माऊलींच्या मंदिरात विविध कार्यक्रम
आळंदी : श्रीराम नवमीनिमित्त आळंदीत दरवर्षी प्रमाणे पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या पादुकांची नगरप्रदक्षिणा हा यातील मुख्य कार्यक्रम आहे.
लवाजम्यासह पालखीतून श्रीरामचंद्रांच्या पादुकांची प्रदक्षिणा रविवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत होणार आहे. ही माहिती आवेकर भावे श्रीराम संस्थानच्या वतीने विश्वस्त नरहरी महाराज चौधरी यांनी दिली.
श्रीराम जन्मोत्सव दिनी श्री रामरायांची पालखी हरिनामाच्या जयघोषात श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात येणार आहे. येथे श्रींचे पादुका पूजन, मंदिर आणि नगर प्रदक्षिणा होणार आहे. तर, माऊली मंदिरात रामनवमी निमित्त श्रींचे संजीवन समाधीवर चंदन उटी साकारली जाणार आहे.
माऊलींच्या मंदिरातील कार्यक्रम –
श्रीराम नवमीच्या निमित्ताने श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
घंटानाद, काकडा आरती, पवमान पूजा, दुधारती, गुढीपूजन, श्रींना पोषाख जन्मोत्सव व आरती, परिवार देवतांची आरती, मान्यवर मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप. भाविकांना सुंठवडा प्रसाद वाटप, श्रीराम जन्माचे कीर्तन, आरती आणि पाळणा, महानैवैद्य, दर्शन, श्रींना शिंदेशाही पगडीचा चंदनउटी अवतार, प्रवचन, श्री रामचंद्र यांची मंदिरात पालखी, पूजा आणि आरती आदी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.