गाडीवरून. मी कुठे आहे, बाकी सहकारी कुठे आहेत काही लक्षात येईना. ते इथूनच जातील म्हणून रस्त्याकडे बघत बसलेले, पण कोणीच नाही दिसलं.

गोविंद सर कॉल करुन करून थकले असणार. लोकेशन टाकूनही फायदा नव्हता. कधी दोन तास, तर कधी एक तास दाखवत होतं. सगळंच गंडलेलं. ते पुढे आहेत, की पाठीमागं काही कळायचा मार्ग नव्हता. रिस्क घेऊन पुढे जायचं ठरवलं. रस्त्यावर सगळ्या दिंड्यांच्या रांगा होत्या. दोन टू व्हीलर, एक जीप आणि ट्रॅक्टर अशा गाड्या बदलत मी सगळे जिथं होते तिथं पोहचले. हे लोक साधारणतः चार किलोमीटर पुढं होते माझ्या. कधी पुढं गेले काहीच कळलं नाही. आणि मी तिथे गेल्यावर जो हशा पिकला… बापरे! म्हणजे मी गाड्या बदलत तिथे पोहोचायला इतका उशीर केला आणि सगळे माझ्या आधी तिथे पायी पोहोचले होते. तिथून पुढे सरांनी कानाला खडा लावला म्हणाले, तू आमच्या सोबतच राहायचंस…

वेगवेगळी माणसं, वेगवेगळी नाती

खूप वेगवेगळी माणसं भेटली या वारीत. वयाची बंधनं तोडून सगळे पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झाले होते. अगदी सहा-सात वर्षाच्या मुलांपासून नव्वद वर्षांच्या आज्जींमधला उत्साह वाखाणण्याजोगा होता. पायी शक्य नाही, म्हणून स्कूटरवरून जाणारे ८५ वर्षांचे आजोबा, उड्या मारत विठ्ठलनामाचा जप करत वाट सारणारे जम्पिंग आजोबा, एकमेकींना साथ देऊन सोबत करणाऱ्या सासू-सुना, नणंद- भावजय, शेजारणी आपल्या नात्यातील वीण या वारीत आणखी घट्ट करत होत्या. स्कूटरवरुन वारी करणाऱ्या ८५ वर्षांच्या आजोबांना मी विचारलं होतं, तुम्ही डबलसीट घेता का हो कोणाला? ते म्हणाले, ‘डोसक्यावर पडलोय काय दुसऱ्याचं वजं कोण पेलणार..?’ पण त्यांनी मला मस्त राऊंड मारून आणला. लहानपणी बाबा ऑफिसला जायच्या आधी आम्हाला एकेक राऊंड मारुन आणायचे गाडीवरुन, अगदी तसं वाटलं. पुन्हा लहान झाल्यासारखं. नव्वद वर्षाच्या आज्जींनी स्टोरी झाल्यावर जे लाडाने गालावरून हात फिरवून कडाकड बोटं मोडली, म्हणाल्या, ‘खूप मोठी हो बाळा…’ हे आशीर्वाद खूप बळ देतात आयुष्यात.

आता विठ्ठल हाकेच्या अंतरावर आला होता. अजूनही त्याच्या भेटीची ओढ तीच होती. कधी आमची भेट होतेय याची उत्सुकता होती. या विठ्ठलाची आणि आमची भेट घडवली ती पंढरपूरचे आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण सर यांनी. ऑफिसमधून फक्त बातम्यांपुरतं बोलणं व्हायचं. पण यावेळी दिवाण सर विठ्ठल आणि आमच्या भेटीतला दुवा होते. आषाढीच्या आदल्या दिवशी मला तिथून निघायचं होतं. पण गर्दी आणि गर्दीत अडकलेली गाडी यामुळे निघणं अशक्य होतं. त्यामुळे आषाढीच्या पूर्वसंध्येला मी निवांत होते. बॅगा भरुन गाडीत होत्या. सकाळीच आलेली ऑफिसची सहकारी ऋचा आणि मी मंदिर परिसरात फिरत होतो. त्याआधी बऱ्याच लोकांनी पूजेसाठी मंदिरात येण्यासाठी विचारणा केलेली. पण माझं आदल्या दिवशीच दर्शन झाल्याने मी पुन्हा मंदिरात जाणं नाकारलं. कारण पूजेला खूप वेळ लागतो असं ऐकलेलं. शिवाय ऑफिसमध्ये शिफ्ट लावली असल्याने पहाटे लवकर निघणं भाग होतं. जेणेकरुन मी दुपारच्या शिफ्टला पोहोचेन.

