संत तुकाराम बीज सोहळ्यास
इंद्रायणीतीरी लाखो वारकरी
देहू : फाल्गुनाचे टळटळीत ऊन झेलत इंद्रायणीकाठी कीर्तनात तल्लीन झालेला भाविकांचा महासागर… बारा वाजून दोन मिनिटे झाली आणि तुकोबारायांच्या वैकुंठगमनाचा साक्षीदार असणारा नांदुरकीचा वृक्ष सळसळला… ‘तुकाराम तुकाराम’च्या जयघोषाने देहू परिसर दुमदुमून गेला! संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाचा हा ३७६वा सोहळा आज (दि. २७) लक्ष लक्ष नेत्रांनी अनुभवला.
भल्या पहाटेपासून आजच्या बीज उत्सवाची सुरुवात झाली. पहाटे तीन वाजता मुख्य देऊळवाड्यात काकड आरती झाली. चार वाजता संस्थानचे विश्वस्त, वंशज, वारकरी यांच्या हस्ते श्री पूजा, तसेच संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा झाली. साडेचार वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा झाली. सहा वाजता वैकुंठगमन स्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा झाली. संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, अजित महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, विशाल महाराज मोरे यावेळी उपस्थित होते.
सकाळी साडेदहा वाजता पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान झाले. पालखीपुढे परंपरेप्रमाणे संबळ गोंधळी बापू भांडे, चौघडा सेवा माऊली पांडे, बाळू पांडे, पिराजी पांडे, दिनेश पांडे, उमेश पांडे, शिंगवाले पोपट तांबे, मुलाणी यांनी ताशा, अब्दागिरी नवनाथ रणदिवे आणि रमेश लोहकर, अजित सोनवणे यांनी गरूडटक्के, कडूबा सोनवणे यांनी छत्री, हनुमान यादव आणि विठ्ठल रणदिवे यांनी पताका, तर जरीपटका महादेव वाघमारे यांनी आपल्या खांद्यावर घेतला होता.
साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वैंकुठगमन मंदिराच्या आवारात प्रदक्षिणा घालून पालखी येथील नांदुरकीच्या वृक्षाखाली आली. येथे देहूकर महाराज यांचे सकाळी दहाच्या सुमारास परंपरेप्रमाणे
घोटवीन लाळ ब्रम्हज्ञान्या हाती।
मुक्त आत्मस्थिती सांडवीन।।
या अभंगावर कीर्तन झाले. दुपारी बारापर्यंत तुकोबारायांच्या नामाचा, विठ्ठलाच्या नामाचा गजर झाला. बारा वाजून दोन मिनिटांनी नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून आणि मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी तुकाराम महाराजांचे स्मरण केले. दुपारी साडेबारा वाजता वैकुंठस्थान येथून पालखीचे मुख्य देऊळवाड्यातील मंदिराकडे आगमन झाले.
देहूत दाखल झालेल्या गावोगावच्या दिंड्यांमधून रात्रभर भजन-कीर्तन-जागर सुरू होता. बीज सोहळ्यानिमित्त देहूमधील मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील फुलांनी बनविलेले संत तुकाराम महाराजांचे चित्र भाविकांचे लक्ष आकर्षून घेत होते. दरम्यान, वैकुंठगमन मंदिरामध्ये खासदार श्रीरंग बारणे, तहसीलदार जयराज देशमुख, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, मंडलाधिकारी दिनेश नरवडे, तलाठी सूर्यकांत काळे, अतुल गीते, नगराध्यक्ष पूजा दिवटे, महावितरणाचे एस. बी. झोडगे, माजी नगराध्यक्ष स्मिता चव्हाण, नगरसेवक, ग्रामस्थ, संत तुकाराम महाराज संस्थानचे आजी, माजी अध्यक्ष, विश्वस्त, महसूल विभागाचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
बीज सोहळ्यानिमित्त प्रशासनातर्फे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यंदा सोहळ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातील सात डेपोंमधून देहूगावासाठी १२५ जादा बस सोडण्यात आल्या.
पुण्यातून स्वारगेट, मनपा भवन, आळंदी, पुणे स्टेशन, निगडी, हडपसर या डेपोंमधूनही जादा बस सोडण्यात आल्या आहेत. देहूगाव येथे दोन नवीन बस स्थानके उभारण्यात आली आहेत. झेंडे मळ्याजवळील मिलिटरीच्या मोकळ्या जागेत आणि गाथा परिसरातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज क्रीडांगणाजवळ तात्पुरती बस स्थानके उभारण्यात आली आहेत.