नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
आळंदी : आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी-पंढरपूर मार्गावरील अडचणींवर तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निवेदन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आले आहे.
यावेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळा प्रमुख ऍड. विकास ढगे पाटील, विश्वस्त अभय टिळक, लक्ष्मीकांत देशमुख, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी उपस्थित होते.
विसाव्याच्या जागा झाल्या बाधित
पालखी विसाव्याच्या जागा आणि वारकऱ्यांच्या भोजन विसाव्याचे थांबे हे जुन्या रस्त्याला अनुलक्षून पूर्वापार ठरलेले विसावे होते. नवीन महामार्ग तयार होत असताना या विसाव्याच्या जागा बाधीत होत आहेत. महामार्गावर सध्या उड्डाणपूल उभारले जात आहेत.
काही ठिकाणी रस्ता भर घालून रस्ता उंच केला गेला आहे. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस पालखी, दिंड्या, वारकरी, पाण्याचे टँकर, स्वयंपाकाच्या साहित्याची वाहने विभागली जातील. त्यांना न्याहरी, जेवण आणि दुपार नंतरचा विसावा यासाठी परस्परांशी संपर्क करणे, जा-ये करणे अवघड होणार आहे.
रिंगण सोहळ्याच्या जागांवर उड्डाणपूल
पालखी सोहळ्यात चार गोल आणि तीन उभे रिंगण सोहळे तसेच भारुडाचे कार्यक्रम होत असतात. या जागाही महामार्गाने बाधीत झाल्या आहेत. तर, रिंगणांच्या जागेलगत उड्डाणपुलांची उभारणी सुरू आहे.
महामार्गाचे काम सुरू असल्याने बऱ्याच ठिकाणी माती, मुरुमांचे ढीग, बांधकाम साहित्य आणि राडारोडा पडलेला आहे. या समस्यांवर उपाय म्हणून पालखी महामार्गावर असलेल्या दुभाजकांमधून डावी-उजवीकडे पालखी, वाहने आणि वारकरी यांना जाण्या-येण्यासाठी ठिकठिकाणी मार्ग करावा लागेल.
वारकऱ्यांसाठी सर्व्हिस रोड गरजेचा
वारकऱ्यांना महामार्गावरून दोन्ही बाजूंना पालखीच्या विसाव्यांच्या ठिकाणी जाता येता यावे, यासाठी महामार्गापासून विसाव्याच्या ठिकाणापर्यंत व्यवस्थित उतार देऊन रस्ता तयार करावा लागेल. अशाच पद्धतीने विसाव्यापासून महामार्गावर परत जाण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने दुसरा रस्ता तयार करावा लागेल. कारण महामार्गावरून माऊलींच्या रथातून पालखी उचलून खांदेकरी, दिंड्यांमधील वारकरी विसाव्याच्या ठिकाणी जातात.
साहित्याचे ट्रक, पाण्याचे टॅंकर आणि वारकऱ्यांना विसाव्याकडे जाण्या-येण्यासाठी आणि वाटचालीसाठी सर्व्हिस रस्ते लवकरात लवकर तयार करावे लागतील, आदी उपाययोजना नितीन गडकरी यांना संस्थान कमिटीतर्फे या भेटीदरम्यान सुचविण्यात आल्या आहेत.