याचसाठी केला होता अट्टाहास

मी खूप धार्मिक वगैरे आहे अशातली गोष्ट नाही. पण म्हणतात ना विघ्नं कितीही असोत, दर्शन होणार असेल तर ते होतंच. विठ्ठलाचं मला पुन्हा एकदा बोलावणं आलं ते थेट त्याच्या चरणी, महापूजेसाठी… अचानक मला मैत्रिणीच्या दादा-वहिनीचा फोन आला आणि मी त्यांच्यासोबत मंदिरात गेले. तिथे बाबांचे मित्र सचिन जाधव सर होते, त्यांनी पूजेसाठी थांबवून घेतलं. त्यांना जेव्हा हा किस्सा सांगितला तेव्हा त्यांनाही खूप भारी वाटलं. न ठरवता मी मंदिरात होते. तेही आषाढी पूजेसाठी. त्यांच्या म्हणण्यानुसार माझ्या नऊ दिवसांच्या मेहनतीचं हे फळ होतं. ज्याठिकाणी मी ठरवून जाणार नव्हते, पण योगायोगाने मी डायरेक्ट महापूजेसाठी आत होते. ‘याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा’. पण खरा गोड शेवट अजून बाकी होता. पूजेनंतर मुख्यमंत्र्यांचा ‘टिकटॅक’ करायचा होता, पण आमच्याकडून तो मिस होणार होता. सुनील सरांना म्हटलं, सर पत्रकार परिषद झाल्यावर बोलू का मुख्यमंत्र्यांशी पट्कन? सरांनी होकार दिला आणि मलाच मुख्यमंत्र्यांशी बातचीत करायला सांगितलं. ही खरंच खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट होती किमान माझ्यासाठी तरी. आणि सुनील दिवाण सरांनी मला ती संधी दिली. मी तेव्हा अक्षरशः हवेत होते.

तिथून आम्ही चंद्रभागेच्या तीरावर गेलो. आणि जाता जाता शेवटचा ‘वॉकथ्रू’ बोटीत बसून करायचा ठरला. जो या गेल्या नऊ दिवसांत केलेल्या कामाचं समाधान देऊन गेला. एका उंच इमारतीवरुन मी पाहिलेलं चंद्रभागेच्या घाटाचं दृश्य डोळ्यांना आणि मनाला जे समाधान देऊन गेलं, त्याच्या वर्णनासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. समुद्रकिनाऱ्यावरील एखाद्या बंगल्यातून लाटा दिसतात तसं दृश्य माझ्या नजरेसमोर होतं. इथं होता माणसांचा समुद्र. लाखोंच्या संख्येनं घाटावर पुढे मागे चालणारे वारकरी समुद्राच्या लाटेसारखे भासत होते. वारकऱ्यांचा प्रवाह जेव्हा स्नानासाठी चंद्रभागेच्या प्रवाहात मिसळत होता तेव्हा एकमेकांमध्ये मिसळणाऱ्या या दोन प्रवाहांचा मिलाप डोळ्यांचं पारणं फेडणारा होता.

अहंकाराचा वारा न लागो राजसा

आता परत फिरायची वेळ आलेली, पण जे पदरी पडलेलं ते खूप वेगळं होतं. निव्वळ अफाट होतं. खूप काही नवं शिकायला मिळालं होतं. खूप छान नवे मित्र भेटले. एकंदरीतच महाराष्ट्राच्या समाजजीवनावर वारीचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे वारी कव्हर करणं ही खूप मोठी संधी होती. तिचा पुरेपूर उपयोग केला होता. त्यासाठी आधी अभ्यासही तितकाच केला होता. सांगितलं म्हणून गेले अशातली गोष्ट नव्हती. पुस्तकं वाचलेली. अभंग ऐकलेले. उठता बसता वारीत गुंतलेले. अर्थात वारीनेही खूप काही शिकवलं. बुलेटिनसाठी हवा तो आणि हवा तसा कंटेंट मी देऊ शकेन का? या अनेकांनी उभ्या केलेल्या प्रश्नांनी मीही संभ्रमित झाले होते. परंतु वारकरी म्हणतात ना, पांडुरंग पाठीशी असल्यावर काही अडचण येत नाही, तसंच माझ्याबाबतीत घडत गेलं. आणखी उत्तम करण्यासारखं होतं. करता आलं असतं, याची मलाही जाणीव आहे. तरीसुद्धा वारीनं जी समृद्धी दिली, त्याचं वेगळंच समाधान होतं.

वारी हे संस्काराचं विद्यापीठ आहे म्हणतात, तर मग नक्कीच विठ्ठल या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत असंच म्हणावं लागेल. शाळा कॉलेजमध्ये आपण अनेक विषय शिकतो, पण रोजच्या जगण्यातल्या साध्या साध्या गोष्टी वारी शिकवते. अहंकार, राग, ‘मी’पणा गळून पडतो. नम्रता वाढते. इथं सगळे समान आहेत. त्यामुळेच संत तुकाराम म्हणतात, वारकरी होऊन पंढरपूरला जा. कोणताही अभिमान, अहंकार उरत नाही. वारीने माझ्यात वैयक्तिकरित्या खूप बदल झाले. सर्वार्थानं सर्व काही दिलं. आयुष्याला समृद्ध बनवत त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला. त्यामुळे खरंच, ‘एक तरी वारी अनुभवावी…’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *